अरे शाहिरा थाप डफावर कडाडून तू ठेवुन दे
गणपतिबाप्पाचा पोवाडा रंगभूमिवर रंगू दे! ध्रु.
झोपी गेला समाज सारा खडबडून तो जागावा
राष्ट्रधर्म तो तव कवनातून मनामनावर बिंबावा
पुराण कसले इतिहासच हा युक्तीने तू पटवून दे !१
गणेश आहे बलसागर हा गुणसागरही तैसा तो
श्रोता लेखक तैसा योद्धा त्याच्यासम नेताही तो
गणितावरचे प्रभुत्व त्याचे विद्यार्थ्यांना जागू दे!२
अंकुश म्हणजे मना टोचणी पाश इंद्रिया जिंकाया
कमल सुगंधी सुंदर तैसे, मोदक मोदा वितराया
यज्ञोपवितहि रुळे तनूवर सामवेद त्या ऐकू दे!३
गायत्रीचा मंत्र जपावा, बलोपासना चालावी
डरायचे ना कधी कुणाला, विघ्ना भीक न घालावी
डावावर प्रतिडाव कसा तो निवेदन तुझे सांगू दे!४
तिथी चतुर्थी स्फूर्तिप्रद तो विनायकी वा संकष्टी
अथर्वशीर्षाचे आवर्तन दीपज्योतच तेवत ती
स्थैर्य धैर्य ते सामंजस्यहि सदा सर्वदा लाभू दे! ५
अबला साऱ्या झाल्या प्रबला युद्धकला त्यांना येते
गण गणनाथा शिस्तबद्ध तर विनायका रे तव फत्ते
यशासारखे बक्षिस दुसरे नसते ध्यानी येऊ दे! ६
या देशाची घटना कैसी, विविधतेत एकता कशी
जरी वाटलो वेगवेगळे तरी साखळी दृढ कैसी
गणराज्याचा जयजय साऱ्या त्रैलोक्यी तो दुमदुमु दे! ७
उत्तर दक्षिण पूर्व नि पश्चिम गणरायाचा जयजयकार
लहान मोठ्या भेदा विसरुन जनता व्हावी एकाकार
विधायकाचा धडा विनायक सकलां घालुन देऊ दे ! ८
मंगलमूर्ती ज्याची कीर्ती आत्मशक्ति तो जागवतो
केला जरि का पोत खालती अग्नी वरती उफाळतो
अन्यायाची चीड मनातुनि ज्वालामुखिसम पेटू दे! ९
स्वराज्य म्हणजे काय शिकव तू लोकशाहिरा गंभीरा
प्रसन्न झाला गणेश तुजवर प्रभावशाली तुझी गिरा
गदिमांसम तुज लेखनसिद्धी या जन्मातच लाभू दे! १०
कडाडता डफ झांज झणझणे बाहू श्रोत्यांचे स्फुरती
उत्साहाचे उसळे वादळ निराशेस द्या मुठमाती
अशक्य शब्दच नाही कोशी कर्तृत्वे हे दावुन दे! ११
गजराजाची कशी भव्यता डोळे दिपवी सांघिकता
धाकाहहुनही सत्कर्माला प्रेरक प्रेमाची सत्ता
साक्षरता व्यसनातुन सुटका धमाल यांची उडवून दे! १२
शेती उद्यम व्यापारातही हवी सचोटी जनतेची
गरज पडतसे तिथे घडावी धाव चपळ त्या चरणांची
सामाजिकता ती समरसता सवयीची होऊ दे! १३
इथे असावे असुनि नसावे अलिप्तपण ते सुखदायी
कर्मफलाची आसच नसता सेवा घडणे पुण्याई
श्री गजानन जय गजानन असे वैखरी गाऊ दे! १४
देह असे पाचा भूतांचा गणेशमूर्ती दाखवते
जैसा येतो तैसा जातो दहा दिसांतच जाणवते
जो आला त्या जावे लागे खंत कधी ना वाटू दे! १५
मधुर वागणे मधुर बोलणे, मधुरच भाषा भक्ताची
मधुर पाहणे, मधुर चालणे खूण गणपतीदासाची
आरतीतला ओलावा तो गाता गाता अनुभवु दे! १६
भक्तीमधला आवेशहि तो जीवनयुद्धी प्रकटावा
वीररसाचा औदार्याचा शांतीचाही स्पर्श हवा
पोवाड्यातहि भाव रोकडा रसिकमनाला जिंकू दे! १७
गणपति छात्रांचा, वीरांचा, तरुणांचा अन प्रौढांचा
गणपति होता जसा कालचा, तसा आजचा पुढिलांचा
भाषण चिंतन वर्तन यांची एकरूपता साधू दे! १८
चित्रकलेचा विषय गणपती मूर्तिकलेचा ध्यासच तो
ओंकाराची तोच आकृती योगिजनांचा योगी तो
पुढती मागे गणेश आहे धीर अधीरा लाभू दे! १९
वगात गण तो अभंग भजनी, ज्ञानेशाच्या ओवीत
रंगभूमिवर, रणभूमीवर, शाळेमधल्या वर्गात
तन्मय होणे गणेशपूजन सहजच हाते घडवू दे! २०
कवीस लिहिता केले त्याने शाहीरा ना राहवते
साथीदारा चढे स्फुरण तुणतुणेहि कैसे तुणतुणते
श्रीरामाचे भाग्य आगळे अश्रू होउन हासू दे ! २१