Friday, 18 December 2015

भारतीयाना फालतू म्हणणाऱ्या सीरियन डॉक्टरवर ब्रिटेन मधे बंदी

मटा ऑनलाइन वृत्त । लंडन भारतीय लोक फालतू आणि बिनकामाचे असतात, भारतीय डॉक्टर तर फक्त टॉयलेट साफ करण्याच्या लायकीचे आहेत, अशी अपमानास्पद वर्णद्वेषी विधानं करणाऱ्या ब्रिटनमधील सीरियन डॉक्टरवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. सीरियन वंशाचा डॉक्टर रागेब नॉमन हा २०१२ मध्ये हार्टलपूल हॉस्पिटल युनिव्हर्सिटीमध्ये रुजू झाला. त्यानंतर अनेकदा भारतीयांबद्दल वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. भारतीय डॉक्टर प्रॅक्टीस करण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांनी टॉयलेट्स धुण्याचंच काम करावं, अशी संतापजनक टिप्पणी त्यानं केली होती. एका सहकाऱ्याला तर त्यानं रुग्णांच्या समोरच 'इंडियन बास्टर्ड' म्हणून हिणवलं होतं. या बेतालपणाबद्दल २०१३ मध्ये दोन वेळा त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. पण त्यानंतरही तो सुधारला नाही. भारतीय लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात. ते अत्यंत असभ्य आणि बेशिस्त वागतात. मला अरबी, युरोपीय डॉक्टरांबद्दल काही तक्रार नाही, पण फालतू भारतीयांचा मी द्वेष करतो, असं रागेबनं अगदी जाहीरपणे सांगितलं होतं. या वंशभेदी, आक्षेपार्ह, अपमानजनक वक्तव्यांबद्दल त्याच्याविरोधा बऱ्याच तक्रारी आल्यानं ब्रिटनमधील जनरल मेडिकल कौन्सिलनं (जीएमसी) त्याची चौकशी केली. त्यावेळीही त्यांनी भारतीयांनाच उद्धट ठरवलं, त्यांची लायकी काढली. रागेबच्या या अरेरावीपणाची, मुजोरीची गंभीर दखल घेऊन जीएसीनं त्याला ब्रिटनमध्ये प्रॅक्टीस करण्यास बंदी केली आहे. 'तू सातत्यानं वर्णद्वेषी विधानं केली आहेस. आक्षेपार्ह विधानं करून भारतीयांचा अपमान केला आहेस. तुझं हे वागणं स्वीकारार्ह नाही. तू व्यक्त केलेल्या दिलगिरीतही गांभीर्य दिसत नाही. सीरियामधील परिस्थितीमुळे तुझी चीडचीड होत असेल, तू निराश झाला असशील. पण म्हणून तुझ्या असल्या वागण्याचं समर्थन करता येणार नाही', असं स्पष्ट करत चौकशी पथकानं रागेब नॉमनवर बंदीची कारवाई केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल ब्रिटनमधील भारतीयांनी समाधान व्यक्त केलं आहे.

No comments:

Post a Comment