Friday, 5 August 2016

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 वा

!! श्री स्वामी चरित्र
सारामृत,अध्याय १९  वा !!

श्री गणेशाय नमः ॥
एकाग्रचित्ते
करिता श्रवण । तेणे होय दिव्य
ज्ञान । त्या ज्ञाने परमार्थसाधन
। पंथ सुलभ होतसे ॥१॥
सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद
होय चित्ता । ओळखू ये
सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची
॥२...॥
या नरदेहा येवोन । काय करावे आपण ।
जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥
३॥
ज्यांसी वानिती भले । सज्जन
ज्या मार्गे गेले । सर्व
दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥
४॥
बोलणे असो हे आता । वर्णूं पुढे
स्वामीचरिता । अत्त्यादरे श्रवण
करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये
॥५॥
प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे
नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र
ख्याती । अजरामर राहिली ॥६॥
कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र ।
ती देखिली त्यांनी समस्त । नाना
योग्याभासी बहुत । महासाधू
देखिले ॥७॥
करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत
दिन । नाना स्थाने फिरोन । शोध
करीती गुरुचा ॥८॥
जपी तपी संन्यासी । देखिले अनेक
तापसी । जे सदा अरण्यवासी ।
योगाभ्यासी बैसले ॥९॥
एक सूर्यमंडळ विलोकिती । एक
पंचाग्निसाधन करिती । एक वायू
भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥
१०॥
एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व
कर । एक घालिती नमस्कार । एक
ध्यानस्थ बैसले ॥११॥
एक आश्रमी राहोन । शिष्या
सांगती गुह्यज्ञान । एक करिती
तीर्थाटन । एक पूजनी बैसले ॥१२॥
ऐसे असंख्य देखिले । ज्ञान
तयांचे पाहिले । कित्येकांचे
चरण धरिले । परि गेले व्यर्थची ॥१३॥
ठयोग परम कठीण । कैसा करावा साध्य
आपण । याविषयी पूर्ण ज्ञान ।
कोणी तयाते सांगेना ॥१४॥
एके समयी अक्कलकोटी ।
स्वामीदर्शनेच्छा । धरुनी पोटी ।
आले नृसिंहसरस्वती । महिमा
श्रीचा ऐकोनी ॥१५॥
नृसिंहसरस्वती दर्शनासी । येती
कळले समर्थांसी । जाणिले
त्यांच्या हदगतासी । अंतरामाजी
आधीच ॥१६॥
सन्मुख पाहोनी तयांना ।
आज्ञाचक्र भेदांतला । एक श्लोक
सत्वर म्हटला । श्रवणी पडला
तयांच्या ॥१७॥
श्लोक ऐकता तेथेचि । समाधी
लागली साची । स्मृति न राहिली
देहाची । ब्रह्मारंध्री प्राणवायू
॥१८॥
आश्चर्य करिती सकळ । असो
झालिया काही वेळ । समाधी उतरोनी
तत्काळ । नृसिंहसरस्वती धावले ॥
१९॥
स्वामी पदांबुजांवरी । मस्तक
ठेविले झडकरी । सदगदित झाले
अंतरी । हर्ष पोटी न सामावे ॥२०॥
उठोनिया करिती स्तुती । धन्य
धन्य हे यतिमूर्ती । केवळ परमेश्वर
असती । रुप घेती मानवाचे ॥२१॥
मी आज कित्येक दिवस । हठयोगसाधन
करायास । केले बहुत सायास । परी
सर्व व्यर्थ गेले ॥२२॥
स्वामीकृपा आज झाली । तेणे माझी
इच्छा पुरली । चिंता सकल दूर
झाली । कार्यभाग साधला ॥२३॥
असो नृसिंहसरस्वती । आळंदी
क्षेत्री परतोन येती । तेथेचि
वास्तव्य करिती । सिद्धी प्रसन्न
जयांना ॥२४॥
बहुत धर्मकृत्ये केली । दूरदूर
कीर्ति गेली । काही दिवशी
एकेवेळी । अक्कलकोटी पातले ॥२५॥
घेतले समर्थाचे दर्शन । उभे राहिले
कर जोडोनि । झाले बहुत समाधान ॥
२६॥
पाहोनी नृसिंहसरस्वतीसी । समर्थ
बोलले त्या समयासी । लोकी
धन्यता पावलासी । वारयोषिता
पाळोनी ॥२७॥
तियेसी द्यावे सोडोनी । तरीच
श्रेष्ठत्व पावसी जनी । मग सहजचि
सुरभुवनी । अंती जासी सुखाने ॥
२८॥
ऐकोनी समर्थांची वाणी । आश्चर्य
वाटले सकला मनी । नृसिंहसरस्वती
स्वामी असोनी । विपरीत केवी
करितील ॥२९॥
परी अंतरीची खूण । यति तत्काळ
जाणोन । पाहो लागले अधोवदन । शब्द
एक न बोलवे ॥३०॥
सिद्धी करोनी प्रसन्न । वाढविले
आपुले महिमान । तेचि
वारयोषितेसमान । अर्थ
स्वामीवचनाचा ॥३१॥
असो तेव्हापासोनि । सिद्धी
दिधली सोडोनी । येवोनी राहिले
स्वस्थानी । धर्मकृत्ये बहु केली
॥३२॥
यशवंतराव भोसेकर । नामे देव
मामलेदार । त्यासीही ज्ञान
साचार । समर्थकृपेने जहाले ॥३३॥
ऐसे सच्छिष्य अनेक । श्रीकृपेने
ज्ञानी विशेष । ज्यांनी ओळखिले
आत्मस्वरुप । महिमा त्यांचा न
वर्णवे ॥३४॥
वासुदेव ब्राह्मण थोर । ज्यांची
प्रसिद्धी सर्वत्र । इंग्रजी
अंमलात अनिवार । होऊनी बंड केले
ज्यांनी ॥३५॥
समर्थांची कृपा होता । इच्छित
कार्य साधेल तत्त्वता । ऐसे वाटले
त्याचे चित्ता । दर्शनाते पातला
॥३६॥
करी नग्न तलवार । घेवोन आला
श्रीसमोर । घालोन साष्टांग
नमस्कार । मनामाजी प्रार्थीत ॥३७॥
स्वकार्य चिंतोनि अंतरीं । खङ्ग
दिधले श्रीच्या करी । म्हणे मजवरी
कृपा जरी । तरी खङ्ग हाती देतील ॥
३८॥
जावोनि बैसला दूर । श्रीनी
जाणिले अंतर । त्यांचे पाहोनि
कर्म घोर । राजद्रोह मानसी ॥३९॥
लगबगे उठली स्वारी । सत्वर आली
बाहेरी । तरवडाचे झाडावरी । तलवार
दिली टाकोनी ॥४०॥
वासुदेवराव पाहोनी । खिन्न झाला
अंतः करणी । समर्थांते आपुली
करणी । नावडे सर्वथा म्हणतसे ॥४१॥
कार्य आपण योजिले । ते शेवटा न
जाय भले । ऐसे समर्थे दर्शविले ।
म्हणूनी न दिले खङ्ग करी ॥४२॥
परी तो अभिमानी पुरुष । खङ्ग
घेवोनि तैसेच । आला परत
स्वस्थानास । झेंडा उभारिला
बंडाचा ॥४३॥
त्यात त्यासी यश न आले । सर्व हेतू
निष्फळ झाले । शेवटी पारिपत्य
भोगले । कष्ट गेले व्यर्थचि ॥४४॥
असो स्वामीचे भक्त । तात्या
भोसले विख्यात । राहती
अक्कलकोटात । राजाश्रित सरदार ॥
४५॥
काही कारण जहाले । संसारी मन
विटले । मग प्रपंचाते सोडिले ।
भक्त झाले स्वामींचे ॥४६॥
मायापाश तोडोनी । दृढ झाले
स्वामीचरणी । भजन पूजन निशिदिनी
। करिताती आनंदे ॥४७॥
अकस्मात एके दिवशी । भयभीत झाले
मानसी । यमदूत दिसती दृष्टीसी ।
मृत्यूसमय पातला ॥४८॥
पाहोनिया विपरीत परी । श्रीचरण
धरिले झडकरी । उभा राहिला काळ
दूरी । नवलपरी जाहले ॥४९॥
दीन वदन होवोनी । दृढ घातली मिठी
चरणी । तात्या करिती विनवणी । मरण
माझे चुकवावे ॥५०॥
ते पाहोनी श्रीसमर्थ ।
कृतान्तासी काय सांगत । हा असे
माझा भक्त । आयुष्य याचे न सरले ॥
५१॥
पैल तो वृषभ दिसत । त्याचा आज असे
अंत । त्यासी न्यावे त्वा त्वरित
। स्पर्श याते करु नको ॥५२॥
ऐसे समर्थ बोलले । तोची नवल वर्तले
। तत्काळ वृषभाचे प्राण गेले ।
धरणी पडले कलेवर ॥५३॥
जन पाहोनी आश्चर्य करिती ।
धन्यता थोर वर्णिताती ।
बैलाप्रती दिधली मुक्ती । मरण
चुकले तात्यांचे ॥५४॥
ऐशा लीला असंख्य । वर्णू जाता
वाढेल ग्रंथ । हे स्वामीचरित्र
सारामृत । चरित्रसारमात्र येथे ॥
५५॥
जयाची लीला अगम्य । ध्याती
ज्याते निगमागम । सुर - नर
वर्णिताती गुण । अनादिसिद्ध
परमात्मा ॥५६॥
नानारुपे नटोनी । स्वेच्छे विचरे
जो या जनी । भक्ता सन्मार्ग
दाखवोनी । भवसागरी तारीत ॥५७॥
त्या परमात्म्याचा अवतार ।
श्रीस्वामी यति दिगंबर । प्रगट
झाले धरणीवर । जगदुद्धाराकारणे ॥
५८॥
त्यांची पदसेवा निशिदिनी ।
करोनी तत्पर सदा भजनी । विष्णू
शंकराचे मनी । हेचि वसो सदैव ॥५९॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत ।
नाना प्राकृत कथा संमत । सदा
परिसोत प्रेमळ भक्त । एकोणविसावा
अध्याय गोड हा ॥६०॥

॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment