स्वप्न शास्त्र -
आजकाल बऱ्याच ग्रुपवर अनेक जन आपल्याल्या पडलेली स्वप्ने सांगून त्याचे फल किंवा अर्थ विचारत असताना मी अनेक वेळा पाहिले आहे. यापैकी बऱ्याच व्यक्तींना स्वप्नशास्त्राचेही काही नियम आहेत याची जाणिव नसते. या शास्त्राच्या नियमाप्रमाणे सगळ्याच स्वप्नांचे फल अथवा अर्थ लावता येत नाहीत. काही विशिष्ट स्वप्नांचेच अर्थ व फलीत असते. अनेक स्वप्ने ही निरर्थक असतात. जसे की एखाद्या गोष्टीबद्यल अधिक विचार केला अथवा बोलले किंवा ऐकले तर त्याविषयीचे स्वप्न पडणे हे स्वाभाविक आहे म्हणून अशा स्वप्नांचा विचार करु नये. ते म्हणतात ना की, ’मनी वसे ते स्वप्नी दिसे’. स्वप्नांचे प्रकार, तिथी नुसार व रात्रीच्या प्रहरानुसार स्वप्नांचे फल, स्वप्नाचा फलद्रुप होण्याचा कालावधि इत्यादी विषयी काही बेसिक माहीती देत आहे. कोणती स्वप्ने विचारात घेऊ नये यासंबंधात भद्रबाहुसंहितेत हा श्लोक दिला आहे.
* स्वप्नमाला दिवास्वप्नोऽनष्टचिन्ता मय:फलम् !
प्रकृता-कृतस्वप्नैश्च नैते ग्राह्या निमित्तत: !!
स्वप्नमाला, दिवास्वप्न, चिंतेमुळे उत्पन्न स्वप्न, व्याधिग्रस्ततेने उत्पन्न स्वप्न, प्रकृतिच्या (वात-कफ-पित्तादी) विकाराने उत्पन्न व्याधींमुळे पडलेले स्वप्न हे स्वप्न फल पाहण्यासाठी विचारात घेऊ नये.
स्वप्नांचे प्रकार -
स्वप्नशास्त्रामध्ये मुख्यत्वे सात प्रकारच्या स्वप्नांचे विवेचन केलेले आहे. दृष्ट, श्रुत, अनुभूत, प्रार्थित, कल्पित, दोषज आणि भाविक अशा सात प्रकारची स्वप्ने असतात. त्यांच्या नांवाप्रमाणेच त्यांचे प्रकार आहेत. त्यांची व्याख्या खालिलप्रमाणे आहे.
१) दृष्ट - जे जागृत अवस्थेत पाहतो तेच स्वप्नात पहाणे हे दृष्ट स्वप्न.
२) श्रुत - जागृत अवस्थेत ऐकतो तेच स्वप्नात पहाणे हे श्रुत स्वप्न.
३) अनुभूत - जागृत अवस्थेत अनुभवलेल्या गोष्टी स्वप्नात पहाणे हे अनुभूत स्वप्न.
४) प्रार्थित - ज्या गोष्टी विषयी सतत आपण प्रार्थना करीत असतो त्याबद्यल स्वप्नात पाहणे हे प्रार्थित स्वप्न.
५) कल्पित - जागृत अवस्थेत ज्याची आपण कल्पना करीत असतो ते स्वप्नात दिसणे हे कल्पित स्वप्न.
६) दोषज - कफ-पित्त-वातादी दोषांमुळे आलेल्या विकारात किंवा व्याधिग्रस्त असताना पडलेले स्वप्न ते दोषज स्वप्न.
७) भाविक - वरील व्यतिरिक्त, अचानक ज्याविषयी ना पाहीले, न ऐकले असे अचानक स्वप्नात कही दिसले तर ते स्वप्न भाविक स्वप्न.
यातील पहिल्या सहा प्रकारची स्वप्ने ही निष्फळ ठरतात. केवळ भाविक हा एकच प्रकारच्या स्वप्नांचा विचार करायचा असतो व केवळ त्याचेच शुभाशुभ फळ पहायचे असते. *(पुढे येणारे सर्व विवेचन केवळ ’भाविक’ या स्वप्न प्रकारालाच लागू आहे.)
यावरुन हे लक्षात येईल की, सहज, अचानक पडलेल्या स्वप्नाचेच शुभाशुभ फलित पहावयाचे असते सरसकट सर्वच स्वप्नांचे नव्हे. स्वप्न पडल्यावर या गोष्टींचा विचार करावा की, जे स्वप्नात दिसले त्याबद्यल आपण हल्ली कधी चर्चा केली का ?, कधी कुणाशी बोललो का ? टि. व्ही. अथवा वर्तमान पत्रात पाहिले अथवा वाचले आहे का? आपण हल्ली याची कल्पना करत होतो का? स्वप्नात पाहिले त्याबद्यल सतत प्रार्थना करत होतो का ? असे असेल तर त्या स्वप्नाचा विचार शुभाशुभ फल पाहण्यासाठी करु नये. तसेच आजारी असताना अथवा व्याधीग्रस्त असताना पडलेल्या स्वप्नाचाही विचार शुभाशुभ फल पाहण्यासाठी करु नये. यानंतर स्वप्नाची वेळ व तिथी लक्षात घ्यावी कारण त्यावरच ते स्वप्न कधीपर्यंत, किती काळात आपले फळ देईल ते ठरते.
स्वप्नांचे फळ कधी मिळेल ?
रात्रीच्या प्रहरानुसार स्वप्नांचे फळ कधी व किती काळात मिळेल?
रात्रीचा पहील्या प्रहरातील स्वप्नाचे फळ एक वर्षात मिळते.
रात्रीचा दुसऱ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ सात ते आठ महीन्यात मिळते.
रात्रीचा तिसऱ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ तीन महीन्यात मिळते.
रात्रीचा चौथ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ एक महीन्यात मिळते.
ब्राम्ह मुहुर्तातील (उषाकाल) स्वप्नाचे फळ दहा दिवसात मिळते.
सूर्योदयाच्यापुर्वी (प्रात:काल) पडलेल्या स्वप्नाचे फळ अतिशिघ्र मिळते.
* वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे दिवास्वप्न (दिवसा पाहिलेले स्वप्न) विचारात घेत नाहीत.
तिथीनुसार स्वप्नांचे फळ कधी मिळेल ?
शु. प्रतिपदा - फल विलंबाने मिळते.
शु. द्वितिया - या तिथीला पाहीलेल्या स्वप्नांचे फल विपरीत मिळते. स्वत:साठी काही पाहील्यास ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडते तर दुसऱ्यांच्या बाबतीतील स्वत:साठी घडते.
शु. तृतिया - विपरीत व विलंबाने.
शु. चतुर्थी व पंचमी - या तिथीवरील फल २ महिने ते २ वर्षात फलदृप होते.
शु. षष्ठी ते दशमी - स्वप्न सत्य होते व शिघ्र फळ देते.
शु. एकादशी व द्वादशी - विलंबाने फळ मिळते.
शु. त्रयोदशी व चतुर्दशी - स्वप्न खोटे व निष्फळ ठरते.
पौर्णिमा - अवश्य फळ मिळते.
कृ. प्रतिपदा - स्वप्न निष्फळ ठरते.
कृ. द्वितिया - स्वप्न पूर्ण होते पण विलंबाने.
कृ. तृतिया व चतुर्थी - स्वप्न खोटे ठरते.
कृ. पंचमी व षष्ठी - दोन महीन्यानंतर व तीन वर्षाच्या आत फळ मिळते.
कृ. सप्तमी - नक्कीच शीघ्र फळ मिळते.
कृ. अष्टमी व नवमी - विपरीत फळ देते.
कृ. दशमी ते त्रयोदशी - स्वप्ने खोटी ठरतात.
कृ. चतुर्दशी - स्वप्न सत्य होते व शीघ्र फळ मिळते.
आमावस्या - स्वप्न खोटे ठरते.
लेखक - अद्न्यात ( कोणाला माहित असल्यास अवश्य सांगा. Credit दिले जाईल )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
No comments:
Post a Comment