Monday, 26 September 2016

पुण्यातील दुचाकी संस्कृती

आमच्या हातून "पुण्यातील दुचाकी संस्कृती" हा अभ्यासक्रणे पूर्ण झाला आहे. वेचक आणि वेधक असे दुचाकीस्वार:

*काकू*: हा वर्ग कोणत्याही शहरात सापडतो. पुण्यातला हा वर्ग जास्त उठावदार आहे. साडी, सनकोट, चेहरा पूर्ण झाकलेला, डोळ्याला चश्मा किंवा गॉगल अश्या अवतारात यांचा वावर असतो. पायाचा ब्रेक उत्तम ब्रेक ह्या उक्तीवर गाढ विश्वास. गाडीला आरसा असलाच तर चेहर्‍याकडे वळवलेला. ह्यांच्या वाटेत आलात तर डोळे वटारून पाहतात. सिग्नल वर समवर्गीयांना निरखून पाहणे हा आवडता छंद. एका काकूंच्या नंबरप्लेट वर "पतिची कृपा" असे लिहिलेले आमच्या पाहण्यात आहे.

*शीघ्रपलायनवादी*: सिग्नल वर उभे असतांना उजवा पाय ब्रेक वर ठेवून एक्सलरेटर ला उगाच वेठीस धरतात. टेबल फॅन प्रमाणे मान सतत हलती ठेवून चौकातल्या इतर वाहनांचा वेध घेत असतात. हिरवा सिग्नल पडायच्या १० सेकंद आधी हे शीघ्रपलायन तयारी पूर्ण होते आणि सुसाट वेगाने पुढच्या सिग्नल वर पोहोचतात.

*प्रेमवीर*: मागची सीट जवळपास रिकामी. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड दोघे एकाच सिट वर बसलेले असतात. सिग्नलवर आपापसात खुदुखुदू करणे, सेल्फी काढणे आदी प्रकार सुरू असतात. आजूबाजूस उभे असलेल्या वाहनधारकांचे बक्कळ मनोरंजन करतात.

*नवमावळे*: लिहावे तेवढे कमी. रॉयल एनफील्ड वर विराजमान. माणिकचन्द किंवा एकसोबिस-तिनसो ने ओठ रंगलेले. क्वचित प्रसंगी पोटाचा स्पर्श टाकीला झालेला असतो. ह्यांच्या नंबरप्लेटवर किंवा बाइकवर मोकळ्या जागेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, कधी कधी अहिल्याबाई शब्दरूपात किंवा चित्ररूपात आढळतात. धनुष्यबाण किंवा घड्याळ चिटकवलेले दिसते. बाणेदार वाक्यांची पखरण करणे हा आवडता छंद. उदा.: आले मरण पण नाही गेलो शरण; बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलाय वाघाने.. आदी. रस्त्याच्या मधोमध बाइक लावून चुन्याची ट्यूब आणायला जाणे आणि पानवाल्याशी 'आशिकी 2' वर गप्पा मारणे ह्यात हातखंडा असतो. सिग्नल वर ओळखीच्या रिक्षावाल्याला "कॅ भावड्या.." अशी साद देऊन रस्त्यावर पचकन् शिडकावा करून मागच्या हॉर्न वाजवणाऱ्या वाटसरूला खुन्नस देऊन मार्गस्थ होतात.

*शिस्तप्रिय*: असं काहीहीss नसतंच.

*फटफटीवाले*:  सायलेन्सर फाडलेला असतो. कधी कधी हातात वीडी काडी असते. सीडी हंड्रेड, यामाहा किंवा खुळखुळा झालेली पल्सर चालवतात. ट्रॅफिक मध्ये एक्सलरेटरला पीळ देत नागमोडी वळणाने सर्वाना ओव्हरटेक करणे ही खासियत. शीघ्रपलायन वर्गाचे पुढचे व्हर्जन. कोणत्याही सेकंदाला कुठेही सिग्नल मोडण्यात प्राविण्य.

*आप्पा*: हा वर्ग नामशेष होऊ लागला आहे. वयवर्षे ६० च्या पुढे. पेठांमध्ये अथवा कर्वे रोड, टिळक किंवा प्रभात रोडवर "थोरले बाजीराव सोसायटी/ गुणदर्शन अपार्टमेंट" किंवा तत्सम ठिकाणी वास्तव्य असते. तीर्थरुपांनी रिटारमेंटच्या पैश्यातून घेऊन दिलेली स्कूटर/ एम80 हाकत असतात. हॅंडलला कापडी पिशवी लटकत असते. आरश्यांनी माना टाकलेल्या असतात. डोक्यावर जुन्या धाटणीची टोपी असते. सिग्नल वर उभे असतांना एखाद्या यो यो हनीसिंगकडे "तुला 'गाडलं किंवा 'गीळलं पाहिजे" अश्या नजरेने पाहात असतात. ह्यांना शक्य असते तर ह्यांनी त्यांची नंबरप्लेट मोडी लिपित देखील बनवून घेतली असती.

*मिस युनिवर्स*: लेटेस्ट फॅशन चे कोणतेही कपडे. कोपरा पर्यन्त हातमोजे. गळयापासून संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला. अर्धा चेहरा व्यापेल एवढा मोठा गॉगल. गाडी चालवतांना फोनवर बोलणे आणि सिग्नलवर व्हॉट्सऍप हे ठरलेलेे. आरश्यातून मागच्या बाइकस्वाराकडे “माझ्याकडे पाहात तर नाही ना” हे पाहण्यासाठी पाहतात. ह्यांच्या मोबाइल स्क्रीनला स्क्रैचगार्ड लावलेला असतो पण डोक्यावर हेलमेट नसते.

ह्या व्यतिरिक्त पुण्याच्या वाहतूक संस्कृती बद्दलची काही इतर निरीक्षणे:

1. झेब्रा क्रॉसिंग हा फक्त रस्ता सुशोभिकरणाचा एक भाग आहे.
2. पुणे वाहतूक पोलिस आणि पुतळेवाल्या मादाम तुसॉ चे गुप्त टाय-अप आहे.
3. पीयूसी करणाऱ्या व्हॅन उभ्या करून पस्तावलेले लोक नंतर नीरा विकणे सुरु करतात.
4. पुण्यात हेलमेटचे दूकान टाकणे म्हणजे पंजाबात हेअर कटिंग सलून टाकण्या सारखे आहे.

अर्थात हा अभ्यासक्रम पूर्ण केला असला तरी त्यात उत्तीर्ण झालेलो नाही.

No comments:

Post a Comment