Sunday, 23 October 2016

दिवाळीचा फराळ

*दिवाळीचा फराळ*

दिवाळीच्या फराळाची दिवाळीत भरली सभा
लाडू आपला शिष्टासारखा मधोमध उभा.

चकली, करंजी , शेव सगळ्या बायका होत्या तोऱ्यात
लाडू, चिवडा, चिरोटा, अनरसा या पुरुषांना अपुरी पडली परात.

क्वचितच हजेरी लावणारे एकटे पडले कडबोळे

पण त्याच्या सोबतीला धावून गेले शंकरपाळे.

कुरकुरीत चकली दिसत होती उठून
तिच्या अंगावरचे तीळ दाखवत होती मिरवून.

झणझणीत चिवडा नाकी-डोळी लावत होता धार
पण दाणे, खोबरं, डाळ असा त्याचा पसाराच फार.

गोरी गुलाबी करंजी झाली होती देखणी
तिला पाहताच तिची सगळे करत होते वाखाणणी.

गुबगुबीत चिरोटा मूळातच फार नाजूक
त्याच्या जवळ येताच वास येत होता साजुक.

लाडू चिवडा दोघे मित्र बसले होते लगटून
छोटासा बेदाणा लाडू ला बसला होता चिकटून.

कडबोळे आणि शेव रंगाने मस्त
पण त्यांच्यामुळे फराळ होतो लगेच फस्त,

अधिक मासाचा लाडका अनारसाही होता हजर
जरा कमी आधिक झालं की त्याला लागते नजर.

असा हा फराळ दिवाळीची वाढवतो लज्जत
पण नीट नाही जमला तर बायकांची होते फज्जत

No comments:

Post a Comment