द्रौपदी स्वयंवर
उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती
तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती ?
छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली
रतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी
मऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी
धनुर्धरांच्या मनिंची आशा आव्हाना टपली
स्वयंवराचा भरला मंडप, गर्दी तरि ती किती !
देशोदेशचे जमले हो ते रणशार्दुल नृपती
भावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली
हत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी
सूतपुत्र अन् कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी
हीन कुळीचा म्हणुन तयाला संधी नच दिधली
इतुके होते तरिही कृष्णा कुणातरी न्याहळी
ब्राह्मणवेषें तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी
जिवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली
त्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला
अचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला
धनंजयाच्या गळां धन्य ती वरमाळा पडली
No comments:
Post a Comment