जातीचे प्रमाणपत्र ७६ रुपयांत घरपोच
जात प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दलालांना हजारो रुपये देण्याची तयारी नागरिक दर्शवितात. मात्र, हे प्रमाणपत्र बनविण्यासाठी १०० रुपयांच्या आतच खर्च येतो. अवघ्या ७६ रुपयांत जातीचे प्रमाणपत्र आणि ४६ रुपयांत उत्पन्नाचे प्रमाणपत्र घरपोच प्राप्त होत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मुदतीत प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी राज्यशासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश (२०१५) आणला. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढचे पाऊल टाकून घरपोच प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. असे असताना दलालांकडून प्रमाणपत्र बनवून घेण्याचे प्रमाण बंद झाले नाही. नागरिकांनी दलालांकडे न जाता नियमानुसार प्रमाणपत्र बनवून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रमाणत्रासाठी आता २९ गावांत शिबिर
बारावीचा निकाल लागल्यानंतर शहर व ग्रामीण भागात सेतू केंद्रांमध्ये जात प्रमाणपत्रासह विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे जिल्ह्यातील सहा उपविभागीय महसूल कार्यालयामार्फत २९ गावांमध्ये विशेष शिबिरांच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सेतू केंद्रावर आता जाण्याची आवश्यकता नसून महसूल उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रमुख प्रत्येकी चार ते पाच गावांमध्ये ३ जून ते ५ जूनपर्यंत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामधून विद्यार्थ्यांनी आपले प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, असे आवाहन कुर्वे यांनी केले.
घरपोच प्रमाणपत्रासाठीचे शुल्क (रुपयांत)
■ जात प्रमाणपत्र : ७६
■ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र : ७६
■ उत्पन्नाचे प्रमाणपत्र : ४६
■ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र : ९९
■ शपथपत्र : २३
No comments:
Post a Comment