*स्वयंपाक घरासाठी 166 टिप्स* KITCHEN TIPS 166
१. हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
२. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्याि खुसखुशीत बनतील.
३. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.
४. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.
५. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.
६. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.
७. डाळिंबीची उसळ शिजत असतांनाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबया आख्या राहतात व त्यांचे शिजून मेन होत नाही,तसेच डाळिंबया शिजाण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.
८. सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
९. साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.
१०. वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो.
११. वालाची (बिरडं/डाळिंब्या/पावटे) उसळ/भाजी करताना डाळिंबया पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ (हवा असल्यास) टाकावा अन्यथा त्या दाठरतात. (नीट शिजत नाहीत, तर दाणे टचटचीत रहातात)
१२. पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टीकच्या डब्यात किंवा कॅरीबॅगेत घालून फ्रिजमधे ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.
१३. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली, तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचेही पुष्कळ फायदे आहेत.
* वजन कमी करण्यास मदत होते.
* मधुमेह नियंत्रणात राहतो.
* कोलेस्टेरॉल कमी होते.
* पचनास मदत होते.
* छातीतील जळजळ कमी होते.
* काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये उपयुक्त.
* बाळंतिणीचे दूध वाढते.
* महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राखते.
* भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर.
* सौंदर्य प्रसाधन म्हणूनही वापरले जाते.
* केसांच्या समस्येवर उपयुक्त.
१४. कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यांत चिमूटभर मीठ टाकले व दोन थेंब लिंबाचा रस टाकला तर त्या छान हिरव्यागार राहातात.
१५. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांची हमखास साथ येते. अशावेळी पाणी नेहमी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून २-३ वेळा घ्यावे. यामुळे लवकर आराम पडतो.
१६. डोसा कुरकुरीत (क्रिस्पी) होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवतेवेळी तांदळात १ चमचा साबुदाणा व एक चमचा हरभर्यामची (चण्याची) डाळ व थोडेसे मेथीचे दाणे घालावेत , म्हणजे डोसे छान , मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी पीठ भिजवतेवेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे, म्हणजे इडल्या छान हलक्या व मऊ होतात.
१७. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते.
१८. ब्रेडक्रंप्स असेच बनवले तर ते मऊ होतात, त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हन मधे घालून कडक करावेत आणि मग ब्रेडक्रम्प्स बनवावेत. बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात.
१९. चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे. त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते.
२०. कुकरची रबरी रींग फ्रिजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रिजरमधे १५ मिनिटे ठेवावी, यामुळे रींग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते.
२१. लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रिज मधे ठेवल्यास चांगली टिकते.
२२. आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे कराव त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवल्यास आठवडाभर छान टिकते.
२३. हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो.
२४. टोमॅटो प्यूरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक टोमॅटो घेउन ते गॅसवर पांच मिनीटे उकळत्या पाण्यात ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून मिक्सर मधे प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रिज मधे ठेवावे. ७-८ दिवस झकास टिकते. (व्हिनेगर नसल्यास टोमटोची ही प्यूरी फ्रिजरमधे हवाबंद डब्यात ठेवावी)
२५. रव्याचे लाडू लवकर तयार व्हायला हवे असतील तर दोनतारी पाक करावा त्यामुळे दोन तासातच लाडू वळता येतात.रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा. त्यासाठी रवा जाडसर वापरावा.
२६. मिक्सरच्या ग्राइन्डरमधे वेलदोड्यांची पावडर करतांना कितीही फिरवला तरी बारिक होत नाही,म्हणून आख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतुन टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइन्डरमधे फिरवले तर त्यांची पटकन बारिक पावडर होते व वासही छान येतो.
२७. बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून ५ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. मधे एकदा उलट-पालट करायचे. (खालची बाजु वर). मग फ्रीज मध्ये ठेवुन द्यायचे. गार झाले की सालं पटकन काढता येतात.
२८. बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.
२९. बेसन व रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या १/३ तुपात मायक्रोमध्ये भाजता येतात.
३०. लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मूलांना पाव-भाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते.
३१. घरी कढवलेले तुप जर छान कणीदार व्हायला हवे असेल तर, कढवताना त्यामधे एक कण आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कढवुन झाल्या झाल्या त्या भांड्यावर झाकण टाकायचे. गरम असतानाच.
३२. फोडणीनंतर आमटीवर / मिसळीच्या रशयावर तर्री / तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर (चिमुटभर) घातली की आमटीला / रश्य्याला तेलाचा तवंग येतो..
३३. अर्धबोबडे दाण्याचे कुट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खूप दाणे नका घालू. थोडे थोडे दाणे घालून (म्हणजे साधारण मुठभर एकावेळी ) दोन-तीन वेळा ऑन ऑफ करत फिरवले तर अर्धबोबडे दाण्याचे कुट मिळेल.
३४. भाजलेल्या दाण्याची साले काढू नयेतच. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे अॅणन्टीऑक्सिडन्ट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे सालं खावीत.
३५. कापल्यावर सफरचंदाला थोडसं मीठ चोळलं तर काळं न पडता तसंच रहातं सफरचंद.
३६. आप्प्यांच्या पिठात अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पेपात्राला चिकटतही नाहीत.
३७. घट्ट वरणात (म्हणजे शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात) चिरलेला कांदा+ तिखट + मीठ + गोडा मसाला+ कोथिंबीर घालून मस्त तोंडीलावणे तयार होते. पोळी/ भाकरीबरोबर झक्कास व झटपट!! यालाच गोळा-वरण म्हणतात..
३८. उरलेल्या शिळ्या भातात कांदा, कोथिंबीर , हरवी मिरची , मीठ , चाट मसाला , १ चमचा धण्या-जीर्याचची पूड, दोन चमचे तांदळाचं पीठ घालून ,थोडे पोहे व दही घालून तास-दोन तास भिजवून ठेवायचे अणि त्याचे वडे तळायचे किंवा मस्तपैकी थालिपीठं लावायची.
३९. ज्यांना लसुणचा स्वाद आवडतो, त्यांच्यासाठी – नेहमीची फोडणी करुन त्यात लाल तिखट टाकुन लसुण पेस्ट टाकायची, मग वरुन मोकळा केलेला भात घालुन परतायचा.
४०. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायमच मंद आचेवर तापवायचं. तापवलं की संपूर्ण झाकायचं नाही, थोडीशी फट ठेवायची. आणि ते दूध खोलीच्या तापमानाला आलं की फ्रिजमध्ये टाकायचं, ४-५ तासात सायीचा थर अजून जाड होतो.
४१. दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचे वाटण लावायचे, अगदी मस्तच लागते ही बंगाली पद्धतीची भाजी.
४२. इडली-डोशाचे पीठ जर पीठ नियोजित वेळेआधी फर्मेंट झाले (म्हणजे इडली/डोसा करायला अजून बराच वेळ आहे) तर त्यात मीठ घालून ढवळून घ्यावे. फ्रीजमध्ये ठेवावे.
४३. साबुदाणे धुवुन, त्यात साबुदाण्याच्या वर एक पेर (बोटाचे) गरम पाणी घालून रात्रभर भिजवावेत ,
किंवा निम्मे दूध, निम्मे पाणि घालून भिजवावेत.
४४. लसूण गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा --साले लवकर सुटतात !
४५. उकळतानां दुध घातल्यानंतर चहा उतु जाऊ नये म्हणून त्यात गाळणं घालून ठेवावे... चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर जात नाही.
४६. मूळव्याध: पांढरे तीळ कच्चे मिक्सरवर बारीक करणे; १ मोठा चमचा दह्यात ही पूड घालून सकाळी ऊठल्यावर खाणे.८ दिवसात बरे वाटते.आहार तिखट नसावा.
४७. वड्या झाल्याचे ठोक ताळे म्हणजे कढई चा तळ दिसायला लागला, मिश्रण उलथन्या वरून एकादमात पडले कि वडी झाली असे समजावे.
४८. दम्यासाठी मुलांना पण चालेल असे औषध; पिंपळाची वाळलेली साल कुटून वस्त्रगाळ करणें. कोजागिरीला शरदाच्या चांदण्यात दुधात १ मोठा चमचा ही पूड घालून ठेवणे.पहाटे हे दूध पिणे.बरे वाटते.
४९. आठ दिवस सुरणाची भाजी खाल्याने मूळव्याध कायमची गायब होऊ शकते.
५०. नवजात बालकांना जर गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी थोडे थोडे तोंडावते न देता पोटावर चोळत राहिले तरी आराम पडू शकतो.
५१. अत्यंत लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी महत्वाची टिप :
साबुदाणे भिजवताना पाण्यात चार मोठे चमचे ताक व लागेल एवढे मीठ घालावे. खिचडी फोडणीला घातल्यानंतर पांच मिनिटांत तय्यार होते. गॅसजवळ उभे राहून दहा बारा वेळा ढवळले असता बघता बघता खिचडी फुलुन येते. वेळेच्या आधी गॅस बंद करावा कारण गरम भांड्यात ती शिजतच असते.
५२. नेहेमी ची कांदा टोमाटो ची कोशिंबीर ,कोथिंबीर,जरा तिखट सर --त्या मध्ये चीज किसून घाला मस्त लागते.
५३. नेहेमीची केळ्याची शिकरण --पण त्यातील एखादे केळे मिक्सर मध्ये पेस्ट केले आणि नारळाच्या दुधात शिकरण केली -सोबत जायफळ ,वेलची चा स्वाद ,--आणि शाही पणा साठी केशर सिरप ,बदाम काप/पूड ,पिस्ता काप (ऐच्छिक )—की झाली शाही शिकरण!!
५४. नेहेमी चे साखर घालून दुध --त्यात बदाम पावडर,केशर सिरप,काजू पावडर ,पिस्ता काप, वेलची /जायफळ स्वाद --शाही मसाला दुध !
५५. डोसा क्रिस्पी होण्यासाठी भिजवताना तांदळात १ चमचा साबुदाने व एक चमचा चण्याची डाळ घालावी, मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी तांदळात थोडे मेथी दाने घालावे, छान मऊ होतात.
५६. मुठभर कुरमुरे घालून वाटल्याने पण इडल्या हलक्या होतात आणि एक टेबलस्पून लोणीही घालावे.
५७. केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी ४-५ दिवस जास्त टिकतात. आपण केळी एकाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवली तरी ही वरुन जरी काळी दिसली तरी आत उत्तम रहातात .....किमान ४,५ दिवस !
५८. अॅासिडीटी वर एक अगदी सोप्पा उपाय. सकाळी एक चमचा निवळी प्यायची. झाले, एका दिवसात अॅसिडीटी बरी होते.
निवळी बनवण्यासाठी विड्याच्या पानाला लावायची चुन्याची ट्यूब आणून रात्री तांब्याभर
पाण्यात पिळायची व ढवळून झाकून ठेवून द्यायची. सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे. हीच ती निवळी.
५९. पुर्याए खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळतांना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.
६०. प्लॉवर शिजवतांना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे प्लॉवर पाधारा शुभ्र व तजेलदार रहातो.
६१. ब्रेडक्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाईस च्या ऐवजी टोस्ट किवा कडक पाव वापरा ! एकदम फाईन ब्रेडक्रम्स होतात.
६२. हिरव्या मिरच्या विकत घेताना (जाड्या /लांब मिरच्या ) बरोबर थोड्या तिखट छोट्या मिरच्या पण घ्या कारण कधी कधी मोठ्या मिरच्या अजिबात तिखट नसतात --त्या वेळेला आपला अंदाज चुकतो --त्या वेळेला या तिखट मिरच्या कामाला येतात .- मिरची तिखट निघाली तर ती मिठा बरोबर चुरडून घालू नका --तिचा तिखट पणा वाढतो -मीठ वेगळे घाला आणि मिरच्या चे तुकडे वेगळे घाला --भाजीत/आमटीत घालणार असल्यास मोठे तुकडे घाला आणि जास्त उकळू देऊ नका काढून टाका.
६३. कोथिंबीर घेताना तिची मुळे ताबडतोप कापून टाका -बरेच दा कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवतात आणि ती कोथिंबीर मुळच्या ठिकाणी सडलेली असते -जर मुळे कापली नाहीत तर सगळी कोथिंबीर लवकर सडून जाते.
६४. कोथिंबीर च्या काड्या आणि पाला वेगळा निवडून ठेवा . काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाण्या एव्हडे त्यांचे बारीक तुकडे करून ठेवा . आणि ते एखाद्या बिन झाकणाच्या डब्यात ठेऊन फ्रीज मध्ये एक दोन दिवस ठेवा म्हणजे सुखून जातात .नंतर झाकण लावून ठेवा बरेच दिवस टिकतात , या काड्यांनाच जास्त चव आणि स्वाद असतो . बारीक कापलेल्या काड्या फोडणी मध्ये ,चटणी करताना वापरा,फक्त डेकोरेशन साठी पाला बारीक चिरून वापरणे चांगले.
६५. अमूल बटर पेक्षा अमूल लाईट वापरणे चांगले --प्रकृती साठी आणि खिश्या साठी !--चवीत फारसा फरक नाही.
६६. दुध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्या मध्ये सोडा किवा साखर घालून ठेवा ( सोड्या पेक्षा साखर बरी ) (मात्र चहा /कॉफी साठी वापरायचे असेल किवा दुधाचा गोड पदार्थ करायचा असेल (खीर) तर ही दुध टिकवण्यासाठी अगोदर घातलेली साखर विचारात घ्या)
६७. कॉफीप्रेमींसाठी :इंस्टंट कॉफी व साखर यांच्या मिश्रणावर एखादा चमचा गरम पाणी घालून मग वरून दूध घालावं... दूध जमेल तेवढं उंचावरून घालावं.सुंदर स्वाद व फ्लेवर येतो.
६८. इंस्टंट कॉफी , साखर आणि दुधाची पावडर मिक्सर मध्ये बारीक/एकजीव करा ! कपात घेऊन त्यावर गरम पाणी / दुध घालून ढवळा.
६९. बेसन लाडू करताना बेसन चांगले भlजावे,साखरेचे प्रमाण बरोबर असावे,साखर जास्त झाल्यास मिश्रण चिकट होते त्या मुळे लाडू घश्याला चिकटतो.
७०. शंकर पाळे कुरकुरीत होण्या साठी २वाटी मैदा असेल तर १/४ वाटी corn flour किवा बदामाची बारीक केलेली पावडर वापरावी .
७१. चिवडा कमी तेलकट करण्य साठी तो olive oil मध्ये बनवावा किवा ५० degree ला ओव्हन मध्ये १/२ तास ठेवावा.
७२. साबुदाण्याची खिचडी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट झाल्यावर त्यात २ चमचे दुध घालावे.
७३. शिरा आणि लाडू करताना पाणी किवा साखरेत थोडे तूप घालावे ,त्यामुळे पदार्थ मऊ होतो .
७४. पोहे करतानाच त्यात वाटी भर चुरमुरे भिजवून घालावेत त्यामुळे पोहे मुलायम मसाल्याचा वास व ताजेपणा टिकून रहाण्यासाठी बरणीत / डब्यात मसाला होतात व थंड झाल्यावरही वातड होत नाहीत .
७५. भाजी,डाळी , कडधान्ये व पुलाव करताना त्यात पुदिन्याची पाने घालावी त्यामुळे त्या पदार्थाची पाचकता वाढते .
७६. भरतेवेळी मसाल्यात मधून मधून हिंगाचे खडे ठेवावेत.
७७. खमण ढोकळा कूकरमध्येसुद्धा करता येतो.फक्त कूकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा व ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कूकर बंद करू नये. किंवा कूकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कूकरवर झाकणासारखी ठेवावी.
७८. चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
७९. चकली भाजणीसाठी वापरायच्या सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.
८०. आपल्याला आवडत असल्यास आपण उकडीच्या मोडकांच्या सारणांत काजू-बदामांचे पातळ काप घालू शकतो.
८१. तळणीचे मोदक करतांना पारीचे पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्याेचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.
८२. तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.
८३. पोहे तळायला खोलगट बारीक जाळी असलेला झारा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम तुपात बुडवून पोहे तळावेत. ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्तवेळ तळल्याने जळणार नाहीत.
८४. आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण-भाताचे त्यात गव्हाचे,डाळीचे पीठ,तिखट,मीठ,हळद जिरेपूड,चिरलेला कांदा,लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला खूपच छान लागते.
८५. रात्रीच्या उरलेल्या भाताचा आपण सकाळी फोडणीचा भात करतो त्यावेळी जर मेतकूट हाताशी असेल तर भातात ते वापरता येईल.फोडणीत काजू घातले तरी चालतील.त्याखेरीज राजमा, मटार, गाजराचे तुकडे, फरसबी इ. भाज्या घालूनही भाताला वेगळेपण आणता येईल.मेतकूटामुळे भाताला पिवळसर छान रंग येतो व त्यामुळे फोडणीत हळद घातली नाही तरी चालते.
८६. गुळाच्या पोळ्या करतेवेळी पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ पारदर्शक नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात आही असे झाले तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.
८७. ३-४ दिवस लिंबे ताजी रहाण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावीत. वापरते वेळी फ्रिजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरावीत.
८८. पाहुण्यांसाठी किंवा पार्टीसाठी पचडी करायची असेल तर आधीपासून फक्त पचडीतील घटक भाज्या चिरून ठेवाव्यात. पचडीत लिबाचा रस,साखर,मीठ आणि फोडणी आयत्यावेळी घालणे. जर पूर्ण पचडी आधी करून ठेवली तर ती पांचट व पाणीदार व बेचव लागते,त्यावर हा उत्तम उपाय आहे.
८९. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.
९०. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.
९१. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इ. भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.
९२. अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.
९३. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
९४. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.
९५. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.
९६. गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.
९७. सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.
९८. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.
९९. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.
१००. पराठ्यांसाठी पीठ भिजवतांना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे जास्त व मस्त खुसखुशीत होतात.
१००.कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापराल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत.
१०१. बर्या च जणांना कढीपत्ता उपमा /पोहे खाताना तोंडात आलेला आवडत नाही ,चिवड्यातसुद्धा नाही आवडत.आमटी/कढी /सांबर /रसम या मध्ये देखील नको ,अश्या वेळी कढीपत्ता पाने स्वरुपात न घालता अखंड कधीपत्त्याचा टाळा घाला आणि अश्या लोकांच्या वाट्यात तो येणार नाही हे बघा (काढून टाकून ), -खरे म्हणजे कढी पत्त्याला खूप आयुर्वेदिक महत्व आहे आणि तो चावून खावा असे सांगितले जाते --असो ! -कढी पत्ता हा फोडणी मध्ये शेवटी घालावा आणि गॅस बंद करावा --कढी पत्ता जळू /करपू देऊ नये --आणि जरी तो नंतर काढून टाकला (अख्खा टाळा) तरी स्वाद फोडणी मध्ये मुरतोच . आणि हा काढून टाकलेला टाळा नंतर आमटी /कढी /सांबार /रसम उकळत असताना त्यात घालावा --फोडणी पेक्षा उकळलेला कढी पत्ता जास्त स्वाद देऊन जातो.केरळीय लोक कढी पत्ता कधीच फोडणी मध्ये घालत नाहीत ,कायम उकळताना अक्खा टाळा घालतात.
१०२. खास टोमॅटो टिप्स : टोमॅटोचे वरचे साल काढण्यासाठी ५-१० मिनिटे टोमॅटो गरम पाण्यात ठेवावा, साल चटकन निघते. टोमॅटो जर जास्त मऊ /लिबलिबीत झाले असतील तर एका भांड्यात गार पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून व त्या पाण्यात टोमॅटो रात्रभर ठेवा,सकाळी टोमॅटो टणक व ताजे झालेले दिसतील.
१०३. कापून फोडी करून ठेवलेले सफरचंद काळे/तपकिरी पडू नये म्हणून ते मिठाच्या गार पाण्यात ठेवावे.
१०४. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.
१०५. सूके गोटाखोबरे तूरडाळीत खुपसून ठेवले तर बरेच दिवस छान टिकते खराब होत नाही.
१०६ रस्सा भाज्या जास्त मीठ पडल्यामुळे खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारटपणा कमी होतो.
१०७. लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.
१०८. कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.
१०९. बटाटे झटपट उकडण्यासाठी पाण्यात चिमुटभर हळद घालावी.
११०. हिंगाचा वास टिकवा म्हणून हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.
१११. वर्षाचे डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ,तांदूळास बोरिक पावडर चोळून लावून मग भरावे .(मेडीकलच्या दुकानात पार्या्च्या गोळ्या मिळतात त्या ठेवल्या तरी चालते पण त्या फारच विषारी असल्याने डाळ तांदूळ वापरावयास काढतेवेळी त्यात त्या गोळ्या आल्यात कां ते पाहून काढून टाकाव्यात)
११२. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.
११३. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकण्यास मदत होते.
११४. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही.
११५. पुर्यांशसाठी कणीक भिजवतांना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुर्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.
११६. रात्री छोले भिजत घालतांना जर त्यांत मूठभर हरभरता डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात.
११७. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
११८. कढीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ती बराच दिवस टिकतात.
११९ गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून,मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.
१२०. कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी दररोज बदलावे.
१२१. पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
१२२. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोनचिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे साले लवकर सुटतात.
१२३. भजी,पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजावताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे.
१२४. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
१२५. भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
१२६. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
१२७. पुदीना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात ,पाणी-पुरीचे पाणी करतेवेळी उपयोगी पडतो.
१२८. एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
१२९. पावसाळयात मिठाला पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
१३०. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
१३१. शिळा ब्रेड कडक उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
१३२. फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
१३३. आपण दररोज ठराविक भांड्यात आपण चहा करतो. त्यास पडलेले चहाचे डाग जात नाहीत. म्हणून ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
१३४. पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.
१३५. जर हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असेल तर चणा डाळीचे (बेसन) पीठ चोळावे आणि साबण लावून हात धुतल्यानंतर वास जातो.
१३६. ताक आंबट असल्यास त्यात अर्धा कप दूध घालून ठेवावे. आंबटपणा कमी होईल.
१३७. ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
१३८. ड्राय फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.
१३९. कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
१४०. कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात एक चिमुटभर मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.
१४१. भाकरीचे पीठ जुने झाल्यास विरी गेल्याने भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी कडकडीत पाण्यात भाकरीचे पीठ भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.
१४२. पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाची पळी गरम करून तिच्यात कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा होतात.
१४३. हिवाळयात डोश्याचे पीठ आंबवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.
१४४. लसूण किंचित गरम केला तर पाकळ्यांची साल लवकर सुटते.
१४५. हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.
१४६. कापलेले सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावावा.
१४७. लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राय पॅन मधे कढवावे. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.
१४८. लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरल्यास खव्यासारखी चव येते.
१४९. वड्या करताना मिश्रण जास्त सैलसर झाले तर त्यांत मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
१५०. करंजी, शंकरपाळी, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो साज्क तुपाचे मोहन वापरावे त्यामुळे पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
१५१. अनारसे तुपात टाकल्यानंतर विरघळू लागले तर मिश्रणात थोडी तांदळlची पीठी मिसळlवी.
१५२. अनारसे तळताना जर अनारशांना जाळी कमी पडत आहे असे वाटले खसखशित थोडी पिठीसाखर घालून त्यावर अनारसा थापावा.
१५३. घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे किंवा अद्याची टरफले ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
१५४. घराच्या सगळ्या कोपर्याकत बोरिक अॅासिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या व झुरळे येणार नाहीत.
१५५. मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राईंड कराव.
१५६. कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
१५७. आलं फ्रीज मध्ये ठेवलं तरी बऱ्याचवेळा खराब होतं . ते चांगलं रहावं म्हणून त्याची माती चोळून चोळून अगदी स्वच्छ धुवून टाकावे , नंतर दिवसभर फडक्यावर पसरून सावलीत वाळवावे (अगदी कोरडे करायचे नाही ) आणि झिप लॉक पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे . महिनाभर सहज टिकतं.
१५८. पावसाळ्यात दमट हवेमुळे नमकीन (फरसाण ) मऊ पडतं आणि त्यामुळे कोणीही खायला तयार नसते , अशा वेळी त्याचा वापर करून नमकीन चे कटलेट करावे . छान लागतात.
१५९. कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याअगोदर त्यात एक लहान लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये पसरणार नाही.
१६०. मशरूम (अळिंबी) हे एखाद्या स्पंज सारखे असल्याने पाण्यांत घालून धुतले तर पाणी शोषून घेतात,म्हणून
मशरूम स्वच्छ करतेवेळी एखाद्या ओल्या मऊ सुती कपड्याचा वापर करुन हळुवारपणे फक्त पुसून घ्यावेत.
१६१. चिवड्यासाठी पोहे चाळून घ्यावेत म्हणजे चुरा राहणार नाही. चिवड्यासाठी पोहे भाजताना पटकन जळतात / करपतात व त्यामुळे चिवड्याला जळका / करपट वास येतो. हे टाळण्यासाठी पोहे काळजीपूर्वक मंद आंचेवर भाजावेत व प्रत्येक वेळी पोहे भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती कोरड्या सुती फडक्याने स्वच्छ पुसून घेऊनच मगच दुसरे पोहे भाजावेत.
१६२. आळूच्या पानांचे वाफवलेले रोल / वळकटी गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभरात हवी तेव्हा अळुवडी तळून खाता येते.
१६३. कारल्याच्या लोणच्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरावी, फिकट पोपटी रंगाची मिरची लोणच्यास विशेष चव तर देत नाहीच शिवाय लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
१६४. जर स्वच्छ व शुद्ध बर्फ हवा असेल तर बर्फाच्या ट्रेमध्ये बर्फ होण्यासाठी घालायचे पाणी आगोदर उकळून व गार करून घ्या.
१६५. मुंग्यांचा त्रास होत असेल तर काकडीची साले (मुंग्यांना काकडी आवडत नाही) मुंग्या जेथून येवात त्या बिळाजवळ ठेवा.
१६६. कपड्याला लागलेला च्युईंगम काढण्यासाठी,धुवायला टाकण्यापूर्वी तो कपडा एक तास फ्रिजरमध्ये ठेवावा. 👥👥👥
No comments:
Post a Comment