Saturday, 2 December 2017

श्री दत्त जन्म चरित्र

🌹 *श्री दत्त - जन्म - चरित्र* 🌹

*॥ आर्या ॥*
सद्गुरुपथ दावाया अज्ञजना ईश जगतिं अवतरला ।
अत्री महाऋषींच्या उदरीं घेऊन दत्त नामाला ॥१॥
दत्तावतारास निमित्त झालें तें असें :
*॥ दिंडी ॥*
विणा स्कंधी घेऊन नारदानें ।
गमन केले कैलासी आदरानें ॥
सत्य लोका वैकुंठि पुढें गेला ।
तिन्ही देवा वृत्तांत कथन केला ॥२॥
भूलोकींचा वृत्तांत सांगत असतां महासाध्वी अनसूयेची नारदांनीं मोठी महती गाइली.
*॥ कटिबंध ॥*
भूवरी सती ती खरी, विप्रसुंदरी, सगुणगुणखनी ।
सत्वास तिच्या वानिता थकली श्रुतिवाणी ॥
अनुसया शोभते नांव, पतिपदी भाव, शुद्ध अत्यंत ।
स्त्रीधर्म सर्व जाणते तीच जगतांत ॥
( चाल ) तिजपुढें पाड कवणाचाही नसे ।
रवितेज अशापरी नाकीं हें जसें ॥
सांगता जगतिं कवणा ना येतसे ॥
त्यापरी तियेची स्थिती, रमा पार्वती, लघू ठरतील ।
तिजपुढें महेशा, मदिय रोकडे बोल ॥३॥
*॥ दिंडी ॥*
नारदाच्या या अशा भाषणानें ।
हास्य केलें कौतुकें शंकरानें ॥
परी आलासे क्रोध पार्वतीस ।
त्याच परी हो सावित्री इंदिरेस ॥४॥
*॥ श्लोक ॥*
देवांगना आम्ही तिघी आमुच्या पुढारी ।
हा वानि नारद मुखीं कशि मर्त्यनारी ॥
मोरास काय कधीं कुक्कुट लाजवील ।
रत्नास गार लघुता कधिं कां आणील ? ॥५॥
*॥ ओवी ॥*
मग तिघीजणींनीं । संगनमत ते करोनी ।
अनुसयेचें सत्व पहाण्यालागुनी । विधी हरिहर पाठविले ॥६॥
आपल्या पतीस त्या म्हणाल्या,
*॥ आर्या ॥*
तुमच्या समक्ष आमुचा केला अपमान नारदानें या ।
यास्तव अनसूयेचें सत्व हरा भूस शीघ्र जावुनिया ॥७॥
*॥ लावणी ॥*
शंकर म्हणे पार्वती हट्ट न करी ।
अनसुया थोर अधिकारी, करूं नको तिची बरोबरी ॥
मत्सर काजवा जसा दिपाचा करी ।
वा श्वान भुंकण्या लागे, पंथांत गजपतीवरी ॥
त्यापरी तुझा हा यत्न समज अंतरीं ।
धाडिसी कशाला तेथें गणु म्हणे बसूं दे घरीं ॥८॥
*॥ ओवी ॥*
येणेंच रिती विधात्यानें । कथिलें सावित्री कारणे ।
लक्ष्मीसी नारायणे । ऐसेंच केलें संभाषण ॥९॥
*॥ दिंडी ॥*
परि त्याचा उपयोग मुळिं न झाला ।
भाग जाणें पडलेंच त्रिवर्गाला ॥
प्रपंची या श्रेष्ठत्व कामिनीचे ।
ब्रह्म झालें स्वाधीन प्रकृतींचे ॥१०॥
पत्नीच्या हट्टासाठीं तिघेहि अनसूयेचें सत्व पहाण्यासाठीं भूलोकीं आले.
*॥ पद ॥ ( वामना )*
भूवरी विधी हर हरी, आले सत्वरी, धरून वेष ।
सत्व साध्वीचें पाहण्यास हो ॥ अंगणी ॥
अंगणी उभे राहिले, सतिस बाहिले, वचन बोलले भीक घाली ।
नय होऊन अम्हा वहिली गे ॥ अनसुये ॥
अनसुये वेळ करूं नये, चित्त असु नये; तुझें दु:खी ।
तरिच तूं साध्वी तिन्ही लोकीं गे ॥ यापरी ॥
यापरी वटुन वैखरी, विधी हरहरी, स्वस्थ ठेलें ।
तेथ साकडे सतिस पडले हो ॥ गणु म्हणे ॥११॥
अनसूया मनांत म्हणते,
*॥ पद ॥ ( नृपममता )*
जरि नाहीं म्हणू मी यास ।
तरि हानि होय सत्वास करूं कसें ॥
कशि जाउं नग्न होऊन ।
या लागिं वाढण्या अन्न ॥ ’
( चाल ) विपरीत कृती ही परी, कशि करुं तरी, सांग सत्वरी ।
विभो भगवंता । गणु म्हणे पंढरीनाथा ॥१२॥
*॥ ओवी ॥*
ऐशी झाली आड विहीर । अनसूयेसी साचार ।
परी पोक्त करुनी विचार । ऐसें तिनें ठरविलें ॥१३॥
*॥ अभंग ॥*
ज्याअर्थीं अतिथी मज नग्न व्हाया । सांगती ये ठाया अवर्जून ॥
त्याअर्थी नसावे हे कोणी सामान्य । अधिकारी पूर्ण ब्रह्मांडाचे ॥
मातेसी बालक नग्नची पाहतो । तया न लागतो दोष त्याचा ॥
यांची इच्छा माझी बालकें व्हायाची । आहे मनीं साची कळून आले ॥१४॥
*॥ आर्या ॥*
ऐसा विचार करुनी झाली ती नग्न शीघ्र वेल्हाळा ।
अनुपम तेच तियेचें धैर्य घनाची विराजली चपला ॥१५॥
*॥ ओवी ॥*
एक्या करीं अन्नपात्र । एक्या करीं पतीचें तीर्थ ॥
घेऊन सिंचिले त्रिवर्गाप्रत । बालकें करून टाकिली ॥१६॥
अशा रीतीनें तीन बालकें होतांच बालकरूप झालेल्या त्रिवर्गाचे तिने नामकरण केलें.
*॥ श्लोक ॥*
दुर्वास नाम दिधलें सतीनें शिवाला ।
तैसेंच चंद्र बुधहो चतुराननाला ॥
श्रीपंढरीश भगवान हरि जो रमेश ।
श्रीदत्त नाम दिधलें नमुनी पदास ॥१७॥
*॥ कामदा ॥*
बालकें तिन्ही अंकि घेउनी । खेळवी तया गीत गावुनी ॥
तुम्हि अहा तिघे जगत सोयरे । जाहला परी माझी लेकरें ॥१८॥
*॥ पद ॥ ( मित्रा मम )*
येउनिया अत्रि ऋषी बोलुं लागले ।
म्हणति कुणाची ही तुवं आणियली मुलें ॥
सती बोले तुम्हीच पहा ज्ञान दृष्टीनी ।
ही जन्मा आली इथें जननी वाचुनी ॥१९॥
*॥ श्लोक ॥*
कांतेचें वच ऐकतां निजमनीं अत्री ऋषी तोषले ।
प्रत्येका निरखोनिया आतुरतें प्रेमे बघूं लागले ॥
भार्ये हे आदिदेव साच असती ब्रह्मांड उत्पादिते ।
झाले कुंठित यास पाहुनि पहा वानावया देव ते ॥२०॥
नारदानें हें वृत्त वैकुंठलोकीं जाऊन विदित केलें.
*॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )*
रमे उमेला सावित्रीला खिजवी नारदमुनी ।
फ़िरा गे पती कटी घेउनी ॥
अनुपम जोडा दिसेल तुमचा जा या पति घेउनी ।
निजवा पय त्याप्रति पाजुनी ॥
अनसूयेनें बरेंच केलें चिरली नाके पूरी ।
आतां तरी सावध व्हा अंतरीं ॥
( चाल ) अभिमान जगीं या नच कोणाचा टिके ।
जा चरण धरा साध्विचे जाउनी सुखे ॥
पडणार पितळ गे सोन्यापुढती फ़िके ॥
अत्रीजाया साध्वी अनसूया एकचि या त्रिभूवनी ।
नाहीं अन्य तिच्याहुनी कुणी ॥२॥
*॥ आर्या ॥*
चिडल्या नारद वचनें आल्या पहाण्या तिघी खरें खोटें ।
ऋष्याश्रमीं शिराया परि वाटे भय मानसी मोठें ॥२२॥
आश्रमांत येतांच, रमा, उमा, सावित्रीला अनसूया हंसत हंसत म्हणाली,
*॥ लावणी ॥ ( भूपाळीची )*
भिऊं नका निर्भय मनानें येउन येथें बसा ।
मुली तुम्हाला कांहीं न करी मी हा धरणें भरंवसा ॥
ओळखुन घ्या नवरे आपुले मजवरती ना रुसा ।
ओळख पटल्या बरेंच झालें, नच पटल्या मज पुसा ॥२३॥
प्रयत्न करूनहि तिघींना आपापला पती ओळखतां आला नाहीं. अभिमान सोडून तिघी सती अनसूयेस म्हणाल्या,
*॥ श्लोक ॥*
आम्ही प्रकृति शुद्ध ज्ञान अमुच्या वांट्यास ना या जनीं ॥
त्यातें जाणती एकची अनुसये सद्भक्तचूडामणी ॥
आतां अंत न पाहतां निवडुनी द्यावे पती सत्वरी ।
ऐसें बोलुन लोळल्या तिघी तिच्या जाऊन पायावरी ॥३४॥
त्यांच्या मागणीनें प्रसन्न होऊन,
*॥ ओवी ॥*
घेऊन पतीचें चरण तीर्थ । सिंचन केलें बालकाप्रत ॥
तै ते प्रगटले मूर्तिमंत । विष्णू, पिनाकी, विधाता ॥२५॥
*॥ दिंडी ॥*
पती तिघीचे देवून तिघीलाही ।
साध्वी झाली दु:खीत मनाठायीं ॥
नग्न होऊन म्या भीक वाडियेली ।
तयाची कां पूर्तता अशी झाली ॥२६॥
*॥ ओवी ॥*
अत्री ऋषी त्यावर । तिघा करुनी नमस्कार ॥
करितां झाला मधुरोत्तर । येणें रिती पहा ते ॥२७॥
*॥ श्लोक ॥*
जे थोर ते सत्त्व पहावयाला ।
येती परी ना करिती छळाला ॥
तुम्ही तिघे या जगतांत मोठें ।
जाता परी कर्म करून खोटें ॥२८॥
यावर त्रिमूर्ती म्हणाले,
*॥ श्लोक ॥*
हताश मनिं व्हा न हो मुनिवरा वरा मागणें ।
आम्ही न जरि तो दिला तरिच दोष हा लावणें
तुम्हा उभयताप्रती आम्ही प्रसन्न झालों पहा ।
सती अनसुया शुची विमल कीर्ति साध्वी महा ॥२९॥
अत्री म्हणाले,
*॥ श्लोक ॥*
तिघासारखा पुत्र व्हावा अम्हासी ।
नसावा परी एकही दोष त्यासी ॥
असें ऐकतां देव चित्तांत धाले ।
झणीं कौतुका यापरी तेथ केलें ॥३०॥
*॥ पद ॥ ( भूपाळी )*
सत्त्व गुणाचे दैवत श्रीहरी दत्तात्रय बनला ।
विधि शंभूच्या घेउन अंशा भूवर अवतरला ॥
षट् कर तैसें तीन शिरें ही लीलेनें धरिली ।
शूल शंख करीं चक्र कमंडलू बगलेसी झोळी ॥
दत्त दिगंबर जो विधिहरिहर पाहुनी मुनि धाला ।
दासगणूचें नमन असो त्या निशिदिनी पदकमला ॥३१॥
*॥ आर्या ॥*
हेमंती मृगशीर्षी संध्याकाळीं प्रदोष समयाला ।
पदनत रक्षक ऐसा दत्त प्रभू पौर्णिमेस अवतरला ॥३२॥
*॥ पाळणा ॥*
निज निज बा दिगंबरा । जगत्रया तूं आसरा ।
निद्रा कर थोडी, अवधूता । विनवी मुनिची कांता ॥
मी नाहीं तव जननी । कां कीं तूं व्यापुनी ।
अवघ्या जगताला आहेस । ठकवी मायाभास ॥
अज्ञजना करि शमना । निरसी अवघ्या द्वैता ।
विनवी दासगणू श्रीदत्ता । तव पदिं ठेवुन माथा ॥३३॥
॥ समाप्त ॥

*अशोककाका कुलकर्णी*

श्री दत्तजयंती

🌹 *श्री दत्तजयंती* 🌹

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेंच आश्रमांत येण्यार्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमानें व आदरानें स्वागत करी. वेळींअवेळीं आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशीं पोटीं गेला नाहीं किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढें नम्र होई. तिच्या शापाच्या भयानें सारीं पंचमहाभूतें तिचपुढें थरथर कांपत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव !
पतीबद्दल तिच्या ठायीं असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळें तिचें नांव ' साध्वी व पतिव्रता स्त्री ' म्हणून सर्वतोमुखीं झालें. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धां कानांवर गेल्या शिवाय राहिली नाहीं. नारदांचें नांवच मुळीं ' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनीं वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला ( विष्णूची पत्नी ) सांगितली, पार्वतीपुढें ( शंकराची पत्नी ) अनुसूयेच्या पतिव्रत्याचें गुणगान गाइलें, सावित्रीपुढें ( ब्रह्मदेवाची पत्नी ) तिच्या आदरातिथ्याविषयीं धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटूं लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचें सत्व हरण करावें असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्या त्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश ) क्रोधानें संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे तें आम्ही पहातों व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतों." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यावयास निघाले.
त्या तिघांनीं ब्राह्मणाचीं रूपें घेतलीं. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणें, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होतें. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मन अतिथी पाहून अनुसूयेनें त्यांना मोठ्या आदरानें बसावयास आसन दिलें. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावानें त्यांचें पूजन केलें. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढलें. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्ही लांबून आलों असून, तुझें सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे कीं, तूं नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावें.''

*आसनीं बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।*
*नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥*

हें वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरितां आले असावे. यांस जर विन्मुख पाठविलें तर माझ्या सत्वाची हानि होईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागें आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, - "थाबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''
एवढें बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानानें हें सारें ओळखलें व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हें गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे."

*हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी ।*
*गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥*

तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय ? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक ! अगदीं लहान !! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-

*कंचुकोसहित परिधान । फेडूनि ठेवी न लगतां क्षण ।*
*नग्न होवोनियां जाण । बाळांजवळी बैसतसे ॥*
*बाळें घेऊनि मांडोवरी । स्तनीं लावी जेव्हां सुंदरी ।*
*पान्हा फुटला ते अवसरी । देखोनि सती आनंदे ॥*

अशा तर्हेनें गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली तीं बालकें रडू लागलीं. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेनें त्यांना यथेच्छ स्तनपान करविलें. त्यांची क्षुधा निवारन केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचें फळ आहे.
अशीं कित्येक युगें लोटलीं. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिलीं. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनीं त्यांचें आदरानें स्वागत करून बसावयास आसन दिलें तेव्हां त्यांच ठिकाणीं तीं तीन बालकें ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनीं पाहिलीं. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखलें, पण तेथें ते कांहींच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.

*ऐसें सांगताम ब्रह्मपुंत्र । तिघी मिळाल्या एकत्र ।*
*जोडोनियां पाणिपात्र । नारदासी विचारिती ।*

तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली कीं, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार ( पति ) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला.
इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनीं फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितलें.
तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडलें. तेव्हां तीं बालकें पूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळीं विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालों आहोंत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेनें 'तिघे बालक ( ब्रह्मा - विष्णु- महेश ) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि-

*मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।*
*तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥*
*वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।*
*तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥*
*त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण ।*
*ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥*

अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय !
तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. तसेंच घरोघरीं दर गुरुवारीं दत्ताच्या तसबिरीला हार घालून दत्तभक्त त्याचें पूजन व प्रार्थना करतात.

*ज्या ज्या ठिकाणीं मन जाय माझें*
*त्या त्या ठिकाणीं निजरूप तूझें ।*
*मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणीं*
*तेथें तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥*

*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।*
*गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥*

*अशोककाका कुलकर्णी*

श्री दत्तस्तुती

🌹 *श्री दत्तस्तुति* 🌹

यतीरूप दत्तात्रया दंडधारी । पदीं पादुका शोभती सौख्यकारी ॥
दयासिंधु ज्याचीं पदें दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥१॥
पदें पुष्करा लाजवीती जयाचीं । मुखाच्या प्रभे चंद्र मोहूनि याची ॥
घडो वास येथें सदा निर्विकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥२॥
सुनीटा असती पोटर्या गुल्प जानू । कटीं मौंजि कौपीन ते काय वानूं ॥
गळां मालिका ब्रह्मसूत्रासि धारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥३॥
गळां वासुकीभूषणें रुडमाळा । टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा ॥
जयाची प्रभा कोटिसूर्यांसी हारी । तुम्हांवीण दत्ता० ॥४॥
जटाभार माथां प्रभा कुडलांची । त्रयास्यें भुजा शास्त्र सायूध साची ॥
त्रिशूळमाळादिक छटिधारी । तुम्हांवीण दत्ता० ॥५॥
कली पातला पातका वाढवाया । तयानें जना मोहिलें गाढ वायां ॥
जगीं अवतरें दुःखहारा असुरारी । तुम्हांवीण दत्ता० ॥६॥
अनूसयासत्त्व हरावयासी । त्रिमूर्ती जातां करि बाळ त्यांसी ॥
निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी । तुम्हांवीण दत्ता० ॥७॥
प्रसिद्ध असती क्षेत्रतीर्थें तयांचा । कली पातल्या जाहला लोप साचा ॥
करी पत्प्रसिद्धी भिषें ब्रह्मचारी । तुम्हांवीण दत्ता० ॥८॥
मुखें वेद नीचाचिया बोलविले । क्षिशैल्या क्षणें तंतुकालागिं नेलें ॥
सुदेही करी विप्रकुष्ठा निवारीं । तुम्हांवीण दत्ता० ॥९॥
दरिद्र बहू कष्टला विप्र त्यासी । क्षणें द्रव्य देऊनि संतोषवीसी ॥
दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१०॥
मनीं इच्छि विप्रैक व्हाया अन्नदान । असें जाणुनी कौतुका दावी पूर्ण ॥
करी तृप्त लेशान्निं जो वर्ण चारी । तुम्हांवीण दत्ता० ॥११॥
विलोकूनिया शूद्रभक्ती मनीं ती । कृपें दीधलें पीक अत्यंत शेतीं ॥
करी काशियात्रा कुमारा अधारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१२॥
नृपस्थानिं रंकासही स्थापियेलें । मदें व्यापिले विप्र निर्गर्व केले ॥
कृपादृष्टीनें स्फोटकातें निवारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१३॥
द्विजाच्या घरीं घेवडा वेल ज्यानें । मुळापासुनी तोडिला तो तयानें ॥
दिली संतती संपदा दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१४॥
शुष्कासुनी काष्ठही वृक्ष केला । गतप्राण तो पुत्र सजीव केला ॥
औदुंबरीं आवडे वास भारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१५॥
अशीं कीर्ति केली अगण्य । अगम्यागमा खातिही ज्याचि धन्य ॥
स्मरें भक्तिनें तद्भवदुःखहारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१६॥
अनंतावधी जाहले अवतार । परी श्रीगुरूदत्त सर्वांत थोर ॥
त्वरें कामना कामिकां पुर्णकारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१७॥
तपें तीर्थ दानें जपादी करिती । स्वहीतार्थ ते दैवताला स्तवीती ॥
परी केलिं कर्में वृथा होति सारीं । तुम्हांवीण दत्ता० ॥१८॥
सदा आससी दत्ता सर्वार्थकामा । त्वरें भेतसी टाकुनी सर्व कामा ॥
मना माझिया आवरीं दैन्यहारी । तुम्हांवीण दत्ता० ॥१९॥
मनीं आवडी गायनाची प्रभूला । करी सुस्वरें नित्य जो गायनाला ॥
तयाच्या त्वरें संकटांतें निवारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२०॥
असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते । प्रभातीं करी स्नान गंगातिरीं तें ॥
करी कर्विरीं अह्रिं भिक्षार्थ फेरी । तुम्हांवीण दत्ता० ॥२१॥
निशीं जाय निद्रार्थ मातापुरासी । सवें कामधेनू वसे तेजाराशी ॥
तसे श्वानरूपी सवें देव चारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२२॥
जनां मुक्तिचा मार्ग दावावयासी । कळाया स्वरूपप्रचीती तयांसी ॥
त्रिलोकीं करी जो निमिषार्धिं फेरी । तुम्हावीण दत्ता० ॥२३॥
असें रूप ठावें तुझें आसतांना । वृथा हिंडलों दैवतें तीर्थ नाना ॥
परी शेवटीं पायिं आलों भवारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२४॥
जधीं जन्मलों नेणुं दुःखासुखाला । अयुर्दाय अज्ञानिं तो व्यर्थ गेला ॥
कळूं लागतां खेळलों खेळ भारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२५॥
तृतीयांश आयुष्य ऐसेंचि गेलें । परी नाहीं त्वन्नाम मीं आठवीलें ॥
अतां यौवन प्राप्त झालें अपारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२६॥
परद्रव्य कांता पराची पाहातां । स्परादी रिपू ओढिती मानसाऽतां ॥
कसा ध्यावुं तूतें मधूकैटभारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२७॥
पुढें वृद्धता प्राप्त होईल वाटे । तिच्या यातना देखतां चित्त फाटे ॥
कधीं भेटसी केविं हो चक्रधारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२८॥
अयुष्यार्ध निद्रार्णवामाजि गेलें । पणा तीन शेषांत ते जाण केले ॥
तयांनी मना गोविलें दुःख भारी । तुम्हांवीण दत्ता० ॥२९॥
अशा घोर मायासमुद्रा पहातां । भिवोनी पदीं पातलों तूमच्याऽतां ॥
तरी क्लेशचिंतादि दुःखासि हारीं । तुम्हांवीण दत्ता० ॥३०॥
त्यजा मत्त पाखंड ते सज्जनाहो । धरा मानसीं भक्ति निष्ठा दृढा हो ॥
भवांबूधिच्या नेइ तो पैलपारीं । तुम्हांवीण दत्ता मला ० ॥३१॥
स्वतां घेतला दाखला सद्गुरूंचा । तसा घेति ते आणि घेतील साचा ॥
मनःकामना होतसे पूर्ण सारी । तुम्हांवीण दत्ता० ॥३२॥
करी पाठ जो कां स्तुती ही त्रिकाळा । तयाच्या प्रतापें पडे भीति काळा ॥
गुरू सर्व दारिद्रदुखां निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥३३॥
॥ शार्दूलविक्रीडित ॥
काया व्यर्थ तपादि यज्ञिं हवनीं स्वाध्यायिं तीर्थाटनीं ॥
शास्त्राच्या पठनीं जनीं वनिं गिरीघोरांदरीं जाउनी ॥
अज्ञानें भिवुनी अरीसि नयनीं काळासही पाहुनी ॥
द्वैवर्णाक्षर "दत्त" घ्या तरि सुखीं कां शीणवावी कुणी ॥१॥

*धर्मज्ञानगंगा समूह*

Friday, 1 December 2017

साईबाबा आरती

साईबाबांची आरती
आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळीं निज दासां विसावां ।
भक्तां विसावा ॥धृ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी । निजडोळां श्रीरंग ॥१॥
जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी ही तुझी माव ॥२॥
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥३॥ कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥४॥
आठा दिवसां गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥५॥
माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणसेवा ।
मागणें हेंचि आता । तुम्हा देवाधिदेवा ॥६॥
इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥७॥

दत्ताची आरती 3

आरती दत्ताची ३ श्रीगुरुदत्त राजमुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती ।। धृ ।। ब्रह्मा विष्णू शंकराचा । असे अवतार श्री गुरूचा ।। कराया उद्धार जगताचा । जाहला बाळ अत्री ऋषीचा ।। धरीला वेश असे यतीचा । मस्तकी मुकुट शोभे जटीचा ।। कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत वरुनी तेणे भक्तांचे क्लेश हरूनि त्यासी करुनी नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ।। १ ।। गांणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेची । भीमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुत सुशिष्यांची । वाट दावूनिया योगाची । ठेव देतसे निजभक्तीची ।। काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो ।। तरतरतरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूल जया हाती ।। ओवाळीतो ।। ।। २ ।। अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळीतो सौख्य कंदा तारी हा दास न रजकंदा सोडवी विषय मोहछंदा आलो शरण अत्रीनंदा दावी सदगुरू ब्रम्हानंदा ।। चुकवी चौर्यान्शीचा फेरा । घालिती षडरिपू मज घेरा, गांजिती पुत्रपौत्रदारा वदवी भजन मुखी तव पूजन करीत हे सुजन जयाचे बलवन्तावरती ओवाळीतो…

स्वामी समर्थ आरती

अक्कलकॊट स्वामी समर्थांची आरती जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था । आरती ओवाळूं चरणी ठेवुनियां माथा ॥धृ॥ छेली खेडेग्रामीं तूं अवतरलासी । जगदुद्धारासाठीं राया तू फिरसी । भक्तवत्सल खरा तूं एक होसी । म्हणुनि शरण आलों तुझे चरणासी ॥१॥ ञैगुणपरब्रह्म तूझा अवतार । त्याची काय वर्णूं लीला पामर । शेषादिक शिणले । नलगे त्या पार । तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार ॥२॥ देवादीदेव तूं स्वामीराया । निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां । तुजसी अर्पण केली आपुली ही काया । शरणागता तारीं तूं स्वामीराया ॥३॥ अघटित लीला करूनीं जडमूढ उद्धरिले । कीर्ती ऐकुनि कानी चरणीं मी लोळें । चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें । तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें ॥४॥

दत्ताची आरती

दत्ताची आरती २ जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता | आरती ओवाळी तुजला, बाळ उमासुता || माहूरगड असे तुझे, पावन जन्मस्थान | दर्शनास येती भक्त, गात तुझे गुणगान | घेऊन दर्शन तुझे, मिटवती ते तहान | कृपा करसी त्यावर, आहेस फार महान || गाणगापूर असे तुझे, एक वसती स्थान| येती भक्त तुझे, करती भावे तीर्थ स्नान| स्नान करुनी भक्त, घेतात तुझे दर्शन| भिक्षा मागुनी गावात , करती ते भोजन|| भूतबाधा, चिंता, खूप घेऊन येती भक्तगण| पीडा आपुल्या मिटवती, येती तुला शरण| भक्ताच्या हृदयात असे , सदा तुझा वास| नृसिंहवाडीस येती, त्याना लाभे सहवास|| अनुष्ठान करे वाडीस, घेती तुझे जपनाम| समाधान पावती जेंव्हा, होई पूर्ण ते काम| पावन स्थानापैकी एक, असते हो औदुंबर| चुकवत नसे दर्शन, तुझे ते भक्त दिगंबर|| हजार पायऱ्या चढून, येती भक्त गिरनारास | विसरती कष्ट देहाचे, घेताच तव दर्शनास | कृपा तुझी आम्हावर, राहो देवा दत्तात्रया | विसरणार नाही तुला, या तिन्ही कालत्रया