Monday, 16 May 2016
दिवाकर विरचित गणपति स्तोत्र
दिवाकरविरचित श्रीगणपति स्तोत्र
जयजयाजी गनपती । मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती । स्फूर्ति द्यावी मज अपार ॥ १ ॥
तुझें नाम मंगलमूर्ति । तुज इंद्र चंद्र ध्याती ।
विष्णु शंकर तुज पूजिती । अव्यया ध्याती नित्यकाळीं ॥ २ ॥
तुझें नाव विनायक । गजवदना तूं मंगलदायक ।
सकळ विघ्नें कलिमलदाहक । नामस्मरणें भस्म होती ॥ ३ ॥
मी तव चरणांचा अंकित । तव चरणां माझे प्रणिपात ।
देवाधिदेवा तूं एकदंत । परिसें विज्ञापना एक माझी ॥ ४ ॥
माझा लडिवाळ तुज करणें । सर्वांपरी तूं मज सांभाळणे ।
संकटांमाझारीं रक्षिणें । सर्व करणें तुज स्वामी ॥ ५ ॥
गौरीपुत्रा तूं गणपती । परिसावी सेवकाची विनंती ।
मी तुमचा अनन्यार्थी । रक्षिणें सर्वाथेंचि स्वामिया ॥ ६ ॥
तूंच माझा बाप माय । तूंच माझा देवराय ।
तूंच माझी करिसी सोय । अनाथनाथा गणपती ॥ ७ ॥
गजवदना श्रीलंबोदरा । सिद्धिविनायका भालचंद्रा ।
हेरंबा शिवपुत्रा । विघ्नेश्र्वरा अनाथबंधु ॥ ८ ॥
भक्तपालका करीं करुणा । वरदमूर्ति गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा । विघ्ननाशना मंगलमूर्ति ॥ ९ ॥
विश्र्ववदना विघ्नेश्र्वरा । मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्र्वरा । दीनबंधु नाम तुझें ॥ १० ॥
नमन माझें श्रीगणनाथा । नमन माझें विघ्नहर्ता ।
नमन माझे एकदंता । दीनबंधु नमन माझें ॥ ११ ॥
नमन माझें शंभुतनया । नमन माझें करुणालया ।
नमन माझें गणराया । तुज स्वामिया नमन माझें ॥ १२ ॥
नमन माझें देवराया । नमन माझें गौरीतनया ।
भालचंद्रा मोरया । तुझे चरणीं नमन माझें ॥ १३ ॥
नाहीं आशा स्तुतीची । नाहीं आशा तव भक्तीची ।
सर्व प्रकारें तुझिया दर्शनाची । आशा मनीं उपजलीं ॥ १४ ॥
मी मूढ केवळ अज्ञान । ध्यानीं सदा तुझे चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन । कृपा करीं जगदीशा ॥ १५ ॥
मतिमंद मी बालक । तूंचि सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक । गजमुखा तूं होशी ॥ १६ ॥
मी दरिद्री अभागी स्वामी । चित्त जडावें तुझिया नामीं ।
अनन्य शरण तुजला मी । दर्शन देई कृपाळुवा ॥ १७ ॥
हें गणपतिस्तोत्र जो करी पठण । त्यासी स्वामी देईल अपार धन ।
विद्या सिद्धीचें अगाध ज्ञान । सिंदूरवदन देईल पैं ॥ १८ ॥
त्यासी पिशाच्च भूत प्रेत । न बाधिती कदाकाळांत ।
स्वामींची पूजा करोनि यथास्थित । स्तुतिस्तोत्र हें जपावें ॥ १९ ॥
होईल सिद्धि षण्मास हें जपतां । नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतिचरणीं माथा । दिवाकरें ठेविला ॥ २० ॥
॥ इति दिवाकर विरचित श्रीगणपतिस्तोत्र संपूर्ण ॥
Diwakar Virachit ShriGanapati Stotra
दिवाकरविरचित श्रीगणपति स्तोत्र
No comments:
Post a Comment