Monday, 16 May 2016

दिवाकर विरचित गणपति स्तोत्र

दिवाकरविरचित श्रीगणपति स्तोत्र जयजयाजी गनपती । मज द्यावी विपुल मती । करावया तुमची स्तुती । स्फूर्ति द्यावी मज अपार ॥ १ ॥ तुझें नाम मंगलमूर्ति । तुज इंद्र चंद्र ध्याती । विष्णु शंकर तुज पूजिती । अव्यया ध्याती नित्यकाळीं ॥ २ ॥ तुझें नाव विनायक । गजवदना तूं मंगलदायक । सकळ विघ्नें कलिमलदाहक । नामस्मरणें भस्म होती ॥ ३ ॥ मी तव चरणांचा अंकित । तव चरणां माझे प्रणिपात । देवाधिदेवा तूं एकदंत । परिसें विज्ञापना एक माझी ॥ ४ ॥ माझा लडिवाळ तुज करणें । सर्वांपरी तूं मज सांभाळणे । संकटांमाझारीं रक्षिणें । सर्व करणें तुज स्वामी ॥ ५ ॥ गौरीपुत्रा तूं गणपती । परिसावी सेवकाची विनंती । मी तुमचा अनन्यार्थी । रक्षिणें सर्वाथेंचि स्वामिया ॥ ६ ॥ तूंच माझा बाप माय । तूंच माझा देवराय । तूंच माझी करिसी सोय । अनाथनाथा गणपती ॥ ७ ॥ गजवदना श्रीलंबोदरा । सिद्धिविनायका भालचंद्रा । हेरंबा शिवपुत्रा । विघ्नेश्र्वरा अनाथबंधु ॥ ८ ॥ भक्तपालका करीं करुणा । वरदमूर्ति गजानना । परशुहस्ता सिंदुरवर्णा । विघ्ननाशना मंगलमूर्ति ॥ ९ ॥ विश्र्ववदना विघ्नेश्र्वरा । मंगलाधीशा परशुधरा । पापमोचना सर्वेश्र्वरा । दीनबंधु नाम तुझें ॥ १० ॥ नमन माझें श्रीगणनाथा । नमन माझें विघ्नहर्ता । नमन माझे एकदंता । दीनबंधु नमन माझें ॥ ११ ॥ नमन माझें शंभुतनया । नमन माझें करुणालया । नमन माझें गणराया । तुज स्वामिया नमन माझें ॥ १२ ॥ नमन माझें देवराया । नमन माझें गौरीतनया । भालचंद्रा मोरया । तुझे चरणीं नमन माझें ॥ १३ ॥ नाहीं आशा स्तुतीची । नाहीं आशा तव भक्तीची । सर्व प्रकारें तुझिया दर्शनाची । आशा मनीं उपजलीं ॥ १४ ॥ मी मूढ केवळ अज्ञान । ध्यानीं सदा तुझे चरण । लंबोदरा मज देई दर्शन । कृपा करीं जगदीशा ॥ १५ ॥ मतिमंद मी बालक । तूंचि सर्वांचा चालक । भक्तजनांचा पालक । गजमुखा तूं होशी ॥ १६ ॥ मी दरिद्री अभागी स्वामी । चित्त जडावें तुझिया नामीं । अनन्य शरण तुजला मी । दर्शन देई कृपाळुवा ॥ १७ ॥ हें गणपतिस्तोत्र जो करी पठण । त्यासी स्वामी देईल अपार धन । विद्या सिद्धीचें अगाध ज्ञान । सिंदूरवदन देईल पैं ॥ १८ ॥ त्यासी पिशाच्च भूत प्रेत । न बाधिती कदाकाळांत । स्वामींची पूजा करोनि यथास्थित । स्तुतिस्तोत्र हें जपावें ॥ १९ ॥ होईल सिद्धि षण्मास हें जपतां । नव्हे कदा असत्य वार्ता । गणपतिचरणीं माथा । दिवाकरें ठेविला ॥ २० ॥ ॥ इति दिवाकर विरचित श्रीगणपतिस्तोत्र संपूर्ण ॥ Diwakar Virachit ShriGanapati Stotra दिवाकरविरचित श्रीगणपति स्तोत्र

No comments:

Post a Comment