Friday, 5 August 2016
श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्यायः
अध्याय (६)
। श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ धरोनी शिशूचा हात । अक्षरे पंडित लिहवीत । तैसे स्वामीचरित्रामृत । स्वामी समर्थ वदविती ॥१॥ मी केवळ मतिमंद । केवी वर्णू चरित्र अगाध । परी माझा हा छंद । स्वामी समर्थ पुरविती ॥२॥ ज्यांच्या वरप्रसादे करून । मुढा होई शास्त्रज्ञान । त्या समर्थांचे चरण । वारंवार नमितसे ॥३॥ कृपाळू होऊन समर्था । वदवावे आपुल्या चरित्रा । श्रवणे श्रोतयांच्या चित्ता । ब्रह्मानंद प्राप्त होवो ॥४॥ सुरतरूची घेऊनी सुमने । त्यासीच अर्पावी प्रीतीने । झाला ग्रंथ स्वामीकृपेने । त्यांच्याच पदी अर्पिजे ॥५॥ मागील अध्यायाच्या अंती । चोळप्पा विनवी स्वामीप्रती । कृपा करोनी मजवरती । बडोद्याप्रती चलावे ॥६॥ भाषण ऐसे ऐकोनी । समर्थ बोलती हसोनी । मल्हाररावाचिया मनी । आम्हांविषयी भाव नसे ॥७॥ म्हणोनी तयाच्या नगरात । आम्हा जाणे नव्हे उचित । अक्कलकोट नगरांत । आम्हा राहणे आवडे ॥८॥ ऐसी ऐकोनिया वाणी । चोळप्पा खिन्न झाला मनी । त्याने सत्वर येवोनी । तात्यांप्रती सांगितले ॥९॥ ऐसा यत्न व्यर्थ गेला । तात्या मनी चिंतावला । आपण आलो ज्या कार्याला । ते न जाय सिद्धीसी ॥१०॥ परी पहावा यत्न करोनी । ऐसा विचार केला मनी । मग काय केले तात्यांनी । अनुष्ठान आरंभिले ॥११॥ ऐसे नाना उपाय केले । परी ते सर्व व्यर्थ गेले । कार्य सिद्धीस न गेले । खिन्न झाले मुख त्यांचे ॥१२॥ भक्ती नाही अंतरी । दांभिक साधनांते करी । तयांते स्वामी नरहरी । प्रसन्न कैसे होतील ॥१३॥ तयांनी माजविली ढोंगे । आणि केली नाना सोंगे । भक्तीवीण हटयोगे । स्वामीकृपा न होय ॥१४॥ मग तात्यांनी काय केले । सप्ताहासी ब्राह्मण बैसविले । गुरुचरित्र आरंभिले । व्हावयासी स्वामीकृपा ॥१५॥ परी तयाच्या वाड्यात । कधी न गेले समर्थ । तात्या झाला व्यग्रचित्त । काही उपाय सुचेना ॥१६॥ मल्हारराव नृपाने । पाठविले ज्या कार्याकारणे । ते आपुल्या हातून होणे । अशक्य असे वाटते ॥१७॥ आता जाऊनी बडोद्यासी । काय सांगावे राजयासी । आमि सकळ जनांसी । तोंड कैसे दाखवावे ॥१८॥ ऐशा उपाये करोन । न होती स्वामी प्रसन्न । आता एक युक्ति योजून । न्यावे पळवोन यतीसी ॥१९॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । हे नेणे तो मंदमती । म्हणूनी योजिली कपटयुक्ती । परी ते सिद्धीते न जाय ॥२०॥ असो कोणे एके दिवशी । साधोनी योग्य समयासी । मेण्यात घालोनी स्वामीसी । तात्यासाहेब निघाले ॥२१॥ कडबगांवचा मार्ग धरिला । अर्धमार्गी मेणा आला । अंतरसाक्षी समर्थांला । गोष्ट विदित जाहली ॥२२॥ मेण्यातून उतरले । मागुती अक्कलकोटी आले । ऐसे बहुत वेळा घडले । हाही उपाय खुंटला ॥२३॥ मग पुढे राजवाड्यांत । जाऊनिया राहिले समर्थ । तेव्हा उपाय खुंटत । टेकिले हात तात्यांनी ॥२४॥ या प्रकारे यत्न केले । परी तितुके व्यर्थ गेले । व्यर्थ दिवस गमाविले । द्रव्य वेचिले व्यर्थची ॥२५॥ मग अपयशाते घेवोनी । बडोद्यासी आले परतोनी । समर्थकृपा भक्तीवाचोनी । अन्य उपाये न होय ॥२६॥ परी मल्हारराव नृपती । प्रयत्न आरंभिती पुढती । सर्वत्रांसी विचारीती । कोण जातो स्वामींकडे ॥२७॥ तेव्ही मराठा उमराव । नृपकार्याची धरुनी हाव । आपण पुढे जाहला ॥२८॥ स्वामीकारणे वस्त्रे भूषणे । धन आणि अमोल रत्ने । देऊनी त्याजवळी नृपाने । आज्ञा दिधली जावया ॥२९॥ तो येवोनी अक्कलकोटी । घेतली समर्थांची भेटी । वस्त्रे अलंकार सुवर्णताटी । स्वामीपुढे ठेवित ॥३०॥ ती पाहून समर्थाला । तेव्हा अनिवार क्रोध आला । यशवंता पाहोनी डोळा । काय तेव्हा बोलले ॥३१॥ अरे बेडी आणोनी । सत्वर ठोका याचे चरणी । ऐसे त्रिवार मोठ्यांनी । समर्थ क्रोधे बोलले ॥३२॥ क्रोध मुद्रा पाहोनी । यशवंतराव भ्याला मनी । पळाले तोंडचे पाणी । लटलटा कापू लागला ॥३३॥ मग थोड्याच दिवशी । आज्ञा आली यशवंतासी । सत्वर यावे बडोद्यासी । तेथील कार्यासी सोडोनी ॥३४॥ साहेबा विषप्रयोग केला । मल्हाररावावरी आळ आला । त्या कृत्यामाजी यशवंताला । गुन्हेगार लेखिले ॥३५॥ हाती पायी बेडी पडली । स्वामीवचनाची प्रचिता आली । अघटित लीला दाविली । ख्याती झाली सर्वत्र ॥३६॥ समर्थांची अवकृपा जयावरी । त्याच्या कष्ट होती शरीरी । कृपा होय जयावरी । तया सर्वानंद प्राप्त होय ॥३७॥ महासमर्था भक्तपालका । अनादिसिद्धा जगन्नायका । निशिदिनी शंकर सखा । विष्णूचिया मनी वसे ॥३८॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । षष्ठोध्याय गोड हा ॥३९॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment