Sunday, 11 September 2016

श्री नवरात्र वासिनिचि आरती- ऊदो बोला उदो

श्रीनवरात्रवासिनीची आरती आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो । प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो । मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो ।। १ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु .।। द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो । कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।। २ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफ़ळां हो । कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। ३ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो । उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो । पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो ।। ४ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो । रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो । आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो ।। ५ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो । घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो । जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ।। ६ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो । तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो । जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो । भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ।। ७ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो । सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो । मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो । स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो ।। ८ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो । सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो । षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो । आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो ।। ९ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।। दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो । सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो । शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो । विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। १० ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

No comments:

Post a Comment