Saturday, 3 December 2016

औदुंबर दत्त दिगंबर भजन

श्रीविधिहरिहर-मूर्तिं सांवळी कृष्णातिरीं राहे ||
दत्तदिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये || धृ. ||

कृष्णातिरिंचा अगाध महिमा दुर्लभ देवांसी ||
ईचे तीरीं वास जयाचा अखंड हो काशी ||
प्रातःकाळीं सुरगण मुनिजन येती स्नानासी ||
पवित्र होउनी शुद्ध भक्तीनें साधन मोक्षासी ||
शुष्क पापें गणती नाहीं जाती विलयासी ||
महापातके करितां स्नानें जाती मोक्षासी ||
चला जाउंया करा तयारी सत्वर लवलाहे || १ || दत्तदिगंबर...

ध्यान पाहतां भगवी वस्त्रें परिकर लंगोटी ||
सर्वांगी चर्चुनी बैसले भस्माची उटी ||
दंडकमंडलु करीं घेऊनी उपवस्त्रें छाटी ||
रुद्राक्षांचे हार प्रफुल्लित शोभति बहु कंठीं ||
शमीपत्र किती बिल्व तुळसीदळ सुमनांची दाटी ||
प्रेमानंदे भक्त वहाती आवड बहु मोठी ||
हास्यमुखानें कृपाकटाक्षें दासाकडे पाहे || २ || दत्तदिगंबर...

औदुंबराची पूजा करितां कोटी पापांची ||
राख-रांगोळी होऊनि जाते साक्षी अंबेची ||
अशा वृक्षातळीं बैसली स्वारी श्रीगुरूंची ||
तीन्हि-त्रिकाळी पूजा होतसे श्रीगुरुरायाची ||
सायंकाळीं असें वाटतें शोभा स्वर्गाची||
मंत्रपुष्प-अतिघोष गर्जना चर्चा वेदांची ||
सीतारामा पाहूनी प्रेमा आनंद न समाये ||३|| दत्तदिगंबर...

No comments:

Post a Comment