Wednesday, 18 October 2017

श्रीसूक्त फलश्रुती

श्री सूक्त फलश्रुती (किंवा श्री लक्ष्मी सूक्तम) भावार्थ

अगदी प्राचीन काळापासून किंवा आत्ता पर्यंतच्या सर्व युगामध्ये (सत्य, द्वापार, त्रेता  ) मानवी स्वभावात भोग व  मोक्ष याचे कायमच आकर्षण वाटत राहिले आहे.

त्या आकर्षणाच्या माध्यमातून मनुष्य आपले  गुण किंवा अवगुण सर्व युगामध्ये वापरत गेला.  त्यातूनच सूर - असूर प्रवृत्ती याचे दर्शन दाखवीत राहिला. 

प्रत्येक युगानुसार देव लोक ( सूर ) व  असूरलोक  यांचे अस्तित्व ही बदलत गेले.

सत्य युगामध्ये हे दोन्ही वेगळे असल्याने प्रत्येक लोकांमध्ये आपापल्या पद्धतीने जीवन जगत होते.

नंतरच्या  द्वापार युगामध्ये सूर व असूर प्रवृत्ती या कुटुंबामध्ये एकत्रित राहू लागल्या. (कौरव /पांडव  ) 

आता कलियुगामध्ये या दोन्ही प्रवृत्ती एकाच देहामध्ये असून,  असूर प्रवृतीचे कायमच वर्चस्व दिवंसे दिवस वाढणार  आहे. 

या अनुषंगाने वैदिक काळामध्ये जे देवतांचे मंत्र लिहिले गेले ते   भविष्य काळामधल्या घडू शकणाऱ्या घटना बघूनच देहाचे  मनाचे शुद्धीकरण करण्यासाठी.  

मागच्या ५ भागात आपण श्रीसूक्त भावार्थ पहिला.

आता श्रीसूक्त नंतरच्या फलश्रुतीमध्ये  श्रीमहालक्ष्मी कडे जे मागणे आहे , जे भौतिक सुखाचे आहेच पण त्यापलीकडे जाऊन विशेष असे मागणे ऋषीमुनींनी केले आहे.

ऋषीमुनी जे काही मागत ते राजासाठी, प्रजेसाठी  ऐश्वर्याचे मागणे  असले तरी प्रत्येक मनुष्य भौतिक  सुखापलीकडे जाऊन सुखी समाधानी व्हावा ही आंतरिक इच्छा आहेच.

या स्तुतीमध्ये  ऋषीमुनीना देवता स्वरूप वर्णन करताना बोधात्मक काय
सांगायचे होते तेही अप्रत्यक्ष पणे सांगून ठेवले. 

श्री सूक्त फलश्रुतीच्या स्तुतीमध्ये (किंवा श्री लक्ष्मी सूक्तम) वेगवेगळे श्लोक आढळतात.

यामध्ये उत्तर व दक्षिण प्रांता मध्ये ही विविधता आढळते. काही देवी माहात्म्य वरूनही समाविष्ट केले आहेत.

मुळात हा अनुष्टुप छंद आहे फक्त श्री महालक्ष्मीचा गायत्री मंत्र छंद वेगळा आहे. 

श्री सूक्त फलश्रुती  उच्चार साठी सरळ , सोपी व नेहेमी आपण म्हणतो ती येथे दिली आहे.

ll  श्री लक्ष्मी सूक्तम ll

पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मासम्भवे ।
त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ll

या फलश्रुतीमध्ये श्रीमहालक्ष्मीचे कमलस्वरूपामधील सौन्दर्य स्तुती  वर्णन केले आहे.

श्रीलक्ष्मीचे मुख, नेत्र व कटीपासून पायापर्यंत तिचे कमलकांतीतले रूप आकर्षक असून, कमळा मधून आपला अविष्कार साकारणाऱ्या  हे माते, तुझ्या भक्तीमुळे किंवा कृपादृष्टीमुळे मला सुख लाभावे अशी प्रार्थना  तुला अर्पण आहे.

वरील स्तुतीचा योगमाध्यमातून अर्थ हा वेगळा आहे.

पदम म्हणजे कमळ.  कमळाचे स्वरूप हे मोहक पण चेतनामयी आहे. 

कुंडलिनीस्वरूप असल्याने , मुख पाहून मनुष्याचे बाह्य छटा  व आंतरिक रूप लक्षात येत असते. कटीपासून ते पाया पर्यंतचा सर्व भार हा शरीराचा आधार असतो. नेत्रा मधून अध्यात्मिक दृष्टीची जाणीव होत असते. 

श्रीमहालक्ष्मीस कमळ अत्यंत प्रिय आहे  म्हणून तिच्या स्तुतीमध्ये कमलस्वरूपिणी, कमलकांती, कमल नयनी  अशी विशेषणे विशेषणे बरीच आढळतात.  त्याचे कारण ही वेगळ्या प्रकारे दिले आहे.

कमळ हे  मन, देह व  वाचा यांचे सौदर्य प्रमाण आहे. कमळ हे पाण्यात शोभून दिसत असले तरी त्याच्या तळाशी चिखल असतो. पाण्यातले कमळ आपल्या पाकळ्यांवर पाणी टिकून देत नाही.

देहातीत मोह किंवा इच्छा ( विषयवासना) या चिखला प्रमाणे असतात पण त्यासर्वाना खाली ठेवून आपले सौन्दर्य आध्यत्मिक दृष्टीने बहरत  न्यायचे असते.

विषयवासना पासून दूर होता येथे जेव्हा मन , देह व वाचा शुद्ध होते.

पदमानने पद्मिनी पद्मपत्रे  पद्मप्रिये पद्मदलायताक्षि ।
विश्वप्रिये विष्णु मनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ll

हे माते, तू कमळावर विराजमान असून तुझ्या हातात कमळ आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे तुझे नेत्र विशाल व सुंदर आहेत. विश्वातील सर्व प्राणिमात्राचे तुझ्या वर प्रेम आहे व  सर्वांना तू प्रिय आहेस. श्रीहरीला हि प्रिय आहेस.

अश्वदायि गोदायि धनदायि महाधने
धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥

हे माते अश्व (घोडे), गो ( गायी) , संपत्ती ( धन)  व संचितबल - सुदैव, सर्व बाबतीत विपुलता  (महाधने )  तुझ्या कृपे मुळेच मिळतात. माझ्या सर्व कामनाची तुझ्या आशीर्वाद मुळे पूर्तता होऊ दे.

यातील महाधने या  शब्दाला फारच महत्त्व आहे. सर्व भौतिक सुखांचा तो पाया आहे.

महाधने ही विपुलता आंतरिक गुणांची ( सर्व सद्गुणांची , आचरणाची ) आहे  जी  दिव्यत्व  येण्यासाठी आवश्यक आहे. 

त्यावर सुखाचे, शांतीचे व समाधानाचे जीवन अवलंबून असते. 

सद्गुण हे सूक्ष्म स्थिती मध्ये व्यक्त होत असतात. भौतिक सुखासारखे  त्याचे वस्तू परिमाण नाही.

हे महाधन आम्हास लाभू  दे अशी मातेजवळ प्रार्थना आहे.

पुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ।
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम् ॥

हे माते,  तू प्रजेची माता आहेस.  तुझ्या कृपेने पुत्र, नातू , धन धान्य, हाती, घोडे, गायी, रथ  हे सर्व वैभव आम्हास देऊन आम्हास दीर्घायुषी कर. 

धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः ।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नुते ॥

हे माते मला अग्नी, वायू , सूर्य, वासू, इंद्र  बृहस्पती व वरुण या देवतास्वरूप कृपेने आंम्हाला धनवृद्धी होऊ देत.

ही सर्व देवतास्वरूप तुझीच रूपे आहेत.

या सर्व देवतांची रूपे ही आपल्या देहातीत आहेत ती थोडक्यात अशी : 

अग्नी म्हणजे  देहातील चैतन्य, वायू म्हणजे मनाची विचारशक्ती, सूर्य म्हणजे  ज्ञानांचे तेज,  वसू म्हणजे  रक्षणकर्ते , इंद्र म्हणजे देहाचे/मनाचे पूर्ण सामर्थ्य - विवेकबुद्धी , बृहस्पती म्हणजे  परम श्रीगुरुंचे ज्ञान, श्रीगुरुंचा सहानुभव , वरुण म्हणजे सत्य जे आचरणात आणण्यासाठी विवेकबुद्धी हवीच.

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ।
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥

हे गरुडा (वैनतेय),  यज्ञात निर्माण झालेला सोमरस (सोम वनस्पती) प्राशन करा व सोम यज्ञ करण्यासाठी आम्हास साहाय्य करावे.  

इथे गरुडराज चा उल्लेख विशेष असा कि तो श्रीहरीचे वाहन आहे.  श्रीहरीची कृपा दृष्टी प्राप्त होण्यासाठी देह व  मन शुद्धी आवश्यक आहे. 

ही सोम वनस्पती म्हणजेच संजीवनी वनस्पती असा उल्लेख आढळतो, ही दुर्मिळ असलेली वनस्पती  औषधी आहे. हिच्या सेवनाने अष्टसिद्धी प्राप्त होतात. 

हा सोमा यज्ञ नेहमी सारखा यज्ञ विधी आहेच पण देहाचाहि यज्ञ विधी आहे. थोडक्यात सर्व सुख लाभतात देहाचे आरोग्य ही महत्वाचे आहे असा प्रतिपादन ऋषीमुनी करतात.

त्या स्वास्थ देहाला  अष्टसिद्द्धी मिळाव्यात यासाठीही मागणे आहे.

न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभा मतिः ।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्सदा ll

हे माते , तुझी स्तुती भक्तिपूर्ण भावनेने व नित्य केल्याने व  पुण्य कर्म करणाऱ्या  भक्ताजवळ  क्रोध, मत्सर, लोभ व दुर्बुद्धी (अशुभ विचार)  हे  येत नाहीत.  

पदमानने पद्मिनी पद्मपत्रे  पद्मप्रिये पद्मदलायताक्षि ।
विश्वप्रिये विष्णु मनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ll

हे माते, तू कमळावर विराजमान असून तुझ्या हातात कमळ आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे तुझे नेत्र विशाल व सुंदर आहेत. विश्वातील सर्व प्राणिमात्राचे तुझ्या वर प्रेम आहे व  सर्वांना तू प्रिय आहेस. श्रीहरीला हि प्रिय आहेस.

अश्या आमच्या मातेच्या कमलाचरणा जवळ आम्ही कायम राहो अशी प्रार्थना आहे.  

सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥

हे कमलवासिनी माते ,  शुभ्र वस्त्रांकित , गंध व पुष्पमाला विभूषित  करून तु  कमळ धारण केले आहेस. श्रीहरीस अत्यंत प्रिय असलेली अशी तू भगवती हरी वल्लभे आहेस. त्रिभुवनाला  यश, संपदा, भरभराट तुझ्याच कृपेने  मिळत असते.

हे माते तू आमच्यावर प्रसन्न हो.

विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ।
विष्णोः प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥

या स्तुती मध्ये मातेस  विष्णुपत्नीं, माधवी, प्रियसखी, अच्युतवल्लभां अशी नाव आहेत.  थोडक्यात अर्थ असा : 

हे माते , तू श्रीहरीची हृदयस्वामिनी आहेस. तू सहनशील असली तरी तुझ्या मुळे सर्व सुखांचा आस्वाद घेता येतो . ( जसा मध स्वाद कायमच आनंद  देत असतो - माधवी या अर्थाने).

अच्युत या श्रीहरीचे नावाचे बरेच अर्थ आहेत. पण येथे सौख्य स्थिरता असा घेता येईल.

श्री मातेमुळे कायमच सौख्य लाभते असे  गुणगान केले आहे.

महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

आम्ही आमच्या साधनेमधून श्रीमहालक्ष्मी मातेचे स्वरूप जाणण्यासाठी श्रीहरीस्वामिनीचे  ध्यान  करतो,  ही साधना आम्हास सद्बुद्धी देवो ही  प्रार्थना.

श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महियते ।
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥

हे माते, मला  वर्चस्व,आयुष्य, आरॊग्य, ऐश्वर्य, तसेच विपुल धन, धान्य, पशु धन, वंश वृद्धी , तसेच दीर्घ आयुष्य तुझ्या कृपेने प्राप्त व्हावे ही प्रार्थना.  

आजच्या कलियुगात श्री लक्ष्मीचे स्वरूप आपण जाणतो व त्याप्रमाणे उपभोग घेत असतो.

ते  आयुष्याला आवश्यक असे गरजेचे  आहे पण ते खरे  तिचे स्वरूप नाही.

अध्यात्मिक दृष्टीने श्री महालक्ष्मीस माता म्हणून स्वीकारण्यास , तिला जाणण्याचा जो प्रवास आहे तो  आनंदाचा आहे, आत्मसुखाचा आहे ,   तो या जीवनापुरता मर्यादित नाहीच नाही. 

त्याचे  वर्णन देवी माहात्म्य मध्ये आढळते . त्याविषयी पुढच्या लेखामध्ये.

या दीपावलीच्या शुभ महोत्सवामध्ये सर्वाना शुभेच्या देताना

           आई श्रीमहालक्ष्मीस  सर्वासाठी एकच मागणे 

                      ll    जो जे वांछील तो ते लाहो  ll

************************************************************************************
                                              ll   नमो गुरवे वासुदेवाय ll
                                   ll    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll
                                           ll    श्रीपादराजम शरणं प्रपद्ध्ये ll
***********************************************************************************                                   श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांच्या चरणसेवेशी   ******************************          श्री गुरुदत्त आठल्ये     ********************************
१७ -१० -२०१७
*********************  श्री सूक्त फलश्रुती (किंवा श्री लक्ष्मी सूक्तम) भावार्थ
*************************************

No comments:

Post a Comment