सिद्धटेकचा सिद्धीविनायक
गौरी पुत्रा शिवनंदना . तव पदी करुनी नमना. काव्य-माला गुंफण्या गजानना . बुद्धि शक्ती दे रमेशा. १..
जगाचा तु अवघा त्राता. करणे करविणे तुझिये हाता. ऋद्धिसिद्धीचा दाता. ओव्या पूर्ण कराव्या . २..
भक्तिमार्गाचा मी सान. थोडके आहे माझे ज्ञान. अगाध महिमा तुझा जाणून. ध्येये निष्फळ करु नको. ३..
जैसी बालकासी माता. चालण्या शिकवी धरुनी हाता. तैसे तू करी आता. लिखाण माझे पुरे हे. ४..
तुझी नावे असती फार. तुझा महिमा किती थोर. पुण्यस्मरण करी जो नर. सिद्धि पावे सर्वदा. ५..
अशी ही गणरायाची महती. कितीही सांगावी तरीही थोडकी. याच्या दर्शनाने अवघे जीवन सफल होते. गणरायाची विविध रुपे अष्टविनायकाच्या रुपाने राज्यात पाहायला मिळतात. त्यातील पहिल्या गणपतीचे तुम्ही दर्शन घेतले. यामालेतील दुसरा गणपती आहे. सिद्धटेकचा सिद्धीविनायक. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर सिद्धटेक हे गाव आहे.
सिद्धिविनायकाची कथा
सिद्धटेकी विनायक ।
सिद्धिदाता विघ्ननाशक ।
विष्णूही ज्याचा पूजक ।
त्यासि वंदन आदरे ॥
येथील गणेशाला श्रीसिद्धिविनायक असे नाव पडण्यामागे एक पौराणिक कथा आहे.
ब्रम्हदेवाला सृष्टीरचना करावी वाटली तेव्हा त्याने गणेशाने दिलेल्या एकाक्षरमंत्राचा जप करुन गणेशाला प्रसन्न केले. तेव्हा गणेशाने 'तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील' असा वर दिला आणि ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधू व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रम्हदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवांनी विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधू-कैटभाचे अनेक वर्ष युद्ध सुरु होते मात्र विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही. म्हणून तो भगवान शंकराकडे गेला. तेव्हा शंकर म्हणाले, युद्ध सुरु होण्याआधी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तिथे "श्रीगणेशाय नमः" या मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या आराधनेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधू-कैटभाचा वध केला.
विष्णूला श्रीविनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाले त्याठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या ठिकाणाला 'सिद्धटेक' असे म्हणतात आणि येथील विनायकाला 'श्रीसिद्धिविनायक'.
कालांतराने हे मंदीर नष्ट झाले.
पुढे पेशवे काळात येथे छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ पुणश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.
श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे. गाभा-याच्या बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे. मंदिराच्या गाभा-यातच देवाचे शेजघर आहे.
श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच व २.५ फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही एकमेव मूर्ती आहे. पोट मोठे नाही. एक मांडी घातलेली असून तीवर ऋद्धिसिद्धि बसलेल्या आहेत. या मूर्तीच्या मुखावर शांत-गंभीर भाव दिसतात. सिंहासन दगडी असून प्रभावळ पितळी आहे. प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरुड यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. प्रभावळीच्या मध्यभागी नागराज आहे. उजव्या व डाव्या बाजूस जयविजयाच्या मूर्ती आहेत.
सिद्धटेकला जाण्याचा मार्ग
सिद्धटेकला जाण्यासाठी सोयीचे रेल्वेस्टेशन आहे दौंड रेल्वेस्टेशन. दौंड रेल्वेस्टेशन ते सिद्धटेक अंतर १३ किलो मीटर आहे. दौंड ते सिद्धटेक एस.टी बस शिरापूर या गावी येते. तेथून नदीतून नावेने जावे लागते.
पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून सिद्धटेकला जाण्यासाठी बस आहे. सिद्धटेक फाट्यावर उतरून पायी चालत जावे लागते.
No comments:
Post a Comment