*ll श्री गुरुदेव दत्त ll*
जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे शरणांगत मी,भवभय वारण तुम्हीच ना ? ||धृ||
कीर्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ?
स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना ?
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना ?
मच्छीन्द्रादि जती प्रवृत्त केले, जन उद्धारा तुम्हीच ना ?
दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना ?
नाथ सनदिचे चोपदार तरि, श्री गुरू दत्ता तुम्हीच ना ?
युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना ?
बलोन्मत्त पिशाच वृत्ती, धारण करता तुम्हीच ना ? ||१||
स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना ?
करुनी भिक्षा करिविरी भोजन, पांचाळेश्वरि तुम्हीच ना ?
तुळजापुरी करशुद्धी तांबुल, निद्रा महुरी तुम्हीच ना ?
करुनी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना ?
विप्र स्त्रियेच्या वाचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना ?
श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना ?
जन्मताच ओंकार जपुनी, मौन धरियेले तुम्हीच ना ?
मौजी बंधनी वेद वदुनी, जननी सुखविली तुम्हीच ना ? ||२||
चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा, आश्रम घेउनी तुम्हीच ना ?
कृष्ण सरस्वती सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ?
माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ?
पोट शुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ?
वेल उपटोनी विप्रा दिधला, हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना ?
तस्कर वधुनी विप्र रक्षिला, भक्तवत्सल तुम्हीच ना ?
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ?
हीन जिव्हा वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ? ||३||
वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ?
भीमा अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ?
ब्रम्हमुहूर्ती संगमस्थानी, अनिष्ठानि रत तुम्हीच ना ?
भिक्षा ग्रामी करुनी राहतां, मध्यान्ही गुरु तुम्हीच ना ?
ब्रम्हराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरीले मठी तुम्हीच ना ?
वांझ महिषी दुभविले, फुलविले शुष्क काष्ठ तुम्हीच ना ?
नंदीनामा कुष्ठी केला, दिव्य देही गुरु तुम्हीच ना ?
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी, कुमशी ग्रामी तुम्हीच ना ? ||४||
अगणीत दिधले धान्य कापुनी, शूद्राशेत गुरु तुम्हीच ना ?
रत्नाईचे कुष्ट दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ?
आठही ग्रामी भिक्षा केली, दिपवाळी दिनी तुम्हीच ना ?
भास्कर हस्ते चारसहस्त्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ?
निमिषमात्रे तंतुक नेला, श्री शैल्यासी तुम्हीच ना ?
सायंदेवा काशी यात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ?
चांडाला मुखी वेद वदविले, गर्व हरया तुम्हीच ना ?
साठ वर्षे वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ? ||५||
कृतार्थ केला मानस पूजनी, नर केसरी गुरु तुम्हीच ना ?
माहूरचा सातिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ?
रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ?
कर्दळीवनिचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ?
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ?
विठाबाईचा दास मूढ परि, अंगिकारिला तुम्हीच ना ?
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दिनानाथ गुरु तुम्हीच ना ? ||६||
No comments:
Post a Comment