Saturday, 12 December 2015

असाहिष्णुता अदनान सामीकडून मोदी सरकारचा बचाव

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली भारतात असहिष्णुता असती, तर मी इथलं नागरिकत्व कशाला मागितलं असतं?, असा साधा-सरळ प्रश्न विचारत लोकप्रिय गायक अदनान सामीनं आज मोदी सरकारचा बचाव केला आहे. इथं सारं काही आलबेल चाललंय आणि म्हणूनच मी इथेच राहू इच्छितो, असं त्यानं नमूद केलं. एका हिंदी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अदनान सामीनं आपल्या सुरेल गायकीनं रसिकांची मनं जिंकली. संगीताची साथ नसतानाही, त्यानं केवळ आपल्या आवाजानं वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं. त्यानंतरच्या मुलाखतीत, मूळ पाकिस्तानी असलेल्या अदनानला कथित असहिष्णुतेबाबत विचारलं असता, त्यानं हा मुद्दा खोडून काढला. भारत ही माझी कर्मभूमी आहे. इथल्या दर्दी रसिकांचं भरपूर प्रेम मला मिळालंय. देशातील वातावरणात कुठेही असहिष्णुता दिसत नाही. तसं असतं तर मी भारताचा नागरिक होण्यासाठी प्रयत्नच केला नसता. पण, मी इथं राहू इच्छितोय, असं स्पष्ट मत अदनाननं व्यक्त केलं. दरम्यान, गेली १५ वर्षं भारतातच राहणाऱ्या आणि पाकिस्तानी नागरिकत्व सोडलेल्या अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्याचं केंद्र सरकारनं जवळजवळ नक्की केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. नागरिकत्व कायद्यातील कलम ६ अन्वये, विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, अदनान सामीची नागरिकत्वाची विनंती मान्य केली जाऊ शकते.

No comments:

Post a Comment