Saturday, 19 December 2015

नरेंद्र मोदी आणि शरीफ यांचं परस्पर सहकार्याच् आवाहन

मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद भारतातील दहशतवादी कारवायांना नेहमीच छुपी मदत करणाऱ्या पाकिस्ताननं भारताविषयीची आपली भूमिका अचानक बदलली आहे. पॅरिस परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या गुफ्तगूनंतर पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पवित्रा अचानक बदलला असून त्यांनी आपल्या मंत्र्यांना भारताच्या विरोधात कोणतीही वक्तव्यं न करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारताची पाकिस्तानविषयीची भूमिका काहीशी आक्रमक राहिली आहे. त्याच भूमिकेमुळं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची बैठक काही दिवसांपूर्वी तडकाफडकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पॅरिस परिषदेत झालेल्या दोन्ही देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर ही कोंडी फुटली. भारताशी पुन्हा सुरू झालेल्या या चर्चेत अडथळे येऊ नयेत अशी शरीफ यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मंत्र्यांना आणि नेत्यांना शेजारी देशाविषयी सांभाळून बोलण्यास सांगितलं आहे. शांतता चर्चा यशस्वी करण्यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी सहकार्य करावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. इतिहास उकरून किंवा एकमेकांविरोधी चिथावणीखोर वक्तव्यं करून चर्चा रोखणे दोन्ही देशांसाठी सोयीचे नाही याची जाणीव शरीफ यांना झाली आहे. शिवाय, सार्क संघटेनेचे सदस्य असलेल्या पाकिस्तान व भारतासाठी भारतीय उपखंडात शांतता राहणं आवश्यक आहे. सीमेवर शांतता असल्यास विकासाचा वेग वाढेल, यावर दोन्ही पंतप्रधानांचं एकमत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शरीफ यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांना भारताविषयी 'आस्ते कदम' जाण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. पॅरिस परिषदेचा परिणाम पॅरिसमध्ये हवामान बदलावरील परिषदेत मोदी व शरीफ हे दोघेही सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. या चर्चेनंतर काही दिवसांतच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा दौरा केला. स्वराज यांनी पाकचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात जम्मू-काश्मीरसह दहशतवाद, सीमाप्रश्न, तस्करी, घुसखोरी आदी मुद्द्यांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment