Friday, 18 December 2015
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पाहिजे
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
छत्रपती शिवाजी टर्मिनस असो वा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, या दोन्ही नावांसमोर 'महाराज' का नाही? हा शिवरायांचा अपमान आहे. त्यामुळे हे नाव बदलावे', अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
शुक्रवारी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना मेटे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. अशावेळी त्यांचे नाव असे केवळ 'शिवाजी' असणे अपमानजनक वाटते. यामुळे ते बदलण्याबाबत राज्य सरकारने हालचाली कराव्या, अशी मागणी आहे.'
यावर उपसभापती वसंत डावखरे यांनीदेखील हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे मत मांडले. 'छत्रपतींच्या नावासमोर महाराज हा शब्द हवाच. हा विषय केंद्राचा आहे. यामुळे राज्य सरकारने त्वरित केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करावा व बदल कसा करता येईल, याचा विचार करावा', अशी सूचना डावखरे यांनी केली. हा विषय समजून याविषयी कार्यवाही करण्याचे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
...तर 'सीएसटीएम'ऐवजी 'सीएसएमटीएम'
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसने अनेक नावे पाहिली. सुरुवातीला या स्थानकाचे नाव 'बोरीबंदर' होते. शिवाजी टर्मिनस होईपर्यंत अनेकदा हे स्थानक बोरीबंदर म्हणूनच ओळखले जाई. त्यानंतर ब्रिटिशांनी याचे नामकरण 'व्हिक्टोरिया टर्मिनस' केले. यामुळे या स्थानकाला अनेक वर्षे 'व्हीटी' किंवा 'बॉम्बे टर्मिनस' म्हणून ओळखले जाऊ लागले. युती सरकारच्या काळात 'बॉम्बे'चे नामकरण 'मुंबई' करण्यात आले. त्याचवेळी व्हीटीचे नामकरणदेखील 'छत्रपती शिवाजी टर्मिनस मेन' अर्थात 'सीएसटीएम' झाले. आता त्यात 'महाराज' लागल्यास 'सीएसएमटीएम' असे होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment