श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नामघोष चालो माझ्या मना।
तो हा नामघोष आत्म्याला संतोष। अपूर्णाला देत पूर्णपणा ॥१॥
आत्मविश्वासाचा मोठा पुरवठा । स्वामी समर्थांचा चाललेला।
डरायचे नाही रडायचे नाही। हटायचे नाही मंत्र दिला ॥२॥
भिऊ नको आहे तुझ्या पाठीशी मी। विश्वास बाळगे जो जो कुणी।
त्याचा पुनर्जन्म त्याच आश्वासने। होतसे वाटते त्याच क्षणी ॥३॥
शेत पिकवावे पोटभर खावे। नाव संकोचाचे नको नको।
जातीपातींचे ते बंधन तुटावे। विस्ताराच्या आड येणे नको॥४॥
वेदना सोसाव्या, सोसता हसावे। तीव्रता ओसरे हळुहळू।
मृत्युला का भ्यावे, सन्मित्र मानावे। आत्माराम वारा झुळुझुळू॥५॥
चिंतनी रमावे पिटाळावी चिंता। शांतीचे साम्राज्य पसरते।
समर्थांचा चेला त्याला काय कमी? पुराचे ते पाणी ओसरते॥६॥
आत्म्याला ओळख नको कमी लेखू। तुला ना उणीव कशाचीही।
अज्ञानाने तैसा फुगू नको कधी। नम्रतेने शोभे पांडित्यही॥७॥
पदांचे लालित्य नर्तक कवींचे। शंकर विलसे त्या त्या जागी।
नमावे नटेशा, स्तवावे परेशा। प्रार्थनेत व्हावे सहभागी॥८॥
ज्याच्या त्याच्यापाशी असे विरंगुळा। यत्नाने ध्यासाने मिळवावा।
ध्यासाने भेटावा, जिवाचा विसावा। सकळां लाभावा निजठेवा॥९॥
नित्य गुरुवार शिष्याला वाटतो। सद्गुरु पाउले वंदिताना।
स्वामी समर्थांशी संबंध अतूट। मनाला सांगावे पुन्हा पुन्हा॥१०॥
No comments:
Post a Comment