नांदा सौख्यभरे
समाज सांगे वधूवरांनो नांदा सौख्यभरे !ध्रु.
दोन जीव हे कोण कोठले एकत्रित झाले
देवघेव बघण्या हसण्याची वदनी स्मित फुलले
हार करातील दोघांच्याही आतुरलेत खरे!१
आश्वासन श्वसनातुन लाभे नावाला पडदा
हृत्स्पंदन छे सतारीच या गाताती दिडदा
माना डुलती, मनगटातले हासतात गजरे!२
शुभ चिंतावे, शुभ बोलावे मंगल होत असे
शुभ ऐकावे, शुभच घडावे प्रसाद लाभतसे
वृद्धांचे घ्या शुभाषीश हो आपण भावभरे!३
वत्सलतेसह सामाजिकता संयम सुखकारी
संस्कारांनी साधा आपण पुरुषार्थहि चारी
विवाहबंधन पाळताच या जन्मी मुक्त खरे!४
दूर करा पट, मी तू गेले, उरले एकपण
शब्द संपले उरले सुस्मित मौनातुन भाषण
संगीताने, संवादाने सदन करा साजिरे!५
No comments:
Post a Comment