Monday, 26 June 2017

Sant dyaneshwar

ज्ञानेश्वरांना...

आज तुला बघ लाख फुलांनी
सजवून निघते वारी
शब्दांचे चटकेच मिळाले
तेंव्हा दारोदारी.

माय-तातही गेले सोडून
जन्म पोरका झाला
बघून तुम्हा परंतु नाही
कुणा उमाळा आला.

काळीज रडले तुझे तेधवा
लावलीस तू ताटी
आणि भाजले मांडे तेंव्हा
मुक्ताईने पाठी.

इंद्रायणीही मुकाटपणी बघ
वहावयाची जेव्हा
गळामिठी भीमेस देवुनी
रडावयाची तेव्हा.

अन्न, वस्त्र अन् निवार्यासही
खरेच नव्हते काही
जनकल्याणच दिसायचे तुज
दिशांत तेव्हा दाही.

सोस-सोसुनी कस सोन्याचा
तुम्हीच केला सिद्ध
आज जाहली तिथे आळंदी
तुम्हामुळेच प्रसिद्ध.

इवले इवले जीव तुम्ही पण
जगास जिंकून गेला
अता फुलांच्या पालखीवरी
असतो सुवर्ण शेला.

तुमच्यावरती ओवाळाव्या
पोथ्या, सर्व पुराणे
कंठामध्ये तुमच्या रुजले
अध्यात्माचे गाणे.

ज्ञानाचा तो वृक्ष तुझ्या बघ
चिरंतनाचा झाला
तुझ्या समाधीवरती देवा
अता फुलोरा आला.

.... डॉ. सुनंदा शेळके....

No comments:

Post a Comment