*"तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका, आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणता .. अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?"*
असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून, निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना ही पोस्ट समर्पित आहे.
अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २८ शाकाहारी चविष्ट आणि तरीदेखील पौष्टिक पदार्थांची यादी देत आहे. महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का ?
उत्तर पोस्ट च्या तळाशी सापडेल ..
अहं! आधी पोस्ट पूर्ण वाचा ..
माझे अमहाराष्ट्रीय पेशंट सुद्धा समजावून सांगितले की, हे पदार्थ आवडीनें करून खातात ..
त्यामुळे व्यर्थ कारणें/सबबी मराठी लोकांनी तरी देऊ नयेत ..
*नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज, सोपे, कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ..)*
*(लेखिका : वैद्य - रुपाली पानसे, आद्यं आयुर्वेद , पुणे)*
१.भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबरे/तीळ चटणी बरोबर ..)
२. मिश्र भाज्यांचा पराठा - साजूक तूप
३.मिश्र भाज्यांचे (किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.) थालीपीठ धिरडे आणि ताक)
४. मटार, मका, घेवडा, खोबरे, डाळ्या, टोमॅटो आणि इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.
५. फोडणीची ताक भाकरी.
६. ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उपजे
७. भाकरी गूळ तुपाचा लाडू.
८. दडपे पोहे - भरपूर ओले खोबरें, कोथिंबीर, कांदा तसेच लिंबाचा रस टाकून
९. किंचित साजूक तुपाचा कणकेचा केळी घालून शिरा.
१०. नाचणीची उकड
११. नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.
१२. शिजवलेल्या हिरव्या मुगाची मिसळ - कांदा, टोमॅटो शेव घालून
१३. ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी
१४. खारीक, खोबरं, डिंक मेथीचा पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध .
१५. मिश्र पिठाचा ढोकळा - पुदिना जवस चटणी बरोबर
१६. तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)
१७. मिश्र पिठाचे धिरडे व चटणी
१८. मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.
१९. गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी
२०. ओले खोबरें, मटार, मका, भाज्या, हिरवी मिरची इ. घालून फोडणीचा, गव्हाचा दलिया
२१. खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी
२२. गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर
२३. सालीच्या लाहीचा चिवडा - कांदा, टोमॅटो, शेव घालून - भेळेसारखा
२४. फोडणीच्या तिखट शेवया
२५. रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )
२६. रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा
२७. मुगाची डाळ शिजवून, त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा
२८. फोडणीची भगर आणि ताक.
*२९, ३० वा पदार्थ जाहीर नाही कारण, जर २८ दिवस हे पदार्थ तुम्ही नेमाने, आळीपाळीने खाल्ले तर २ दिवस तुमच्या हक्काचें असतील ..*
भरपूर बटर लावून ब्रेड, टोस्ट खा किंवा, वैशाली, वाडेश्वर अथवा तत्सम ठिकाणीं जाऊन इडली, डोसा, उडीद वडा इत्यादींचा आनंद घ्या ..
*वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८*
*(वाटल्यास .. कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी. तुमच्या या कृतीने, लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. धन्यवाद !!!)*
No comments:
Post a Comment