आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी
सांग श्यामसुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी
त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्यांत वाजला
हाय! वाजली फिरून तीच बासरी.
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
गीत-सुरेश भट.
संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
गायिका-लता मंगेशकर.
No comments:
Post a Comment