Friday, 20 October 2017

गो देवता अष्टक

*।। गो देवता अष्टक ।।*

सडे शिंपिता अंगणी गोमयाचे ।
वरी रेखिता दिव्य गोपद्म साचे ।।
जिच्या पाउले सौख्य लाभे घराला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।१।।

जिच्या गोमयाने धरा सारवावी ।
घराची कळा अंगणालाच ठावी ।।
करी पुष्ट जी शेतकीच्या मृदेला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।।२।।

जिचा स्नेह पान्हावला रे म्हणोनि ।
मुदे चाखितो हे दही दूध लोणी ।।
सवे पोषिते लेकरा-वासराला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।३।।

हवी अग्निला आहुती गोघृताची ।
हवी पाककर्मा शुभा गोमयाची ।।
सवे तोषवी अग्नि-वैश्वानराला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।४।।

खरे नत्र 'गोमुत्र' तारी मृदेला ।
करी दूर व्याधी अशा औषधीला ।।
जिच्या प्राशिता देहही शुद्ध झाला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।५।।

स्वये रक्षिली भार्गवे कामधेनू ।
तया गोकुळीची कथा काय वाणू ।।
जिने दाविली लाघवी कृष्णलीला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।६।।

जिला गांजिता दंडिण्या ते कसाई ।
करारी शिवाजी करी खड्ग घेई ।।
प्रतीपाळने भूप प्रख्यात केला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।७।।

नसे गाय ही माय या भारताची ।
करा रे त्वरा शीघ्र गो रक्षणाची ।।
यदर्थी सुटे धाक गोहिंसकाला ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला ।।८।।

गोमाता शुभदा अखंड वरदा जी कामदा भाग्यदा ।
सांगाती अवधूत दत्त असती मार्गी जियेच्या सदा ।।
वाग्पुष्पी महिमा तिच्या सुवदनी गोग्रास हा अर्पिला ।
गोपद्मी परि दत्तदास अलिवत् मौनावला भाळला ।।९।।

No comments:

Post a Comment