Monday, 9 October 2017

माझी मुम्बई

फेडावेत पांग

समोर आली ती अन
झालो पुरा हैराण मी
ओळखीतला चेहरा
अपरिचित वाटावा
इतक्या नष्ट झालेल्या
सौंदर्याच्या खाणाखुणा
संपूर्ण शरीरभर
कमालीची अशी सूज
निदानच होत नाही
या चढलेल्या सुजेचं
की करायचा नव्हता?
उपचार तिच्यावर
हवा तसा उपभोग
घेत होते सारेजण
मनसोक्त, अमर्याद
सोन्याची अंडी देणारी
अशीच तिची ओळख
वापरली प्रत्येकाने
हवी तशी... ठरवून
पैसे कमावण्यासाठी
तिनंही सहन केलं
सारंच निमूटपणे
हुंदके देत देतंच
पचवले बॉंबस्फोट
नि हल्ले प्राणघातकी
त्या दहशतवाद्यांचे
सहन केल्या दंगली
केल्या होत्या धर्मांधांनी
तोडले तिचे लचके
उपऱ्यांनी, आपल्यांनी
तरी ती उभी निश्चल
त्या बाजीप्रभूसारखी
सगळ्यांचे अपराध
तिच्या पोटात घालून
मायेने कवटाळते
कायमच प्रत्येकाला
कोणताही दुजाभाव
ना कोणतीही अपेक्षा
कधीतरी कुणीतरी
उठावं नि फेडावेत
पांग तिच्या ममतेचे
उतराई व्हावं तिच्या,
मुंबईच्या प्रेमापोटी
- मनोज वराडे

No comments:

Post a Comment