डॉ . अल्बर्ट एलिस . अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले . आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .
२) माणसाला वाटणारी भीती ही कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .
३)निराशा येणे ही मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका .
४) जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता .
५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा .
६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका . कारण आयुष्य अजून संपलेले नाही . दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .
७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .
८ ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .
९) दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .
१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .
११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते .
हे नियम कालाबाधित आहेत . म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !
No comments:
Post a Comment