🕉 देवि उपासना 🕉
■देवीकवच■
मागच्या भागात आपण देवी कवचाचे नऊ(९) मंत्र व त्याचा भावार्थ पाहिला.हे कवच धारण करून आपण सामान्य माणसे कौटुंबिक, संसारीक समस्यांनी युक्त असणाऱ्या युद्धात उतरणार आहोत हे लक्षात घ्यावे. दुर्गासप्तशतीच्या अनेक बाबी क्रमाक्रमाने आपण समग्र जाणून घेणार आहोत.बहुतांश तज्ञमंडळीनी आता या आपल्या पाठाला.पाठिंबा दिला आहे असे दिसून येते.हळूहळू त्यांचा विरोध मावळत आहे हे पाहून आनंद वाटला.
आता आपण देवीकवचाचे पुढील मंत्र व त्याचा मराठी भावार्थ पहाणार आहोत.------
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना । लक्ष्मीःपद्मासना देवी पदमहस्ता हरिप्रिया।।१०।।
वृषभावर (बैलांवर) आरूढ झालेली माहेश्वरी, मोरावर बसलेली कौमारी देवी, कमळावर बसलेली लक्ष्मीदेवी हातात कमलपुष्प घेऊन भक्तरक्षणासाठी सदैव तत्पर आहेत.
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषभ वाहना । ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता ।।११।।
हिमकणांप्रमाणे स्वच्छ व तेजस्वी असलेली माहेश्वरी देवी
बैलावर आरूढ झालेली आहे तिने शुभ्रवस्त्रे परिधान केली आहेत. ब्राह्मी देवी सर्वालंकार रत्नसाजांनी युक्त हंसावर बसलेली दिसत आहे.
इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः ।
नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः ।।१२।।
या सर्व नवदुर्गा या आपणा सर्वांसाठी सर्वानुकूल सिद्धी व सुयोगांनी समृद्ध असून सर्वालंकार व दिव्य अशा नाना रत्नसाजांनी सुशोभित
सालंकृततेने शालीन व ममतेने परिपूर्ण दिसत आहेत.
दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः ।
शङ्खं चक्र गदां शक्तिं हलं च मुसलायुधम् ।।१३।
परमदिव्य अशा बांधणीच्या रथावर त्या आरूढ झालेल्या दिसत असून दैत्याविरुद्ध
संग्रामात उतरण्यासाठी त्यांच्या मुखावर क्रोध, त्वेष, चीड व आवेश या भावना एकत्रित होऊन त्यांनी आपापल्या हातात,शंख चक्र,गदा, शक्ती,हल,(नांगर),मुसळ इत्यादी अनेक प्रकारची आयुधे धारण केलेली आहेत.
खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च । कुन्तायुधं त्रिशूलं च शारंगमायुधमुत्तमम् ।।१४। ।
याचबरोबरीने ढाल, तोमर परशु (फरशी) फास, त्रिशूळ, कुन्त आणि शारंग धनुष्य हातात घेऊन त्या रणांगणात सज्ज झालेल्या आहेत.
दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च ।
धारयन्त्यायुधानित्थं
देवानां च हिताय वै ।।१५।।
दैत्यांचा नाश करून त्यांना देहदंड देऊन,त्यांचे समूळ उच्चाटन करून आपल्या भक्तांना निर्भय करण्यासाठी व देव देवतांच्या हिताचे रक्षणासाठी एक कल्याणकारी व्रत घेऊन ती दुर्गा शस्त्राने सज्ज झाली आहे.
नमस्तेअस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे ।
महाबले महोत्साहे
महाभयविनाशिनी ।।१६।।
हे देवी माते,या तुझ्या अतिशय रौद्र रूपाकडे पाहून महाप्रचंड अशा पराक्रमाकडे पाहून तसेच तुझा तो अपूर्व उत्साह पाहिल्यानंतर केवळ तूच आमच्या वर आलेल्या संकटाचा नाश करशील या ठाम विश्वासाने तुझ्या या सर्व रूपांना मी नमन करतो.
त्राहि माम् देवि दुष्प्रेक्ष्ये
शत्रुणां भयवर्धिनि ।
प्राच्यां रक्षतु मामैंद्री
अग्नेय्यामग्निदेवता ।।१७।।
माझ्या पूर्व दिशेकडून माझ्या वर चाल करून येणाऱ्या शत्रुला "ऐंद्री"देवि तसेच अग्नेय दिशेकडून येणाऱ्या शत्रुंना भयंकारी बनून या युध्दात ,व माझ्या कौटुंबिक संकटात माझे रक्षण करोत.
दक्षिणे$वतु वाराही
नैऋत्या खड्गधारिणी।
प्रतीच्यां वारुणी रक्षेद्
वायव्या मृगवाहिनी ।।१८।।
आमच्या दक्षिण दीशेकडून येणाऱ्या संकटसमयी"वाराही" देवी.नैऋत्येस खड्गधारिणीदेवी पश्चिमेला वारूणीदेवी,तर वायव्य दीशेस मृगवाहिनीदेवी आमचा सांभाळ करोत.
उदिंच्या पातु कौमारी
ऐशान्यां शूलधारिणी।
ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेद्धस्ताद् वैष्णवी तथा ।।१९।।
उत्तर दिशेकडून येणाऱ्या संकटात कौमारीदेवी ईशान्य दिशेकडून शूलधारिणीदेवी, आकाश दिशेकडून ब्रह्माणीदेवी,तर भूमी दिशेकडून वैष्णवीदेवी आमचे रक्षण करोत.
एवं दश दिशो रक्षेच्चामुंडा शववाहना ।
जया मे चाग्रतः पातु
विजया पातु पृष्ठतः ।।२०।।
याप्रमाणे दाही दिशांना प्रेतावर आरूढ झालेली चामुण्डा आम्हा सर्वांचे रक्षण करो. जयादेवी ही समोरील बाजूस तसेच विजयादेवी ही पाठीच्या बाजूस आमचे रक्षण करो.
अजिता वामपाश्र्वे तु दक्षिणे चापराजिता ।
शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता ।।२१।।
डाव्या बाजूस अजिता देवी, दक्षिणबाजूस अपराजिता देवी,ब्रह्मरंध्री भागाचे शिखेचे उद्योतिनी देवी व उमादेवी आमच्या मस्तकाचे रक्षण करो.
मालाधरी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी ।
त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके ।।२२॥
ललाट भागाचे मालाधरी देवी, भुवयांचे यशस्विनीदेवी तर भुवया मधील भृकुटींचे त्रिनेत्रादेवी आणि नाकाचे यमघण्टादेवी रक्षण करो.
शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी ।
कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी ।।२३।।
दोन्ही डोळ्यामधील भूमध्यस्थानाचे रक्षण शंखिनीदेवी, दोन्ही कानांचे द्वारवासिनीदेवी कपाळाचे कालिकादेवी, तर कानांच्या मूळ भागाचे रक्षण शांकरीदेवी करो.
नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका ।
अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती ।।२४।।
दोन्ही नाकपुड्यांचे रक्षण सुगंधादेवी, वरच्या ओठाचे चर्चिकादेवी अधर भागाचे अमृतकलादेवी, तर जिभेचे रक्षण सरस्वतीदेवी करो.
दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका ।
घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके ।।२५।।
बत्तीस दातांचे रक्षण कौमारीदेवी, कंठप्रदेशाचे रक्षण चंडिका देवी,
गळयाच्या घटीचे रक्षण चित्रघंटादेवी ,तर टाळूचे रक्षण महामायादेवी करोत.
कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमङ्गला ।
ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी ।।२६ ।।
हनुवटीच्या भागाचे कामाक्षीदेवी,वाचास्थानाचे सर्वमंगला देवी,मानेचे भद्रकाली देवी तर पाठीच्या मणक्याच्या भागाचे म्हणजे मेरुदंडाचे रक्षण धनुर्धारी देवी करो.
★क्रमशः★
■ शिवाजी व्यास ■
संपर्क 9975706922
No comments:
Post a Comment