श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रम्।।
(निरुपणकार: मा.डॉ. Vasudeo Deshmukh)
श्रीदत्तो जयतीह दत्तमनिशं ध्यायामि दत्तेन मे।
हृच्छुद्धिर्विहिता ततोऽस्तु सततं दत्ताय तुभ्यं नमः॥
दत्तान्नास्ति परायणं श्रुतिमतं दत्तस्य दासोऽस्म्यहम्॥
श्रीदत्ते परभक्तिरस्तु मम भो दत्त प्रसीदेश्वर ॥११०॥
(श्री दत्तः इह जयति।) श्रीदत्तच या विश्वांत जय पावतात.(दत्तं अनिशं ध्यायामि) मी निरंतर दत्तालाच ध्यातों. (दत्तेन मे हृत्+शुद्धिः विहिता।) दत्तानेच माझ्या चित्ताची शुद्धि केली. (ततः दत्ताय तुभ्यं सततं नमः अस्तु।) त्यामुळें तुज दत्ताला सदैव नमन असो. (दत्तात् श्रुतिमतं परायणं नास्ति।) दत्ताहून अन्य वेदमान्य परमपद नाही. (अहं दत्तस्य दासः अस्मि।)मी दत्ताचाच दास आहे. (मम श्रीदत्ते परभक्तिः अस्तु।)श्रीदत्ताच्या ठायींच माझी परमभक्ति असो.(भो दत्त ईश्वर, प्रसीद।) दत्तात्रेया परमेश्वरा माझ्यावर कृपा कर.
श्रीदत्तस्तवराज नांवाचे श्रीशुक आणि शिव यांच्या संवादात्मक स्तोत्र आहे. त्यांत विविध तीर्थयात्रा, उपासना, साधना आदींची लांब यादीच आहे. प्रत्येक अर्धश्लोकांनंतर "एतत्सर्वं कृतं तेन दत्त इत्यक्षरद्वयम्।" या पालुपदाने श्लोक पूर्ण केला आहे. दत्त या दोन अक्षरांच्या स्मरणाने, श्रवणाने आणि उच्चारणाने सर्व पुण्यांची प्राप्ति होते. सर्व साधनांचे साध्य गंवसते. असें हें दत्तनाम आहे. इथे या नामाच्या दहाही विभक्ती एकत्र गुंफल्या आहेत. आंबा जसा आपण, आंतून, बाहेरून, पिळून, चोखून, चाटून चाखावा तसे ह्या अमृतमधुर दत्तनामाला सर्व विभक्तीचे प्रत्यय लावून त्याच्या गोडीचा विविध अंगांनी आस्वाद श्रीस्वामी महाराज घेत असावेत. प्रसिद्ध रामरक्षेच्या शेंवटींही बुधकौशिकांनी राम नामाच्या अशाच दहा रूपांनी स्तवन केलें आहे. हा उपास्याला सुखविण्याचा एक भक्ताचा लडिवाळपणाच आहे. अर्थ स्पष्टच आहेत.
या श्लोकाच्या अंतिम चरणांत श्रीदत्तपदीं परम भक्तीचे मागणें श्रीस्वामी महाराज मागत आहेत. 'त्वदीय भक्तेः कुरु मा वियोगम्' हे आधीच्याच श्लोकंत मागितलें आहे. तेव्हां ही पुनरुक्तीच नाहीं का? अशी शंका येऊं शकते. इथे भक्ति शब्दामागें पर शब्द लावला आहे हे महत्त्वाचे आहे. योगाबरोबर साधन म्हणून मागितलेली भक्ति वेगळी आणि ही साध्यभूत परा भक्ति वेगळी. श्रीस्वामीमहाराजांनी हिची व्याख्या आत्मपूजा प्रकरणाच्या स्वोपज्ञ टीकेंत "ज्ञानोत्तरा ईश्वरानुरक्तिः" असा केला आहे. त्यासाठी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या ५१-५५ श्लोकांचा आधार दिला आहे. तिथे भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला साधक नैष्कर्म्यसिद्धि प्राप्त करून ब्रह्माशी एकरूप कसा होतो ते संक्षेपाने सांगितलें आहे. असा ब्रह्मरूप आणि प्रसन्नचित्त योगी न कशाचा शोक करतो न कशाची इच्छा. सर्व जीव त्याला सारखेच होतात. मग त्याला परा भक्ति लाभते. (ब्रह्मीभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति। समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्।।५४।।) त्या परम भक्तीने तो मला मी जो आणि जसा आहे तसा जाणतो. मला तत्त्वतः जाणल्यावर मग माझ्यांत प्रविष्ट होतो. (भक्त्या मामभिजानाति यावान् यश्चास्मि तत्त्वतः। ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम्।।५५।।) सर्व साधनांचा परिपाक असलेली ही ज्ञानोत्तर भक्ति निर्विकल्प समाधीनंतर लाभते. ह्या प्रेमभक्तीच्या उदयानंतर मोक्षाची इच्छासुद्धां उरत नाही. यासाठी ह्या परा भक्तीला पंचम पुरुषार्थ असे म्हटले आहे. ह्याच भक्तीला ज्ञानोत्तरभक्ति असेंही म्हटले आहे. ज्ञानेश्वरमहाराज हिला चवथी भक्ति म्हणतात. (म्हणोनियां दृश्यपथा-।अतीतु माझा पार्था। भक्तियोगु चवथा। म्हणितला गा।।१८.११२९). इथे श्रीस्वामीमहाराजांनी योग, भक्ति आणि भक्तीच मागितली, ज्ञानाचे नांवही काढले नाही तें कां हें लक्षांत येते. ज्ञान हे स्वयंसिद्ध आहे. ते कुणी द्यायचा प्रश्नच येत नाही.
या स्तोत्राचे हे बालबुद्धीने केलेले निरूपणात्मक अध्ययन इथे श्रीस्वामीमहाराजांच्या कृपेने पूर्णतेला गेले.
वाङ्मयं वासुदेवस्य गहनं सागरादपि।
चिंतनाय प्रवृत्तोऽस्मि मन्दोऽप्यंतरशुद्धये।।
प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी विद्वत्तेच्या, बुद्धिमत्तेच्या सर्व स्तरांतील भक्तांसाठी जे वैविध्यपूर्ण आणि विशाल वाङ्मय निर्माण केले आहे त्याची जागतिक वाङ्मयांत तोड नाही. त्यांत कांही रचना सरल तर कांही गहन आहेत. साधकाच्या रुचीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे रचना केल्या आहेत. प्रस्तुत स्तोत्र हे संस्कृत जाणणाऱ्यांना सरलच आहे. पण सद्यःस्थितीत संस्कृत फारच कमी लोकांना समजतें. अर्थात् न समजतांही या स्तोत्राचे पठण केले तरी त्याचे फल मिळतेंच. या स्तोत्राचे मुख्य फल दत्तभक्ति हेंच आहे. पण सकाम पठणाने आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी अशा सर्वही भक्तांना लाभ होतोच. तरीही जाणून केलेले पठण अधिक लाभकारक होते (विदुषस्तु फलाधिक्यम्) असे श्रीस्वामीमहाराजांनीच म्हटलें आहे. कांही दत्तभक्त स्वकीयांनी भाषेची अडचण व्यक्त केल्याने त्यांच्यासाठी हा निरूपणाचा अनधिकार प्रपंच केला आहे. श्रेष्ठ साधक आणि अधिकारी दत्तभक्त असें म्हणतात कीं श्रीस्वामीमहाराजांचे वाङ्मय हे अनेक परिमाणांत (dimensions) रचलेले असते. ग्राहकाच्या योग्यतेनुसार त्यांतून ते ते अर्थ त्याच्या चित्तांत प्रकाशतात. सर्वच श्रेष्ठ आध्यात्मिक वाङ्मयाविषयी हे खरे आहे. या महान् स्तोत्ररचनेचा अभ्यास करतांना मलाही माझ्या योग्यतेप्रमाणेच सारग्रहण करतां आले असणार हे उघडच आहे. माझ्या संस्कृतच्या आणि अध्यात्माच्या ज्ञानाच्या मर्यादांची मला तीव्र जाणीव आहे. यांतून सर्वज्ञ वाचकांनी ग्राह्य ते घ्यावे आणि त्याज्य ते टाकावे. "अधिक तें सरतें, उणें तें पुरतें" करून घ्यावे ही नम्र प्रार्थना आहे.
यथामति, यथाशक्ति केलेली ही वाङ्मयी सेवा श्रीगुरुचरणीं समर्पित असो.
इति श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं
दत्तभावसुधारसस्तोत्रं संपूर्णम्॥
No comments:
Post a Comment