🌹 *दिनकर्म* 🌹
*मूत्रपुरीषोत्सर्गाचा विधि*
तृणादिकाने आच्छादित अशा भूमिवर, डोक्यास वस्त्र गुंडाळून, यज्ञोपवीत कंठलंबित अथवा पृष्ठभागी अथवा कानावर ठेवून, नाकावर वस्त्र धरून, दिवसास व संधीकाली उत्तराभिमुख आणि रात्री दक्षिणाभिमुख मौनी, पायात जोडा न घातलेला, असा होत्साता खाली बसून मूत्र अथवा पुरीष यांचा उत्सर्ग करावा. यज्ञोपवीत कंठलंबित केल्याशिवाय कानावर ठेवणे हा अनाचार आहे. मार्ग, जल, देवालय, नदीतीर इत्यादिकांचे समीप मलोत्सर्ग निषिद्ध आहे. जलाशयापासून बारा हात जागा सोडून मूत्रोत्सर्ग करावा, जागा असल्यास सोळा हात सोडून करावा; पुरीषोत्सर्ग करण्याच त्याच्या चौपट जागा सोडावी. सूर्यासन्मुख उत्सर्ग केला असता अथवा स्वतःच्या मलाचे दर्शन झाले असता सूर्याचे अथवा गाईचे दर्शन घ्यावे. नंतर शौच करावे (प्रक्षालन करावे). जल नसल्यामुळे शुद्धि करण्यास विलंब लागला तर सचैल स्नान करावे. वर सांगितल्याप्रमाणे शोच (शुद्धि) न केली तर आठशे गायत्री जप करून तीन वेळा प्राणायाम करावा. मूत्र केल्यावर चार वेळा, पुरीषानंतर बारा अथवा आठ वेळा आणि भोजनानंतर सोळा वेळा चूळ भरून टाकावी.
*दंतधावन*
खदिरादि कंटकीवृक्ष, अर्कादि क्षीरवृक्ष व आघाडा इत्यादिकांच्या काष्ठांनी दंतधावन करावे.काष्ठ न मिळेल तर आणि श्राद्ध, उपवास इत्यादि निषिद्ध दिवशी झाडाच्या पानाने किंवा अंगठ्याजवळचे बोटखेरीज करून इतर बोटाने अथवा बारा चुळांनी दात धुवावे.
*आचमनाची निमित्ते*
कर्म करीत असता अधोवायु सरणे, अश्रुपात, क्रोध, मार्जारस्पर्श, शिंक, वस्त्रपरिधान यापैकी कोणतेही निमित्त झाले असता आचमन करावे. स्नान केल्यावर, उदक वगैरे प्राशन केल्यावर, भोजन केल्यावर आणि निद्रा केल्यावर आचमन करावे. मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग व रेत यासंबंधाने शौच केल्यावर आचमन करावे. सर्वत्र आचमन करण्याचा असंभव असेल तर दक्षिण कर्णाला स्पर्श करावा. दातात अडकलेले अन्न संभाळून काढावे; कारण दातातून रक्त निघेल तर दोष सांगितला आहे. दातात अडकलेले अन्न ते दाताप्रमाणे होय. ते अन्न काही वेळाने निघेल तर निघाल्यावर आचमन करावे. डाव्या हातात दर्भ असता उजव्या हाताने आचमन करू नये. दोन्ही हातात दर्भपवित्रक धारण करून आचमन करावे. त्याने सोमपान केल्याचे श्रेय मिळते. ते पवित्रक उच्छिष्ट होत नाही. भोजन व पित्र्यकर्म केल्यावर पवित्रक टाकावे. मलोत्सर्व व मूत्रोत्सर्ग यानंतरही टाकावे.
*आचमनविधि*
डोके व कंठ वस्त्राने आच्छादित नाही असा, खाली बसलेला, डाव्या खांद्यावरून यज्ञोपवीत धारण केलेला, पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख होत्साता, अंगुष्ठ व कनिष्ठिका मुक्त आहेत अशा हस्ताने अनुष्ण, फेस इत्यादिकांनी रहित असे उदक ह्रदयापर्यंत जाईल असे तीन वेळा प्राशन करावे.
*'केशवायनमः नारायणाय नमः माधवाय नमः'*
या तीन मंत्रांनी हे आचमन करावे.
*'गोविंदाय नमः'*
या मंत्राने दक्षिण कराचे प्रक्षालन करावे.
*'विष्णवे नमः मधुसूदनाय नमः'*
या मंत्रांनी दोन ओष्ठांचे प्रक्षालन करावे.
*'त्रिविक्रमाय नमः'*
या मंत्राने त्यांना मार्जन करावे.
*'वामनाय नमः'*
या मंत्राने उदक अभिमंत्रण करून
*'श्रीधराय नमः'*
या मंत्राने वामहस्ताचे प्रक्षालन करावे.
*'ह्रषीकेशाय नमः'*
या मंत्राने दक्षिण पायाचे प्रक्षालन करावे.
*'पद्मनाभाय नमः'*
या मंत्राने वाम पायाचे प्रक्षालन करावे.
*'दामोदराय नमः'*
या मंत्राने मस्तकावर प्रोक्षण करावे.
*'संकर्षणाय नमः'*
या मंत्राने ऊर्ध्वोष्ठावर प्रोक्षण करावे.
*'वासुदेवाय नमः'*
या मंत्राने उजव्या नाकपुडीस स्पर्श करावा.
*'प्रद्युम्नाय नमः'*
या मंत्राने डाव्या नाकपुडीस स्पर्श करावा.
*'अनिरुद्धाय नमः'*
या मंत्राने उजव्या नेत्रास स्पर्श करावा.
*'पुरुषोत्तमाय नमः'*
या मंत्राने डाव्या नेत्रास स्पर्श करावा.
*'अधोक्षजाय नमः'*
या मंत्राने उजव्या कानास स्पर्श करावा.
*'नारसिंहाय नमः'*
या मंत्राने डाव्या कानास स्पर्श करावा.
*'अच्युताय नमः'*
या मंत्राने नाभीला स्पर्श करावा.
*'जनार्दनाय नमः'*
या मंत्राने ह्रदयास स्पर्श करावा.
*'उपेंद्राय नमः'*
या मंत्राने मस्तकास स्पर्श करावा.
*'हरये नमः'*
या मंत्राने दक्षिण बाहूस स्पर्श करावा.
*'श्रीकृष्णाय नमः'*
या मंत्राने वाम बाहूस स्पर्श करावा. कोणी ग्रंथकार,
*"केशवादि"*
पहिल्या तीन नामांनी आचमन करून
*'गोविंद विष्णु'*
यांनी दोन हातांचे प्रक्षालन करावे.
*'मधुसूदन, त्रिविक्रम'*
यांनी दोन कपोलांस मार्जन करावे.
*'पद्मनाभ'*
नामाने पायाला मार्जन करावे; अथवा दोन दोन नामांनी ओष्ठास मार्जन व प्रक्षालन करावे. हस्त व पाय यांना एकेक नामाने मार्जन करावे. बाकी पूर्वीप्रमाणे करावे, असे म्हणतात. यामध्ये अंगुलीच्या अग्रांनी ऊर्ध्वोष्ठास स्पर्श करावा. अंगुष्ठ व तर्जनी यांनी दोन नाकपुड्यास स्पर्श करावा. अंगुष्ठ व अनामिका यांनी दोन नेत्रांस स्पर्श करावा. अंगुष्ठ व कनिष्ठिका यांनी दोन्ही कर्णास व नाभीस स्पर्श करावा. तळहाताने ह्रदयाला स्पर्श करावा. हस्ताने मस्तकाला स्पर्श करावा. अंगुलीच्या अग्रांनी भुजांना स्पर्श करावा. याप्रमाणे आचमनविधि करण्यास अशक्त असेल तर तीन वेळा आचमन करून हस्त प्रक्षालन करून उजव्या कानाला स्पर्श करावा. कास्य, लोखंड, शिसे, कथील आणि पितळ यांच्या पात्रांनी आचमन करू नये. श्रौताचमन करणे ते गायत्री मंत्राचे तीन चरण, आपोहिष्ठा० मंत्राचे नऊ चरण, सात व्याह्रति मंत्र, गायत्रीचे तीन चरण आणि गायत्री शिरोमंत्राचे दोन भाग याप्रमाणे चोवीस स्थानांचे ठिकाणी करावे.
*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*आचं
No comments:
Post a Comment