Sunday, 3 December 2017

श्री दत्त जन्म कथन

श्री दत्तजन्म कथा -

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदरानें स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचपुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव ! पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दलअसलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव 'साध्वी व पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेल्या शिवाय राहिली नाही. नारदांचे नांवच मुळी' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गाइले, सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्यात्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश) क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असून, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे.

“आसनी बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥

हे वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरिता आले असावे. यांस जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानि होईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागे आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, -
"थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे.त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले.

हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥

तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय..? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक! अगदीं लहान! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-

कंचुकोसहित परिधान । फेडूनि ठेवी न लगतां क्षण । नग्न होवोनियां जाण । बाळांजवळी बैसतसे ॥
बाळें घेऊनि मांडोवरी । स्तनीं लावी जेव्हां सुंदरी । पान्हा फुटला ते अवसरी । देखोनि सती आनंदे ॥

अशा तर्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली ती बालके रडू लागली. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिली. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्यांच ठिकाणीं ती तीन बालके ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते कांहीच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.

ऐसें सांगता ब्रह्मपुंत्र । तिघी मिळाल्या एकत्र । जोडोनियां पाणिपात्र । नारदासी विचारिती ।

तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार (पति) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले.तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हां तीं बालकेंपूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेने 'तिघे बालक (ब्रह्मा - विष्णु- महेश) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात,
बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमातबाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात

वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण । ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय ! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.

श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.

दत्त जन्म विषयी आणखी काही कथा -

वैकुंठीच्या राणाने अनेक अवतार धारण केले. काही अवतार दैत्यनाशासाठी केले. काही भक्तरक्षणासाठी केले. आणि ते कार्य झाल्यावर भगवंतानी लगेच अवतार समाप्ती केली. पण श्रीदत्तअवतार हा काही वेगळाच, विलक्षण, दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला. या अवतारातही भगवंत शत्रूनाश करीत असतात. पण ते बाह्य शत्रू नव्हेत.

देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आले. श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.
दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये.

१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.
२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.
३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.
४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.

श्री दत्तात्रेयांचे भ्रमण -

५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.
६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.
७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।
८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.
९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.
१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.
११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.
१२) "त्रिमुखी" किंवा "एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.
१३) "गुरुवार" हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती" म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.
१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.
१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.
१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.
१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.
१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.
२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.
२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.

श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतीकात्मकता -

तीन मुखे – ही ब्रह्मा, विष्णू, महेशांचे प्रतीक आहेत.
सहा हात – विविध प्राचीन ग्रंथांत दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले तरी दत्तसंप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला सहा हात, ब्रह्मा-विष्णू-महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू, तपस्व्याचे ‘सत्त्वा’चे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे ‘रजा’चे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू ‘तमा’चे म्हणजेच संहाराचे प्रतीक मानले जाते.
वेष – पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकाविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्योतक आहे.
धेनु – हे ‘पृथ्वी’चे किंवा ‘माये’चे प्रतीक मानले जाते.
श्वान – दत्तात्रेयांच्या आसपास असणारे चार श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्तसंप्रदायावर प्रारंभी नाथसंप्रदायाचा प्रभाव होता. भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत, तेव्हा त्यांच्याबरोबर गाईंची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. नाथसंप्रदायात ‘आदिगुरु’चे स्थान पावलेला महायोगी ‘दत्तात्रेय’ आपापत:च हे स्वरूप पावला असावा.
निवास – दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबरतळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त ‘गुरुचरित्रा’चे पारायण तेथे आवर्जून करतात.

श्रीदत्तदैवताची प्राचीनता -

शिवपुराण, शतरुद्रसंहिता, विष्णुधर्मोत्तर पुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांडपुराण, कूर्मपुराण, मरकडेयपुराण या व अशा विविध पुराणांतून दत्तात्रेयांचे उल्लेख आलेले आहेत. शांडिल्योपनिषद्, भिक्षुकोपनिषद्, अवधूतोपनिषद्, जाबालदर्शनोपनिषद्, दत्तात्रेयोपनिषद् आदी उपनिषदांतून दत्तात्रेयांच्या कार्यमहतीचे गुणगान गायले गेले आहे. दत्तसंप्रदाय इ. स. १००० पासून कार्यरत असल्याचे दिसत असले, तरी महाभारतात मात्र दत्तात्रेयांचा उल्लेख असल्याचेही दिसून येते. भगवान विष्णूने अत्रीपत्नी अनुसयेच्या पोटी अवतार घेतल्याचा उल्लेख महाभारतात आलेला आहे. दत्तात्रेयांनी सहस्रार्जुनास उपदेश केल्याचा उल्लेखही वनपर्वात (११५-१२), शांतीपर्वात (४९.३६-३७), अनुशासन पर्वात (१५२.५ व १५३.१२) आल्याचे दिसून येतो.

श्री दत्तात्रयांचे शिष्य -

सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे.
............................
© ज्योतिषी वसंतजी शेडे.
राजयोग ज्योतिष संशोधन केंद्र.
पुणे. संपर्क - ९६६५७५१४९६, ८८०६३०७१३९.

No comments:

Post a Comment