कर्ण
पांडवांचा वंश होता , भास्कराचा अंश तू …
नियतीने विषदग्ध केला , तो विखारी दंश तू ।
होऊनी रविपुत्र आला , अग्निमय स्फुल्लिंग तू …
तुल्यबळ तुज कोण होते , मुर्तीरूप ज्वाज्वल्य तू ।
लोकलाजेच्या भयाने माऊलीने त्यागले ….
त्या अलंकृत गर्भिणीचे तेजोमय वरदान तू ।
सोडूनी जळी बाळ दिधला , ठेविला फत्तर ऊरी …
हेलकावे खात वाहे , मंत्र बाधित साद तू …।
नियतीने केली हुशारी , अधिरथाचे भाग्य तू …
जन्मुनि एक राजपुत्र , ठरशी रे सूतपुत्र तू ।
थोर तू तव थोरपण रे , थोर त्या कृष्णापरी …
जन्म देऊनी कुंती त्यागे , राधेचा प्रतिपाळ तू ।
कौंतेया , राधेय झाला , बिकट तव जगणे असे …
कर्म कुठल्या जन्मीचे हो शाप ते अनुमान तू …।
न्यायी माता अन पित्याचा पुत्र चुकता मार्ग रे
साथ अन्याया करी , तो आगतिक शीलवान तू ।
लालसा जिंकुनी गेली , राज्यपद तुज लाभले ।
कवडीमोले खरीदला तो कौरवांचा दास तू ।
नकळता घडले गुन्हे, किती संगती कुसंगती …
भागीदारी पापकर्मी, करुनी चुकला खास तू ।
जागला वचनाशी अपुल्या कुंती वा दुर्योधनी …
शिंपुनी नीज रक्त धारा , पाळिले ईमान तू ।
दानशूर तुजसा न जगती , दशदिशा महिमा असा
कवच कुंडल हसुनी त्यागी , एक तो धनवान तू ।
सत्वशील अन सदगुणांचा मुर्तीमय अभिवेष तू …
शर्थ शौर्याची घडावी , चंड चंड प्रताप तू ।
भार्गवांचा शिष्य बनुनी अर्जीली विद्या तुवा …
त्या गुरूंचा शाप वाही , जन्मभरी अभिशाप तू ।
सूर्य तळपे जव नभी तू तळपला समरांगणी …
पांडवांशी झुंजला बघ पांडवांचा जेष्ठ तू ।
दुर्जनाची साथ देता , हो कलंकित जीवना
चक्र धरणीने गिळावे , वाहसी बहु शाप तू ।
थोर योद्धा , थोरवी तव , ना दुजी जगती असे
हाय कर्णा , भास्कराचे दाह भरले सत्य तू ।
मात तुज देऊ न शकला वीर पांडव एकही …
घात करुनी कृष्ण भेदे , तो चिरंतन ठाव तू ।
देह जरी त्यागुनी गेला , अमर झाला जन मनी …
सुर्यापुत्रा , तव पित्याचा दिग्दिगन्त प्रकाश तू ।
वन्दुदे वा निन्दुदे मज, जन जगी हसू दे किती …
प्रिय मज तू सुर्यापुत्रा , अद्वितीय सा उपहास तू ।
Mrs. Ujjwala Mudappu
No comments:
Post a Comment