ll जय निंदकाय नमः ll
निंदकाचे घर असावे शेजारी l
शक्य त्यावेळी त्यांनी आपली निंदा करावी भारी ll
त्यांचे शब्द घाव घालतात जरी मर्मावरी l
लगेच आपल्यातील न्यूनता दुरुस्त होते सत्वरी ll
ज्याला भविष्याची चिंता असतील भारी l
त्याने जाऊन राहावे निंदकाच्या बाजारी ll
निंदक नजर ठेवतो आपल्या प्रत्येक गोष्टीवरी l
हजार चुका आणून देतो आपल्या नजरेसमोरी ll
हितचिंतकाना जरी आपण ठेवतो सदैव अंतरी l
निंदकांना विसरू शकत नाही कदापि क्षणभरी ll
निंदकांची कृपा सदैव असते अपुल्यावरी l
दिल के सिवाय दिमागात असतो आयुष्यभरी ll
नुसत्या आठवणीने रक्त संचारते साऱ्या शरीरी l
रक्ताभिसरणाची क्रिया , तंदुरुस्ती घडते किमया ही भारी ll
काळजी, चिंता, भविष्याचे प्रश्न सोपवावे निंदकावरी l
तो जे जे वांच्छील, त्यावर अमल दुरुस्ती करावी सत्वरी ll
गतजन्माचे जितके पुण्य, तितकेच निंदकांची पुण्याई l
नशीबालाच निंदकांची साथ,पाचवीला पूजते सटवाई ll
जळी, स्थळी काष्ठी, पाषाणी सदैव निंदकांची सावली l
निंदक मानावा कृपादाता ,निंदकच मायेची माऊली ll
जिथे नाही निंदक, तो मानव जन्म मला नको आहे l
निंदक माझा कर्ता करविता, तोच माझे सर्वस्व आहे ll
हे परमेश्वरा, हेच मागणे माथा ठेवूनि तुझ्या चरणावरी l
लोखंडाचे परीस करणारे निंदक मिळोत जन्मजन्मांतरी ll
ll निंदकार्पणमस्तू ll
No comments:
Post a Comment