Monday, 11 July 2016

नाम स्वामीचे नित्य जपा रे - भजन

नाम स्वामींचे नित्य जपा रे .......!!

करिता सेवा गुरु चरणांची भाग्य येई उदयाला |
नाम स्वामीचे नित्य जपा रे शांती मिळेल मनाला ||१||

साठविता गुरु स्वरूप अंतरी फुले भक्ती मोगरा |
जुळवा कर स्वामी चरणांसी मिळे विसावा खरा ||२||

त्रिविध ताप शमतील ठेविता स्वामी चरणी माथा |
शुध्द होईल काया चिंतन गुरुरायाचे करिता ||३||

मायबाप यती स्वामीस माना, सांभाळील गुरुराणा |
करुणावचने करा प्रार्थना, तारील योगिराणा ||४||

कृपाकटाक्षे उद्धरील गुरु गाता तव गुणगाना |
ज्ञानामृत पाजील स्वामी गुरु, व्हा शरणागत चरणां ||५||

कृपाप्रचिती येईल घालीता प्रदक्षिणा वटवृक्षाला |
ध्यानी ठेवा गुरुवचन हे ‘धरुनी रहा पारंबीला’ ||६||

दर्शन देईल सद्गुरू स्वामी ओढ जरी लागेल मना |
पूर्ण करील गुरु सकल कामना, दृढ धरी श्रीगुरुचरणा ||७||

भक्तीवाचून नाही मुक्ती, गुरुवाणी ही नित्य स्मरा |
निष्ठा ठेवा हृदयी सद्गुरू, देईल चरणी आसरा ||८||

|| ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ  ||

|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||

No comments:

Post a Comment