श्री काळभैरव पाठ ( मराठी )
कृपया हा श्री काळभैरवपाठ एकदा तरी वाचा... प्राचीन आणि अद्भुत आहे.
ll श्री काळभैरव पाठ ll
ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।।
विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।।
नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।।
ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।।
नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।।
स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।।
थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।।
करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।।
पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।।
नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।।
तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।
सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।।
गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।
स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।।
नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।
आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।।
हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।
हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।।
कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।।
तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।।
कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।।
हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।।
तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।।
ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।।
तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।।
ती सांगतों सर्वासीं । म्हणे श्री काळभैरवकृपा प्रसादें ।।13।।
सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी ।
चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें ।।14।।
ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून ।
सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें ।।15।।
ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न ।
" देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे "।।16।।
तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने ।
आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।।
मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां ।
माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।।
ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण ।
म्हणाले," हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।।
मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता ।
मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।।
मी आहे परमज्योती । मीच आहे परागती ।
केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।।
अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण ।
स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें "।।22।।
झालें, ऐसें जुंपलें भांडण । " मीच श्रेष्ठें " म्हणती दोघेजण ।
शेवटीं " वेदांसी विचारूं आपण "। असें त्यांनीं ठरविलें ।।23।।
ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद ।
यांच्याशीं केला वादविवाद । " श्रेष्ठ देव कोण असे ? "।।24।।
ऋग्वेद म्हणे " ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन ।
ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे "।।25।।
यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन ।
यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।।
साम म्हणे " ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान ।
ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो " ।।27।।
अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे " जो भक्तांचे दु:ख करी दूर।।
तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी " ।।28।।
वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।।
दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।।
तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।।
म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।।
तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।।
दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।।
दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।।
त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।।
हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।।
दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।।
वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।।
त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।।
ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।।
कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।।
दुष्टांचे करी तो दमन । यास्तव ’ आमर्दक ’ नामाभिधान ।।
भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।।
’ कालराज ’ हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।।
पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।।
अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।
ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।।
माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।
मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।।
भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।
ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।।
भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।
डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्यासारखे।।41।।
मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।
ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।।
तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।
आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।।
नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।।
दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।।
देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।।
श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।।
शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।।
मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।।
अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।।
त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।।
महाकाळ,बटुकभैरव । तिसरा स्वर्णाकर्षणभैरव ।
तयावरी ठेविती भक्तीभाव । त्यांचे कल्याण होतसे ।।48।।
क्षेत्रपाल,ईशानचंडेश्वर । मृत्युंजय,मंजुघोष,अर्धनारीश्वर।
नीलकंठ,दंडपाणी,दक्षिणामूर्तिवीर । अवतार माझेच असती ते।।49।।
काळभैरवाची करतील भक्ती । त्यांची होईल कामनापूर्ती ।।
विघ्नेदु:खें दूर होती । सत्य सत्य वाचा ही ।।50।।
मग म्हणे काळभैरवासी । तूं जरी माझा अवतार अससी ।।
तरीही स्पष्ट सांगतो तुजसी । सत्य ते सत्य मानावे ।।51।।
ब्रह्मदेवाचे पाचवे मुख । माझी निंदा करी नाहक ।।
म्हणुनी फक्त तेंच मस्तक । कापिंलेस तूं कोपाने ।।52।।
क्रोधाग्नि पेटता मनी । विवेकबुद्धि भस्म होउनी ।।
घडती पापें हातुनी । अविचारी अनर्थ होतसे ।। 53।।
तू वागलास अविचाराने । तुझ्या त्या दुष्कृत्याने ।
ब्रह्महत्येच्या महापातकाने । ग्रासिले असे तुजलागी ।।54।।
ब्रम्हहत्येचे पाप अघोर । दुष्परिणाम त्याचे थोर ।।
कोणी कितीही असो बलवत्तर । पापमुक्त न होई ।।55।।
जो कोणी महापातक करी । तो तो जातो नरकपुरी ।।
अनंत युगे दु:ख भारी । भोगणे प्राप्त होतसे ।। 56।।
जेव्हा महापातकी प्राणी । मुक्त होतो नरककुंडातुनी ।।
त्याला वृक्षवेली शिळा योनी । सप्त लक्ष वर्षे लाभते ।।57।।
त्यानंतर कीड, मुंगी जीव योनी । सात हजार वर्षे कष्ट भोगुनी ।
पशुपक्षादि अनेक जन्म घेऊनी । दु:ख भोगी अपार ।।58।।
हे शिवाचे भाषण ऐकुनी । काळभैरव घाबरला मनीं ।।
म्हणे मुक्त व्हावया पापातुनी । काही उपाय सांगावा ।। 59।।
शिव म्हणे मग त्यासी । एक उपाय सांगतो तुजसी ।।
पृथ्वीवरील ती वाराणसी । अविमुक्त तें क्षेत्र असे ।।60।।
त्या क्षेत्राचे रक्षण । चण्डिका करिती रात्रंदिन ।।
त्या सर्वांचे नामाभिधान । ऐक आता सांगतो ।।61।।
दुर्गा उभी दक्षिणेला । अंतरेश्वरी नैऋत्येला ।।
अंगारेश्वरी पश्चिमेला । सुसज्ज असे सर्वदा ।। 62।।
भद्रकाली असे वायव्येला । भीमचंडी उभी उत्तरेला ।।
महामत्ता ईशान्यदिशेला । क्षेत्ररक्षण करितसे ।।63।।
उर्ध्वकेशी सहित शंकरी ।। पूर्व दिशेचे रक्षण करी ।।
अध:केशी आग्नेय कोनावरी ।। लक्ष ठेवी अखंडित ।।64।।
ऐसे ते काशीक्षेत्र जाण । भूलोकी असे पवित्र पावन ।।
तेथील पंचगंगेत करिता स्नान । पापक्षालन होतसे ।।65।।
देवदेवता, यक्ष किन्नर । नाग, सिद्ध आणि विद्याधर ।।
पिशाच्चें आणि नारीनर । होती पापमुक्त तिथें ।।66।।
त्या क्षेत्री तु जाशील जेव्हा । पापमुक्त तुही होशील तेव्हा ।।
वंद्य होऊनी सर्व देवा । सुखें तेथे राहशील ।।67।।
घ्यावयासि आतां प्रायश्चित्त । कापलेले मस्तक घे हातांत ।।
काशीला जा भिक्षा मागत । पापमुक्त व्हाया ।।68।।
ऐसे बोलुनी क्षणात । कैलासपती झाले गुप्त ।।
काळभैरव तिन्ही लोकात । भ्रमण करु लागला ।।69।।
तो पुढे पुढे चाले जरी । महापातक त्याचा पाठलाग करी ।।
येता वाराणशीच्या वेशीवरी । पाप तेथेच थांबले ।। 70।।
काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री । हातांतील शीर पडले खालती ।।
त्या स्थळा " कपालमोचन " म्हणती । तीर्थ प्रसिद्ध झाले तें ।।71।।
काळभैरव झाला तेथील । शहराचा मुख्य कोतवाल ।।
दैवत थोर काशीतील । सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो ।।72।।
आधीं दर्शन काळभैरवाचे । नंतर श्रीकाशीविश्वेश्वराचे ।।
ऐशापरी वागती तयांचे । सकल पाप जातसे ।।73।।
कार्तिक मास तो पवित्र । वद्य अष्टमी पवित्र फार ।।
काळभैरवाचा अवतार । शुभदिनी त्या जाहला ।।74।।
कोणतीही अष्टमी , चतुर्दशी । रविवार किंवा मंगळवार दिवशी ।।
शरण जावे काळभैरवासी । करावी पूजाप्रार्थना ।।75।।
तोतो होतो प्रसन्न ज्याला । दु:ख चिंता नसते त्याला ।।
अशुभ अमंगल जाते लयाला । सकल सिद्धी लाभती ।।76।।
होते इच्छित दीर्घायु संतती । मिळते स्थावरजंगम संपत्ती ।।
काळभैरवाचे महात्म्य किती । आणि कैसे वर्णावे ।।77।।
शत्रुभय आणि चोरभय । समूळ निश्चये नष्ट होय ।।
म्हणुनी तयाचेच पाय । धरावे भक्तिभावाने ।।78।।
वैभवशिखरीं भक्त चढे । दिनोदिनी लौकिक वाढे ।।
त्यासी पाहता काळ दडे । काळभैरवाच्या धाकाने ।।79।।
राजलक्ष्मी आणि राजमान्यता । मिळे समाजांत मानमान्यता ।।
काळभैरवाच्या सत्य भक्ता । उणे न पडे काहींही ।।80।।
स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी । समाधान पावले अगस्तीमुनी ।।
काळभैरवस्मरण करीत मनी । स्वस्थानी गेले आनंदे ।।81।।
यास्तव जोडुनी दोन्ही हस्त । म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र ।।
जपावा काळभैरव मंत्र । निशिदिनी मनीं अखंड 82।।
ऐसे करील जो सहामास । काळभैरव प्रसन्न होईल त्यास ।।
देव भक्तांचा होतो दास । स्वंयसिद्ध सत्य हे ।।83।।
कोणी रंक असो वा राव । हृदयी धरुनी दृढभाव ।।
प्रार्थना करिता काळभैरव । धाउनी येई संकटी ।।84।।
सदा ठेवुनी सद्वर्तन । करिती जे काळभैरव स्मरण ।।
तयांसी साक्षात शंकर भगवान । प्रत्यक्ष दर्शन देतसे ।। 85।।
भैरवाचे कराया पूजन चिंतन । काळवेळेचे नसे बंधन ।।
स्त्रीपुरुषांनी त्यासी निशिदिन । भक्तिभावे भजावे ।।86।।
घरींदारी, कचेरीत, । वाटेत किंवा प्रवासात ।
नामस्मरण करावे अखंडित । तेणे कल्याण होतसे ।।87।।
काळभैरव होता प्रसन्न । पळते पाप आणि दैन्य ।।
मिळते विपुलधनधान्य । ऐसे सामर्थ्य तयांचे ।।88।।
अघोरीविद्या, मंत्रतंत्रशक्ती । भैरवभक्तांसी कधी न बाधती ।।
स्तोत्र हे जेथे पठण करिती । तेथें भुतेखेते न राहती ।।89।।
काळभैरवासी नित्य स्मरता । बंदिवासातुन होते मुक्तता ।।
येते हाती राजसत्ता । ऐसा समर्थ देव तो ।।90।।
ॐ असितांगभैरवाय नम:। ॐ रुरुभैरवाय नम:।।
ॐ चंडभैरवाय नम:। ॐ क्रोधभैरवाय नम:।।91।।
ॐ उन्मत्तभैरवाय नम:।ॐ कपालीभैरवाय नम:।।
ॐ भीषणभैरवाय नम:। ॐ संहारभैरवाय नमो नम:।।92।।
ॐ महाकाळा, महाकोशा। महाकाया, विश्वप्रकाशा ।।
मत्ता, महेशा, सर्वेशा । काळभैरवाय नमो नम: ।।93।।
संहाररूपा, खट्वांगधारका । कंकाळा, पापपुण्यशोधका ।।
सुराराध्या, तापहारका । काळभैरवाय नमो नम: ।।94।।
लोलाक्षा, लोकवर्धना । लोस्याप्रिया, श्वानवाहना ।।
भुतनाथा, भुतभावना । काळभैरवाय नमो नम: ।।95।।
हे श्री देवाधिदेवा । कराल वदना, काळभैरवा ।।
कृपाशिर्वाद नित्य असावा । पदीं लीन जाहला ।।96।।
कुटुंबातील सर्व व्यक्ती । त्यांसी दीर्घायुष्य, आरोग्य, शक्ति ।।
बुध्दि, किर्ती, संपत्ती । देऊनी वंश वाढवी ।।97।।
जाऊं आम्ही जेथें जेथें । कार्यसिध्दी होवो तेथें ।।
मनी कुविचार भलभलते । येऊं नको देऊं तूं ।।98।।
श्री सद्गुरुस्वामीं कृपेसाठी । तुझ्या पायी घाली मिठी ।।
अपराध पापें कोटीकोटी । क्षमा त्यांची करावी ।।99।।
घरीं नांदो सतत शांतता । पडूं नये कशाची कमतरता ।।
योगक्षेमाची नसावी चिंता । हेंच देंवा मागणे ।। 100।।
शके अठराशे सत्याण्णवासी । माघमासी कृष्णपक्षीं ।।
चतुर्दशी महाशिवरात्रीसी । ग्रंथ पूर्ण झाला हा ।।101।।
श्री काळभैरवचरणार्पणमस्तु ।। शुभं भवतु ll
------------ * ------------- * ------------- * --------------
***भगवान शंकराची कृपा प्राप्त करून
No comments:
Post a Comment