६
। श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ धरोनी शिशूचा हात । अक्षरे पंडित लिहवीत । तैसे स्वामीचरित्रामृत । स्वामी समर्थ वदविती ॥१॥ मी केवळ मतिमंद । केवी वर्णू चरित्र अगाध । परी माझा हा छंद । स्वामी समर्थ पुरविती ॥२॥ ज्यांच्या वरप्रसादे करून । मुढा होई शास्त्रज्ञान । त्या समर्थांचे चरण । वारंवार नमितसे ॥३॥ कृपाळू होऊन समर्था । वदवावे आपुल्या चरित्रा । श्रवणे श्रोतयांच्या चित्ता । ब्रह्मानंद प्राप्त होवो ॥४॥ सुरतरूची घेऊनी सुमने । त्यासीच अर्पावी प्रीतीने । झाला ग्रंथ स्वामीकृपेने । त्यांच्याच पदी अर्पिजे ॥५॥ मागील अध्यायाच्या अंती । चोळप्पा विनवी स्वामीप्रती । कृपा करोनी मजवरती । बडोद्याप्रती चलावे ॥६॥ भाषण ऐसे ऐकोनी । समर्थ बोलती हसोनी । मल्हाररावाचिया मनी । आम्हांविषयी भाव नसे ॥७॥ म्हणोनी तयाच्या नगरात । आम्हा जाणे नव्हे उचित । अक्कलकोट नगरांत । आम्हा राहणे आवडे ॥८॥ ऐसी ऐकोनिया वाणी । चोळप्पा खिन्न झाला मनी । त्याने सत्वर येवोनी । तात्यांप्रती सांगितले ॥९॥ ऐसा यत्न व्यर्थ गेला । तात्या मनी चिंतावला । आपण आलो ज्या कार्याला । ते न जाय सिद्धीसी ॥१०॥ परी पहावा यत्न करोनी । ऐसा विचार केला मनी । मग काय केले तात्यांनी । अनुष्ठान आरंभिले ॥११॥ ऐसे नाना उपाय केले । परी ते सर्व व्यर्थ गेले । कार्य सिद्धीस न गेले । खिन्न झाले मुख त्यांचे ॥१२॥ भक्ती नाही अंतरी । दांभिक साधनांते करी । तयांते स्वामी नरहरी । प्रसन्न कैसे होतील ॥१३॥ तयांनी माजविली ढोंगे । आणि केली नाना सोंगे । भक्तीवीण हटयोगे । स्वामीकृपा न होय ॥१४॥ मग तात्यांनी काय केले । सप्ताहासी ब्राह्मण बैसविले । गुरुचरित्र आरंभिले । व्हावयासी स्वामीकृपा ॥१५॥ परी तयाच्या वाड्यात । कधी न गेले समर्थ । तात्या झाला व्यग्रचित्त । काही उपाय सुचेना ॥१६॥ मल्हारराव नृपाने । पाठविले ज्या कार्याकारणे । ते आपुल्या हातून होणे । अशक्य असे वाटते ॥१७॥ आता जाऊनी बडोद्यासी । काय सांगावे राजयासी । आमि सकळ जनांसी । तोंड कैसे दाखवावे ॥१८॥ ऐशा उपाये करोन । न होती स्वामी प्रसन्न । आता एक युक्ति योजून । न्यावे पळवोन यतीसी ॥१९॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । हे नेणे तो मंदमती । म्हणूनी योजिली कपटयुक्ती । परी ते सिद्धीते न जाय ॥२०॥ असो कोणे एके दिवशी । साधोनी योग्य समयासी । मेण्यात घालोनी स्वामीसी । तात्यासाहेब निघाले ॥२१॥ कडबगांवचा मार्ग धरिला । अर्धमार्गी मेणा आला । अंतरसाक्षी समर्थांला । गोष्ट विदित जाहली ॥२२॥ मेण्यातून उतरले । मागुती अक्कलकोटी आले । ऐसे बहुत वेळा घडले । हाही उपाय खुंटला ॥२३॥ मग पुढे राजवाड्यांत । जाऊनिया राहिले समर्थ । तेव्हा उपाय खुंटत । टेकिले हात तात्यांनी ॥२४॥ या प्रकारे यत्न केले । परी तितुके व्यर्थ गेले । व्यर्थ दिवस गमाविले । द्रव्य वेचिले व्यर्थची ॥२५॥ मग अपयशाते घेवोनी । बडोद्यासी आले परतोनी । समर्थकृपा भक्तीवाचोनी । अन्य उपाये न होय ॥२६॥ परी मल्हारराव नृपती । प्रयत्न आरंभिती पुढती । सर्वत्रांसी विचारीती । कोण जातो स्वामींकडे ॥२७॥ तेव्ही मराठा उमराव । नृपकार्याची धरुनी हाव । आपण पुढे जाहला ॥२८॥ स्वामीकारणे वस्त्रे भूषणे । धन आणि अमोल रत्ने । देऊनी त्याजवळी नृपाने । आज्ञा दिधली जावया ॥२९॥ तो येवोनी अक्कलकोटी । घेतली समर्थांची भेटी । वस्त्रे अलंकार सुवर्णताटी । स्वामीपुढे ठेवित ॥३०॥ ती पाहून समर्थाला । तेव्हा अनिवार क्रोध आला । यशवंता पाहोनी डोळा । काय तेव्हा बोलले ॥३१॥ अरे बेडी आणोनी । सत्वर ठोका याचे चरणी । ऐसे त्रिवार मोठ्यांनी । समर्थ क्रोधे बोलले ॥३२॥ क्रोध मुद्रा पाहोनी । यशवंतराव भ्याला मनी । पळाले तोंडचे पाणी । लटलटा कापू लागला ॥३३॥ मग थोड्याच दिवशी । आज्ञा आली यशवंतासी । सत्वर यावे बडोद्यासी । तेथील कार्यासी सोडोनी ॥३४॥ साहेबा विषप्रयोग केला । मल्हाररावावरी आळ आला । त्या कृत्यामाजी यशवंताला । गुन्हेगार लेखिले ॥३५॥ हाती पायी बेडी पडली । स्वामीवचनाची प्रचिता आली । अघटित लीला दाविली । ख्याती झाली सर्वत्र ॥३६॥ समर्थांची अवकृपा जयावरी । त्याच्या कष्ट होती शरीरी । कृपा होय जयावरी । तया सर्वानंद प्राप्त होय ॥३७॥ महासमर्था भक्तपालका । अनादिसिद्धा जगन्नायका । निशिदिनी शंकर सखा । विष्णूचिया मनी वसे ॥३८॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । षष्ठोध्याय गोड हा ॥३९॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
*स्वामीचरिञ अध्याय* *६वा-*
*वर्णन -*
*या अध्यायमध्ये असे वर्णन केले आहे की मागील आध्यायी चोळप्पानी स्वामीना विनंती केली होती कि आपण बडोद्याला चलावे.*
*तेव्हा स्वामी म्हटले होते की मल्हाररावच्या मनात आमच्या विषयी भाव नाही त्यामुळे आम्हांला बडोद्याला जाणे उचित वाटत नाही आम्ही* *अक्कलकोटमध्येच राहणार.*
*हे सर्व चोळप्पानी* *आयकल्यानंतर चोळप्पा खिन्न झाले आणि तात्याला येऊन सर्व गोष्टी सांगितल्या .*
*तात्या म्हणाले की ऐवढे प्रयत्न केले ते सर्व व्यर्थ गेले .आम्ही ज्या कार्याला आलो होतो ते सिध्दीस गेले नाही .*
*तरीही तात्यानी आशा सोडली नाही त्यांनी परत प्रयत्न सुरू केले वेगवेगळी अनुष्ठाने आरंभले,गुरूचरिञ* *आरंभिले सप्ताहात ब्राम्हण बसवले पण तरीही स्वामी तेथील वाड्यात सुध्दा गेले नाहीत .तात्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.*
*नंतर त्याने आणखी एक युक्ती केली स्वामीना मेण्यामध्ये घालून घेऊन निघाले.पण अंतरर्यामी स्वामीना लगेच समजले* *मेणा अर्धमार्गी आला तेव्हा स्वामी त्यांतुन उतरून परत अक्कलकोटी आले.तात्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले .*
*मग पुढे तात्या निराश होऊन बडोद्याप्रती आला.*
*मग पुढे मल्हार रावनी* *पुन्हा* *एकदा मराठा उमराव यशवंत यांना अक्कलकोटी पाठवले.*
*यशवंत अक्कलकोटी* *आले.स्वामीची भेट घेतली , स्वामीनंसाठी वस्ञे अलंकार सुवर्ण घेऊन आले.आणि त्या वस्तू स्वामीनपुढे मांडल्या .*
*त्यावेळी स्वामीना खुप राग आला.आणि स्वामी बोलले की बेडी आणून याच्या पायात ठोका.*
*हे सर्व पाहून यशवंताचे अंग लटलटा कापू लागले.*
*मग पुढे थोड्याच दिवसात आज्ञा आली की बडोद्याला साहेबावर विषप्रयोग झाला *आणि मल्हार राव वर आळ आले त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार ठरवले* .
*यशवंताच्या हाता पायात बेड्या पडल्या .*
*सर्वांना स्वामींच्या *वचनाची प्रचिती आली.*
*असे वर्णन या* *अध्यायमध्ये* *करण्यात आले आहे .*
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
No comments:
Post a Comment