Saturday, 5 November 2016

श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय


। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी निर्गुणा । जयजयाजी सनातना । जयजयाजी अघहरणा । लोकपाला सर्वेशा ॥१॥ आपुल्या कृपेकरोन । अल्प वर्णिले आपुले गुण । श्रोती द्यावे अवधान । श्रवणी आदर धरावा ॥२॥ अक्कलेकोटी मालोजी नृपती । समर्थचरणी जयाची भक्ति । स्वहस्ते सेवा नित्य करिती । जाणोनी यती परब्रह्म ॥३॥ वेदांत आवडे तयासी । श्रवण करिती दिवसनिशी । शास्री हेरळीकरादिकांसी । वेतने देऊनि ठेविले ॥४॥ त्या समयी मुंबापुरी । विष्णुबुवा ब्रह्मचारी । प्राकृत भाषणे वेदांतावरी । करुनी लोका उपदेशिती ॥५॥ कैकांचे भ्रम दवडिले । परधर्मोपदेशका जिंकिले । कुमार्गवर्तियांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी ॥६॥ त्यांसी आणावे अक्कलकोटी । हेतु उपजला नृपापोटी । बहुत करोनी खटपटी । बुवांसी शेवटी आणिले ॥७॥ नृपा आवडे वेदांत । बुवा त्यात पारंगत । भाषणे श्रोतयांचे चित्त । आकर्षूनि घेती ते ॥८॥ रात्रंदिन नृपमंदिरी । वेदांतचर्चा ब्रह्मचारी । करिती तेणे अंतरी । नृपती बहु सुखावे ॥९॥ अमृतानुभवादि ग्रंथ । आणि ज्ञानेश्वरी विख्यात । कित्येक संस्कृत प्राकृत । वेदांत ग्रंथ होते जे ॥१०॥ त्यांचे करोनि विवरण । संतोषित केले सर्व जन । तया नगरी सन्मान । बहुत पावले ब्रह्मचारी ॥११॥ ख्याती वाढली लोकांत । स्तुति करिती जन समस्त । सदा चर्चा वेदांत । राजगृही होतसे ॥१२॥ जे भक्तजनांचे माहेर । प्रत्यक्ष दत्ताचा अवतार । ते समर्थ यतीश्वर । अक्कलकोटी नांदती ॥१३॥ एके दिवशी सहज स्थिती । ब्रह्मचारी दर्शना येती । श्रेष्ठ जन सांगाती । कित्येक होते तया वेळी ॥१४॥ पहावया यतीचे लक्षण । ब्रह्मचारी करिती भाषण । काही वेदांतविषय काढून । प्रश्न करिती स्वामींसी ॥१५॥ ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार । ऐसे ऐकोनि सत्वर । यतिराज हासले ॥१६॥ मुखे काही न बोलती । वारंवार हास्य करिती । पाहून ऐशी विचित्र वृत्ती । बुवा म्हणती काय मनी ॥१७॥ हा तो वेडा संन्यासी । भुरळ पडली लोकांसी । लागले व्यर्थ भक्तिसी । याने ढोंग माजविले ॥१८॥ तेथोनि निघाले ब्रह्मचारी । आले सत्वर बाहेरी । लोका बोलती हास्योत्तरी । तुम्ही व्यर्थ फसला हो ॥१९॥ परमेश्वररुप म्हणता यती । आणि करिता त्याची भक्ति । परी हा भ्रम तुम्हांप्रती । पडला असे सत्यची ॥२०॥ पाहोनि तुमचे अज्ञान । याचे वाढले ढोंग पूर्ण । वेदशास्रादिक ज्ञान । याते काही असेना ॥२१॥ ऐसे ब्रह्मचारी बोलोनी । पातले आपुल्या स्वस्थानी । विकल्प पातला मानी । स्वामींसी तुच्छ मानिती ॥२२॥ नित्यनियम सारोन । ब्रह्मचारी करिती शयन । जवळी पारशी दोघेजण । तेही निद्रिस्थ जाहले ॥२३॥ निद्रा लागली बुवांसी । लोटली काही निशी । एक स्वप्न तयांसी । चमत्कारिक पडलेसे ॥२४॥ आपुल्या अंगावरी वृश्चिक । एकाएकी चढले असंख्य । महाविषारी त्यातुनी एक । दंश आपणा करीतसे ॥२५॥ ऐसे पाहोनी ब्रह्मचारी । खडबडोनी उठले लौकरी । बोबडी पडली वैखरी । शब्द एक ना बोलवे ॥२६॥ जवळी होते जे पारशी । जागृती आली तयांसी । त्यांनी धरोनी बवांसी । सावध केले त्या वेळी ॥२७॥ हृदय धडाधडा उडू लागले । धर्मे शरीर झाले ओले । तेव्हा पारशांनी पुसले । काय झाले म्हणोनी ॥२८॥ मग स्वप्नीचा वृत्तांत । तयासी सांगती समस्त । म्हणती यात काय अर्थ । ऐसी स्वप्न कैक पडती ॥२९॥ असो दुसऱ्या दिवशी । बुवा आले स्वामींपाशी । पुसता मागील प्रश्नासी । खदखदा स्वामी हासले ॥३०॥ मग काय बोलती यतीश्वर । ब्रह्मपदी तदाकार । होण्याविषयी अंतर । तुझे जरी इच्छितसे ॥३१॥ तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी । काय म्हणोनी भ्यालासी । जरी वृथा भय मानितोसी । मग ब्रह्मपदी जाणसी कैसे ॥३२॥ ब्रह्मपदी तदाकार होणे । हे नव्हे सोपे बोलणे । यासी लागती कष्ट करणे । फुकट हाता न येचि ॥३३॥ बुवांप्रती पटली खूण । धरिले तत्काळ स्वामीचरण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद़्गदित ॥३४॥ त्या समयापासोनी । भक्ती जडली स्वामीचरणी । अहंकार गेला पळोनी । ब्रह्मपदा योग्य झाले ॥३५॥ स्वामीचरित्र महासागर । त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर । त्याचा करोनिया हार । अर्पी शंकर-विष्णुकवी ॥३६॥ इति श्री स्वामी चरित्र महासागर । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥३७॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
स्वामीचरिञ अध्याय-७वा

वर्णन -

या अध्यायात असे वर्णन केले आहे की त्या काळी विष्णुबुवा नावाचे एक ब्रम्हचारी गृहस्थ होते..
त्याचा वेदांतावर खुप मोठा अभ्यास होता..
ते लोकांना उपदेश करत असत.
त्यांनी
कित्येक जणाना सन्मार्गावर आणले होते.
त्याची प्रख्याती खुप होती.
विष्णुबुवा एके दिवशी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले होते.
विष्णुबुवा स्वामीन जवळ आल्यानंतर त्यांनी स्वामीना एक प्रश्न विचारला
प्रश्न -ब्रम्हपद तदा कार होणे म्हणजे काय त्यावर निर्धार काय आहे.
हा प्रश्न स्वामीनी आयकल्यानंतर स्वामीना हासू आले.स्वामी काहीच बोलले नाही .
हे पाहून विष्णुबुवाना राग आला आणि ते लोकांना म्हणू लागले की तुम्ही फसला आहात या स्वामीना तुम्ही परमेश्वर मानता तो पाखडी ढोगी आहे.
असे म्हणून विष्णुबुवा तेथुन निघून गेले.

विष्णुबुवा रात्री ऐके ठिकाणी जाऊन झोपतात.
त्याच्या शेजारी दोन पारसी देखील होते.
विष्णुबुवा ना रात्री झोपेत स्वप्न पडते की असंख्य असे वृश्चिक अंगावर आले आहेत आणि ते अत्यंत विषारी असुन ते त्यांना दंश करत आहेत .
हे स्वप्न पाहून विष्णुबुवा खुप घाबरले आणि खडबडून उठले.
त्याची बोबडी बंद पडली .
*जवळ झोपलेल्या पारशीना जाग आली .आणि ते जागे झाले त्यांनी विष्णुबुवाना धरून सावध केले .
विष्णुबुवाचे हृद्य धडाधड उडू लागले होते .
सर्व शरीर घामाने ओले झाले होते.
तेव्हा पारशानी त्यांना विचारले काय झाले तुम्ही ऐवढे का घाबरला आहात.मग विष्णुबुवानी स्वप्नात पडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला .
पारशी म्हणाले काही नाही असे स्वप्न कित्येक वेळा पडतात.
मग दुसऱ्याच दिवशी विष्णुबुवा स्वामीनंकडे परत येतात .
मागे विचारलेल्या प्रश्नावर स्वामी परत हासू लागले आणि विष्णुबुवा ला
म्हणाले की ब्रम्हपद तदांकार होणे सोपे नाही.
तु स्वप्नी वृश्चिक पाहून का भ्याला.
मग ब्रम्हपद जाणणार कसे, ब्रम्हापद तदाकार होणे हे सोपे नाही यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात ते असे फुकट मिळणार नाही .
हे सर्व ऐकून विष्णुबुवाना खुण पटली की स्वामी अंतरर्यामी आहेत .
ते स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात .
विष्णुबुवाचा अहंकार नष्ट होऊन स्वामीनंप्रती भक्ती निर्माण होते .
असे वर्णन या अध्यायामध्ये केले आहे .
म्हणजे तात्पर्य असे की ब्रम्हपद तदांकार होणे सोपे नाही ,
तसेच अहंकार ही नको...
🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

No comments:

Post a Comment