श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय
११
। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले । पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥ तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात । यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥ तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय । फिटेल सर्वही संदेह । श्री सद़्गुरुकृपेने ॥३॥ परी मुरगोडीचे विप्र । बाळाप्पासी सांगत । गाणगापूर विख्यात । महाक्षेत्र भीमातीरी ॥४॥ तेथे आपण जावोनी । बैसावे हो अनुष्ठानी । श्रीगुरु स्वप्नी येवोनी । सांगती तैसे करावे ॥५॥ मानला तयासी विचार । निघाले तेथूनी सत्वर । जवळी केले गाणगापूर । परम पावन स्थान ते ॥६॥ कामना धरोनी चित्ती । सेवेकरी सेवा करिती । जेथे वाहे भीमा नदी । स्नान करिती भक्तजन ॥७॥ पुत्रकामना धरुनी चित्ती । आराधिती नृसिंहसरस्वती । दरिद्री धन इच्छिती । रोगीजन आरोग्य ॥८॥ कोणी घालिती प्रदक्षिणा । कोणी ब्राह्मणभोजना । कोणी करिती गंगास्नाना । कोणी घालिती नमस्कार ॥९॥ तेथील सर्व सेवेकरी । नित्य नियमे दोन प्रहरी । मागोनिया मधुकरी । निर्वाह करिती आपुला ॥१०॥ बाळाप्पा तेथे पातले । स्थान पाहोनी आनंदले । नृसिंहसरस्वती पाऊले । प्रेमभावे वंदिली ॥११॥ प्रातःकाळी उठोनी । संगमावरी स्नान करोनी । जप ध्यान आटपोनी । मागुनी येती गावात ॥१२॥ सेवेकऱ्यांबरोबरी । मागोनिया मधुकरी । भोजनोत्तर संगमावरी । परतोनि येती ते ॥१३॥ माध्यान्ह स्नान करोनी । पुन्हा बैसली जप ध्यानी । अस्ता जाता वासरमणी । संध्यास्नान करावे ॥१४॥ करोनिया संध्यावंदन । जप आणि नामस्मरण । रात्र पडता परतोन । ग्रामामाजी येती ते ॥१५॥ बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी । संतती संपत्ती सर्व सदनी । परान्न ठावे नसे स्वप्नी । सांप्रत भिक्षा मागती ॥१६॥ सद़्गुरुप्राप्तीकरिता । सोडूनी गृह-सुत-कांता । शीतोष्णाची पर्वा न करिता । आनंदवृत्ती राहती ॥१७॥ पंचपक्वान्ने सेविती घरी । येथे मागती मधुकरी । मिळती कोरड्या भाकरी । उदर पूर्ती न होय ॥१८॥ शीतोष्णाचा होय त्रास । अर्धपोटी उपवास । परी तयांचे मानस । कदा उदास नोहेची ॥१९॥ अय्याराम सेवेकरी । राहत होते गाणगापुरी । त्यांनी देखुनी ऐसीपरी । बाळाप्पासी बोलती ॥२०॥ तुम्ही भिक्षा घेवोनी । नित्य यावे आमुच्या सदनी । जे जे पडेल तुम्हांस कमी । ते ते आम्ही पुरवू जी ॥२१॥ बाळाप्पासी मानवले । दोन दिवस तैसे केले । पोटभरोनी जेवले । परी संकोच मानसी ॥२२॥ जाणे सोडिले त्यांचे घरी । मागोनिया मधुकरी । जावोनिया संगमावरी । झोळी उदकी बुडवावी ॥२३॥ आणोनिया बाहेरी । बैसोनी तिथे शिळेवरी । मग खाव्या भाकरी । ऐसा नेम चालविला ॥२४॥ ऐसे लोटले काही दिवस । सर्व शरीर झाले कृश । निशिदीनी चिंता चित्तास । सद़्गुरुप्राप्तीची लागली ॥२५॥ घरदार सोडिले । वनिता पुत्रा त्यागिले । अतितर कष्ट सोशिले । सद़्गुरुकृपा नोहेची ॥२६॥ हीन आपुले प्राक्तन । भोग भोगवी दारुण । पहावे सद़्गुरुचरण । ऐसे पुण्य नसेची ॥२७॥ ऐसे विचार निशिदीनी । येती बाळाप्पाचे मनी । तथापि कष्ट सोसोनी । नित्य नेम चालविला ॥२८॥ एक मास होता निश्चिती । स्वप्नी तीन यतिमूर्ती । येवोनिया दर्शन देती । बाळाप्पा चित्ती सुखावे ॥२९॥ पंधरा दिवस गेल्यावरी । निद्रिस्त असता एके रात्री । एक ब्राह्मण स्वप्नाभीतरी । येवोनिया आज्ञापी ॥३०॥ अक्कलकोटी श्रीदत्त । स्वामीरुपे नांदत । तेथे जाऊनी त्वरित । कार्य इच्छित साधावे ॥३१॥ पाहोनिया ऐसे स्वप्न । मनी पावले समाधान । म्हणती केले कष्ट दारुण । त्याचे फळ मिळेल की ॥३२॥ अक्कलकोटी त्वरीत । जावयाचा विचार करीत । तव तयासी एक पत्र । शय्येखाली सापडले ॥३३॥ त्यात लिहिली एक ओळी । करु नये उतावळी । ऐसे पाहूनी त्या वेळी । विचार केला मानसी ॥३४॥ आपण केले अनुष्ठान । परी ते जाहले अपूर्ण । आणखीही काही दिन । क्रम आपुला चालवावा ॥३५॥ मग कोणे एके दिवशी । बाळाप्पा आले संगमासी । वृक्षातळी ठेवून वस्त्रासी । गेले स्नान करावया ॥३६॥ परतले स्नान करोनि । सत्वर आले त्या स्थानी । वस्त्र उचलिता खालोनी । वृश्चिक एक निघाला ॥३७॥ तयासी त्यांनी न मारिले । नित्यकर्म आटोपिले । ग्रामामाजी परत आले । गेले भिक्षेकारणे ॥३८॥ त्या दिवशी ग्रामाभीतरी । पक्वान्न मिळाले घरोघरी । बाळाप्पा तोषले अंतरी । उत्तम दिन मानिला ॥३९॥ अक्कलकोटी जावयासी । निघाले मग त्याच दिवशी । उत्तम शकुन तयांसी । मार्गावरी जाहले ॥४०॥ चरण-चाली चालोनी । अक्कलकोटी दुसरे दिनी । बाळाप्पा पोचले येवोनी । नगरी रम्य देखिली ॥४१॥ जेथे नृसिंहसरस्वती । यतिरुपे वास करिती । तेथे सर्व सौख्ये नांदती । आनंद भरला सर्वत्र ॥४२॥ तया नगरीच्या नारी । कामधंदा करिता घरी । गीत गाउनी परोपरी । स्वामीमहिमा वर्णिती ॥४३॥ दूर देशीचे ब्राह्मण । वैश्यादिक इतर वर्ण । स्वामीमहिमा ऐकोन । दर्शनाते धावती ॥४४॥ तयांची जाहली गर्दी । यात्रा उतरे घरोघरी । नामघोषे ते नगरी । रात्रंदिन गजबजे ॥४५॥ राजे आणि पंडित । शास्त्री वेदांती येत । तैसे भिक्षुक गृहस्थ । स्वामीदर्शनाकारणे ॥४६॥ कानफाटे नाथपंथी । संन्यासी फकीर यती । रामदासी अघोरपंथी । दर्शना येती स्वामींच्या ॥४७॥ कोणी करिती कीर्तन । गायन आणि वादन । कोणी भजनी नाचोन । स्वामीमहिमा वर्णिती ॥४८॥ तया क्षेत्रीच महिमान । केवी वर्णू मी अज्ञान । प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन । स्वामीकृपेने जाहले ॥४९॥ पुण्यपावन देखोन नगरी । बाळाप्पा तोषले अंतरी । पूर्वपुण्य तयांचे पदरी । जन्मसार्थक जाहले ॥५०॥ बाळाप्पा होउनी सेवेकरी । स्वहस्ते करील श्रीचाकरी । ती मधुर कथा चतुरी । पुढील अध्यायी परिसावी ॥५१॥ जयाचा महिमा अगाध । जो केवळ सच्चिदानंद । विष्णूशंकरी अभेद । मित्रत्व ठेवो जन्मवरी ॥५२॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । श्रोते सदा परिसोत । एकादशोऽध्याय गोड हा ॥५३॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
*🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻*
*स्वामीचरीञ अध्याय ११ वा*
*वर्णन*-
*या अध्यायामध्ये असे वर्णन केले आहे की मागील अध्यायी बाळप्पा मुरगोडी या नगरातुन अक्कलकोटला जाण्यासाठी निघतात पण तेवढयात त्या ठिकाणी असणारे लोक त्यांना सांगतात की तुम्ही गाणगापुर या विख्यात महाक्षेञ भीमातीरी जा*.
*तिथे तुम्ही अनुष्ठान करा*.
*दत्त गुरू स्वप्नात येतील ते* *जे काही सांगतिल तसे तुम्ही करा*,
*मग हे ऐकून बाळप्पा गाणगापूरला येतात* .
*ते तेथे पाहतात की कोणी प्रदक्षिणा घालत आहे ,कोणी ब्राम्हण भोजन करत आहे* .
*तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमाने दोन वाजता भिक्षा (मधुकरी) मागून आपला* *उदारनिर्वाह करत आहेत* .
*बाळप्पा तेथे येतात तेथील सर्व गोष्टी पाहून आनंदीत होतात*.
*बाळप्पा तेथे राहतात ,सकाळी लवकर उठून संगमावर अंघोळ करून , जप ध्यान उरकुन गाणगापूर मधील गावात येतात , तेथे ते* *सेवेकय्रांबरोबर माधुकरी मागुन भोजनासाठी परत संगमावर येतात* .
*परत मध्यराञी अंघोळ करून जप ध्यानाला बसतात*.
*बाळप्पाला घरी असताना पंचपक्कान्ने खाण्यास मिळत असे आणि आता* *येथे कोरड्या भाकरी मधूकरी मागून खावी लागे.त्यामुळे त्याचे* *पोटभरत नसे*.
*हे सर्व तेथे असणारे* *सेवेकरी पाहत असे,ते सेवेकरी बाळप्पाला म्हणतात तुम्ही तुमची भिक्षा घेऊन नित्य* *आमच्याकडे या जे जे तुम्हाला कमी पडेल ते ते आम्ही तुम्हाला पुरवु*.
*बाळप्पाला हे पटते आणि तो नित्य नियमाने आपली भिक्षा घेऊन त्या सेवेकय्रांनकडे जाऊ* *लागला आणि आपली भिक्षेची झोळी त्या* *ठिकाणी खाली करू लागला .मग सर्व भिक्षा एकत्र केली जात असे, बाळप्पा त्यातील काही* *भाकरी घेऊन शिळेवर भोजन करत असे असा नियम त्यांनी चालविला*.
*कालांतराने त्यांना चिंता* *जाणवू लागली आपण जे सद्गुरू शोधासाठी सर्व घरदार सोडून आलो आहे ते कार्य अजून सिध्दिस येत नाहीये* .
*ऐके दिवशी बाळप्पाला *स्वप्नामध्ये तीन यतिमूर्ती दिसतात ते बाळप्पाला *दर्शन देतात, त्यांने बाळप्पा सुखवतात*.
*पंधरा दिवसानंतर* *बाळप्पाला पुन्हा एक स्वप्न पडते या स्वप्नामध्ये एक ब्राम्हण येतो तो त्यांना अज्ञा करतो की श्री दत्त हे अक्कलकोटी स्वामीरूपे* *नांदत आहेत आपण तेथे जाऊन आपले कार्य त्वरित सिद्ध करावे*.
*मग बाळप्पा* *अक्कलकोटला जाण्याचा विचार करतात पण तेवढयात त्यांना शय्येखाली एक पञ सापडते ,त्या पञामध्ये असे लिहिलेले असते की आपण उतावळे होऊ नका.हे पाहून बाळप्पा मनात विचार करतात की आणखी काही दिवस आपला जो काही नित्य क्रम आहे तो असाच चालू ठेवावा*.
*मग पुढे बाळप्पा ऐके दिवशी संगमावर अंघोळीसाठी जातात .अंघोळ करून परत ज्या ठिकाणी कपडे ठेवले आहेत त्या ठिकाणी येतात .*आपले कपडे उचलतात* *तर त्याखाली विंचू निघतो *ते त्याला मारत नाहीत* .
*आपले सर्व नित्य क्रम उरकुन गावामध्ये परत भिक्षा मागण्याठी* *जातात.या वेळेला त्यांना *भरपूर भिक्षा मिळते*
*ते त्या दिवसाला उत्तम दिवस मानतात*.
*आणि अक्कलकोटला जाण्यासाठी त्याच दिवशी निघतात*.
*ते दुसऱ्या दिवशी *अक्कलकोटला पोहचतात*.
*ते तेथे पाहतात की त्या* *ठिकाणी विविध नगरीच्या नारी कामधंदा करत घरी स्वामीचे गीत गाऊन स्वामी* *महिमा वर्णित आहेत* .
*तसेच ब्राह्यण , साधुसंत, राजे पंडित ,वेदांत* *शास्ञी,कानफाटे नाथपंथी , संन्यासी फकीर हे सर्व जण स्वामीच्या दर्शनासाठी याञे सारखी गर्दी करत आहेत* .
*कोणी भजन किर्तन गायन करून स्वामीमहिमा वर्णित आहे* .
*हे सर्व दृश्य बाळप्पा पाहत आहेत* .
*असे वर्णन या अध्यायामध्ये केले आहे असे दिसून येते*.
*🙏🏻🌹|| श्री स्वामीसमर्थ ||🌹🙏🏻*
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
No comments:
Post a Comment