पूर्तता
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.
वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही
गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी.
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे ,लोचने आता मिटावी.
सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.
दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी
आसवे सा-या फुलांची रोज खाली ओघळावी.
कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे !
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी.
हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी !
काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !
~सुरेश भट
No comments:
Post a Comment