Saturday, 7 January 2017

बांधा सेतू, सेतू रे सागरी

बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं

गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी

फेका झाडें, फेका डोंगर
पृष्ठीं झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्‍नी तो धरील माथीं सेतू शेषापरी

रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी

नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी

चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
आरंभास्तव अधिर पूर्तता
शिळा हो‌उनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी

गर्जा, गर्जा हे वानरगण !
रघुपती राघव, पतीतपावन
जय लंकारी, जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी

सेतू नच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी

बुभुःकारुनी पिटवा डंका
विजयी राघव, हरली लंका
मुक्त मैथिली, कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी

No comments:

Post a Comment