( इचलकरंजीतील शिवतीर्थावरील शिवप्रभूंच्या भव्य पुतळ्यास पाहून )
शिववाणी !
ही कुठे खिळाली नजर आपुली शिवबा
का उत्तरेकडे असे पाहता शिवबा
ही मराठमोळी भोळी जनता आपुली
तव जयंतीत सैराटुन गेली , तोबा !!
ती कुठे गळाली तेज नजर रसरसली ?
ती विनायकाची झडप कुठे हो झडली ?
तव गंभीर मुद्रा , तरवारीचा हात
का बावरली ? अन कट्यार का ही लपली ?
हे दुःख ठिबकते पहा चेहऱ्यावरती
ही म्लान आपुली दिसे शुभ्र यशवंती !
कि उत्तरेकडे औरंग्या तो लपला ?
ही नजर अजुनी वेध तयाचा घेती ?
“ छे नव्हे ! “ , मुखातुन घुमली गंभीर वाणी
बिजलीपरि मुद्रा गेलि क्षणी उजळोनी
वाटले शिवाचा त्रितीय नेत्र फडफडला
सरी कोसळल्या ठिणग्यांच्या वरुनि कानी !
“ हे नादाना , तू शपथ भक्तीची वदला
हे म्लेंच्छ हाकण्या अर्पिन तव रक्ताला
पण म्लेंच्छ कोठले तेच तुला ना कळले
अन तूच अता रे म्लेंच्छ होऊनि बसला !
ही विलासता का तुझ्यामध्ये अवतरली ?
का मनी तुझ्या स्वार्थाला जागा झाली ?
तो नाग आवळी घट्ट आईची मान
तव गळा मोकळा खाण्याला दीपाली !
अरि स्कंधावरती करितो तांडवनाच
अन उरावरी तू खुशाल घेशी लाच
ती लाच घेऊनि नाचही तव बघताना
किती आवरला परी अश्रू तरी आलाच !
हे डोळे माझे त्याच्यावरती खिळले
अन अश्रू तुझिया कर्मावरती रडले
हे हिंदभूमीच्या पुत्रानो जागे व्हा
ते शूर मावळे तुम्हासाठी खपले !
त्या नागांच्या नरड्यावर ठेवूनि टाच
अन अरिवर करुनि तलवारीचा नाच
या शिवबाचे मावळे सरसहा लढले
या भवानीची हो खरी काज त्यांनाच !
कधी फिकीर केली घराची ना दाराची
घर घोडा होता , दारा तलवारीची
तो स्वार्थ जाळला असा सर्व शूरांनी
औलाद तयांची , तुम्हाच का नीचांची ?
अन म्हणून या हृदयाचे तुकडे झाले
या शिवबाचे काळीज दुभंगून गेले !
पळपळास दृष्टी उत्तरेकडे वळते
तव भविष्य बघुनी मन माझे क्रंदिले !
हा थांब ! अजुनी गेली नाही वेळ
त्या सुदर्शनाला धार लाव , तू काळ
श्रीकृष्णार्जुन अन शिवबा होऊनि गेले
या स्मरुनि आम्हाला उचल भवानीढाल !! “
आनंद बावणे .
……
No comments:
Post a Comment