¤ बाहुली -- (वृत्त : हरीभगिनी)
आज भेटली स्वप्नामध्ये एक बाहुली छोटीशी.
तुला सांगते गंमत आई, परीसारखी होती ती.
निळा जांभळा चमचमणारा आवडणारा रंग मला.
दुकानातल्या काचेमधला झंपर होता तसा तिचा.
कानामध्ये डूल छानसे मान हलवता डुलणारे.
बघितलेच मी हात लाउनी, अगदी खरेच होते ते.
आम्ही म्हटली गाणी कित्ती आणि नाचलो अंगणभर.
आपले जसे तसे तिचेही होते छोटे सुंदर घर.
घरात इवले कपाट होते, आत खेळणी किती किती.
तांब्या कळशी वाटी भांडी हवी तेवढी भरलेली.
भिंतीवरती एक आरसा त्यात पाहिले उभी मला.
आवडले मी बाहुलीस अन उडी मारली तिने जरा.
कागदातले चॉकलेट वर मोठा तुकडा बर्फीचा.
मी निघताना देत म्हणाली, 'चिंचा बोरे आण मला.'
. . . शिवाजी सावंत.
No comments:
Post a Comment