Thursday, 2 February 2017

जरी कालभैरव पाठ

श्री काळभैरव पाठ ll ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।। विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।। नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।। ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।। नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।। स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।। थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।। करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।। नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।। तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।। सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।। गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।। स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।। नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।। आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।। हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।। कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।। तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।। कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।। हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।। तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।। ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।। तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।। ती सांगतों सर्वासीं । म्हणे श्री काळभैरवकृपा प्रसादें ।।13।। सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी । चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें ।।14।। ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून । सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें ।।15।। ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न । " देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे "।।16।। तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने । आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।। मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां । माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।। ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण । म्हणाले," हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।। मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता । मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।। मी आहे परमज्योती । मीच आहे परागती । केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।। अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण । स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें "।।22।। झालें, ऐसें जुंपलें भांडण । " मीच श्रेष्ठें " म्हणती दोघेजण । शेवटीं " वेदांसी विचारूं आपण "। असें त्यांनीं ठरविलें ।।23।। ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद । यांच्याशीं केला वादविवाद । " श्रेष्ठ देव कोण असे ? "।।24।। ऋग्वेद म्हणे " ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन । ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे "।।25।। यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन । यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।। साम म्हणे " ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान । ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो " ।।27।। अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे " जो भक्तांचे दु:ख करी दूर।। तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी " ।।28।। वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।। दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।। तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।। म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।। तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।। दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।। दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।। त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।। हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।। दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।। वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।। त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।। ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।। कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।। दुष्टांचे करी तो दमन । यास्तव ’ आमर्दक ’ नामाभिधान ।। भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।। ’ कालराज ’ हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।। पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।। अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।। ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।। माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।। मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।। भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।। ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।। भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।। डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्‍यासारखे।।41।। मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।। ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।। तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।। आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।। नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।। दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।। देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।। श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।। शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।। मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।। अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।। त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।। महाकाळ,बटुकभैरव । तिसरा स्वर्णाकर्षणभैरव । तयावरी ठेविती भक्तीभाव । त्यांचे कल्याण होतसे ।।48।। क्षेत्रपाल,ईशानचंडेश्वर । मृत्युंजय,मंजुघोष,अर्धनारीश्वर। नीलकंठ,दंडपाणी,दक्षिणामूर्तिवीर । अवतार माझेच असती ते।।49।। काळभैरवाची करतील भक्ती । त्यांची होईल कामनापूर्ती ।। विघ्नेदु:खें दूर होती । सत्य सत्य वाचा ही ।।50।। मग म्हणे काळभैरवासी । तूं जरी माझा अवतार अससी ।। तरीही स्पष्ट सांगतो तुजसी । सत्य ते सत्य मानावे ।।51।। ब्रह्मदेवाचे पाचवे मुख । माझी निंदा करी नाहक ।। म्हणुनी फक्त तेंच मस्तक । कापिंलेस तूं कोपाने ।।52।। क्रोधाग्नि पेटता मनी । विवेकबुद्धि भस्म होउनी ।। घडती पापें हातुनी । अविचारी अनर्थ होतसे ।। 53।। तू वागलास अविचाराने । तुझ्या त्या दुष्कृत्याने । ब्रह्महत्येच्या महापातकाने । ग्रासिले असे तुजलागी ।।54।। ब्रम्हहत्येचे पाप अघोर । दुष्परिणाम त्याचे थोर ।। कोणी कितीही असो बलवत्तर । पापमुक्त न होई ।।55।। जो कोणी महापातक करी । तो तो जातो नरकपुरी ।। अनंत युगे दु:ख भारी । भोगणे प्राप्त होतसे ।। 56।। जेव्हा महापातकी प्राणी । मुक्त होतो नरककुंडातुनी ।। त्याला वृक्षवेली शिळा योनी । सप्त लक्ष वर्षे लाभते ।।57।। त्यानंतर कीड, मुंगी जीव योनी । सात हजार वर्षे कष्ट भोगुनी । पशुपक्षादि अनेक जन्म घेऊनी । दु:ख भोगी अपार ।।58।। हे शिवाचे भाषण ऐकुनी । काळभैरव घाबरला मनीं ।। म्हणे मुक्त व्हावया पापातुनी । काही उपाय सांगावा ।। 59।। शिव म्हणे मग त्यासी । एक उपाय सांगतो तुजसी ।। पृथ्वीवरील ती वाराणसी । अविमुक्त तें क्षेत्र असे ।।60।। त्या क्षेत्राचे रक्षण । चण्डिका करिती रात्रंदिन ।। त्या सर्वांचे नामाभिधान । ऐक आता सांगतो ।।61।। दुर्गा उभी दक्षिणेला । अंतरेश्वरी नैऋत्येला ।। अंगारेश्वरी पश्चिमेला । सुसज्ज असे सर्वदा ।। 62।। भद्रकाली असे वायव्येला । भीमचंडी उभी उत्तरेला ।। महामत्ता ईशान्यदिशेला । क्षेत्ररक्षण करितसे ।।63।। उर्ध्वकेशी सहित शंकरी ।। पूर्व दिशेचे रक्षण करी ।। अध:केशी आग्नेय कोनावरी ।। लक्ष ठेवी अखंडित ।।64।। ऐसे ते काशीक्षेत्र जाण । भूलोकी असे पवित्र पावन ।। तेथील पंचगंगेत करिता स्नान । पापक्षालन होतसे ।।65।। देवदेवता, यक्ष किन्नर । नाग, सिद्ध आणि विद्याधर ।। पिशाच्चें आणि नारीनर । होती पापमुक्त तिथें ।।66।। त्या क्षेत्री तु जाशील जेव्हा । पापमुक्त तुही होशील तेव्हा ।। वंद्य होऊनी सर्व देवा । सुखें तेथे राहशील ।।67।। घ्यावयासि आतां प्रायश्चित्त । कापलेले मस्तक घे हातांत ।। काशीला जा भिक्षा मागत । पापमुक्त व्हाया ।।68।। ऐसे बोलुनी क्षणात । कैलासपती झाले गुप्त ।। काळभैरव तिन्ही लोकात । भ्रमण करु लागला ।।69।। तो पुढे पुढे चाले जरी । महापातक त्याचा पाठलाग करी ।। येता वाराणशीच्या वेशीवरी । पाप तेथेच थांबले ।। 70।। काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री । हातांतील शीर पडले खालती ।। त्या स्थळा " कपालमोचन " म्हणती । तीर्थ प्रसिद्ध झाले तें ।।71।। काळभैरव झाला तेथील । शहराचा मुख्य कोतवाल ।। दैवत थोर काशीतील । सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो ।।72।। आधीं दर्शन काळभैरवाचे । नंतर श्रीकाशीविश्वेश्वराचे ।। ऐशापरी वागती तयांचे । सकल पाप जातसे ।।73।। कार्तिक मास तो पवित्र । वद्य अष्टमी पवित्र फार ।। काळभैरवाचा अवतार । शुभदिनी त्या जाहला ।।74।। कोणतीही अष्टमी , चतुर्दशी । रविवार किंवा मंगळवार दिवशी ।। शरण जावे काळभैरवासी । करावी पूजाप्रार्थना ।।75।। तोतो होतो प्रसन्न ज्याला । दु:ख चिंता नसते त्याला ।। अशुभ अमंगल जाते लयाला । सकल सिद्धी लाभती ।।76।। होते इच्छित दीर्घायु संतती । मिळते स्थावरजंगम संपत्ती ।। काळभैरवाचे महात्म्य किती । आणि कैसे वर्णावे ।।77।। शत्रुभय आणि चोरभय । समूळ निश्चये नष्ट होय ।। म्हणुनी तयाचेच पाय । धरावे भक्तिभावाने ।।78।। वैभवशिखरीं भक्त चढे । दिनोदिनी लौकिक वाढे ।। त्यासी पाहता काळ दडे । काळभैरवाच्या धाकाने ।।79।। राजलक्ष्मी आणि राजमान्यता । मिळे समाजांत मानमान्यता ।। काळभैरवाच्या सत्य भक्ता । उणे न पडे काहींही ।।80।। स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी । समाधान पावले अगस्तीमुनी ।। काळभैरवस्मरण करीत मनी । स्वस्थानी गेले आनंदे ।।81।। यास्तव जोडुनी दोन्ही हस्त । म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र ।। जपावा काळभैरव मंत्र । निशिदिनी मनीं अखंड 82।। ऐसे करील जो सहामास । काळभैरव प्रसन्न होईल त्यास ।। देव भक्तांचा होतो दास । स्वंयसिद्ध सत्य हे ।।83।। कोणी रंक असो वा राव । हृदयी धरुनी दृढभाव ।। प्रार्थना करिता काळभैरव । धाउनी येई संकटी ।।84।। सदा ठेवुनी सद्वर्तन । करिती जे काळभैरव स्मरण ।। तयांसी साक्षात शंकर भगवान । प्रत्यक्ष दर्शन देतसे ।। 85।। भैरवाचे कराया पूजन चिंतन । काळवेळेचे नसे बंधन ।। स्त्रीपुरुषांनी त्यासी निशिदिन । भक्तिभावे भजावे ।।86।। घरींदारी, कचेरीत, । वाटेत किंवा प्रवासात । नामस्मरण करावे अखंडित । तेणे कल्याण होतसे ।।87।। काळभैरव होता प्रसन्न । पळते पाप आणि दैन्य ।। मिळते विपुलधनधान्य । ऐसे सामर्थ्य तयांचे ।।88।। अघोरीविद्या, मंत्रतंत्रशक्ती । भैरवभक्तांसी कधी न बाधती ।। स्तोत्र हे जेथे पठण करिती । तेथें भुतेखेते न राहती ।।89।। काळभैरवासी नित्य स्मरता । बंदिवासातुन होते मुक्तता ।। येते हाती राजसत्ता । ऐसा समर्थ देव तो ।।90।। ॐ असितांगभैरवाय नम:। ॐ रुरुभैरवाय नम:।। ॐ चंडभैरवाय नम:। ॐ क्रोधभैरवाय नम:।।91।। ॐ उन्मत्तभैरवाय नम:।ॐ कपालीभैरवाय नम:।। ॐ भीषणभैरवाय नम:। ॐ संहारभैरवाय नमो नम:।।92।। ॐ महाकाळा, महाकोशा। महाकाया, विश्वप्रकाशा ।। मत्ता, महेशा, सर्वेशा । काळभैरवाय नमो नम: ।।93।। संहाररूपा, खट्वांगधारका । कंकाळा, पापपुण्यशोधका ।। सुराराध्या, तापहारका । काळभैरवाय नमो नम: ।।94।। लोलाक्षा, लोकवर्धना । लोस्याप्रिया, श्वानवाहना ।। भुतनाथा, भुतभावना । काळभैरवाय नमो नम: ।।95।। हे श्री देवाधिदेवा । कराल वदना, काळभैरवा ।। कृपाशिर्वाद नित्य असावा । पदीं लीन जाहला ।।96।। कुटुंबातील सर्व व्यक्ती । त्यांसी दीर्घायुष्य, आरोग्य, शक्ति ।। बुध्दि, किर्ती, संपत्ती । देऊनी वंश वाढवी ।।97।। जाऊं आम्ही जेथें जेथें । कार्यसिध्दी होवो तेथें ।। मनी कुविचार भलभलते । येऊं नको देऊं तूं ।।98।। श्री सद्गुरुस्वामीं कृपेसाठी । तुझ्या पायी घाली मिठी ।। अपराध पापें कोटीकोटी । क्षमा त्यांची करावी ।।99।। घरीं नांदो सतत शांतता । पडूं नये कशाची कमतरता ।। योगक्षेमाची नसावी चिंता । हेंच देंवा मागणे ।। 100।। शके अठराशे सत्याण्णवासी । माघमासी कृष्णपक्षीं ।। चतुर्दशी महाशिवरात्रीसी । ग्रंथ पूर्ण झाला हा ।।101।। श्री काळभैरवचरणार्पणमस्तु ।। शुभं भ

No comments:

Post a Comment