Friday, 23 November 2018

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे


 महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे

पंढरपूर
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले हे शहर तालुक्‍याचे ठिकाण आहे. भीमा नदी येथे अर्ध चंद्रासारखी वळसा घेऊन जाते म्हणून तिला "चंद्रभागा' नावाने ओळखले जाते. पंढरीचा पांडुरंग हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. 
चंद्रभागा नदीच्या काठावरील पांडुरंगाचे मंदिर आठ मजली उंच असून, त्याला आठ दरवाजे आहेत. त्याच्या पूर्वेकडील महाद्वारास नामदेव द्वार म्हटले जाते. येथील आषाढी व कार्तिकीच्या दोन यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तमंडळी एक महिन्याच्या या वारीत सहभागी होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी 10 लाखांपेक्षा अधिक भाविक उत्सवात सहभागी होतात.

आळंदी-देहू
आळंदी हे गाव पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. संत ज्ञानेश्‍वरांचे हे आजोळ; येथेच संत ज्ञानेश्‍वरांनी समाधी घेतली. येथे 1570 मध्ये ज्ञानेश्‍वरांचे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. आषाढीला आळंदीहून ज्ञानेश्‍वरांची पालखी पंढरपूरला जाते. 
तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ असलेले देहू गाव पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. येथे संत तुकाराम महाराजांचे मंदिर असून, मंदिरात त्यांचे हस्ताक्षरही पाहायला मिळते; तसेच येथे तुकारामांचे जुने घरही अस्तित्वात आहे.

पैठण 
पैठण हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. संत भानुदास, मुक्तेश्‍वर, एकनाथ असे श्रेष्ठ संत पैठणमध्ये होऊन गेले. संत एकनाथ व पैठणी साड्यांच्या उत्पादनासाठी पैठण ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी जायकवाडी धरण हे पैठणचे प्रमुख आकर्षण होते. पैठण हे औरंगाबादपासून 56 किलोमीटर अंतरावर आहे. ते तालुक्‍याचे ठिकाण आहे. 

जेजुरी
जेजुरी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैवत, खंडोबाचे मंदिर आहे. याच परिसरात म्हाळसाकांत, किंवा मल्हारी मार्तंड या धनगर दैवतांची मंदिरे आहेत. जेजुरी पुण्याच्या अग्नेयेस फलटणच्या बाजूला आहे. येथील खंडोबाचे मंदिर एका टेकडीवर आहे. तेथे जाण्यासाठी 200 पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिरापासून जेजुरी शहर, सासवड व दिवेघाटाचे दृश्‍य आपण पाहू शकतो; तसेच "दीपमाला'साठीही जेजुरी प्रसिद्ध आहे. मंदिराचे मंडप व गाभारा हे भाविकांचे आकर्षण आहे. मंदिरातील खंडोबाची मूर्तीसुद्धा सुंदर, आकर्षक आहे. 

अष्टविनायक
महाराष्ट्रातील आठ ठिकाणच्या गणपतीच्या मंदिरांस मिळून "अष्टविनायक' असे म्हटले जाते. यांपैकी मोरगावचा मोरेश्‍वर (पुणे) थेऊरचा चिंतामणी (पुणे), ओझरचा विघ्नहर (पुणे), लेण्याद्रीचा गिरिजात्मज (पुणे), रांजणगावचा महागणपती (पुणे), सिद्धटेकचा सिद्धीविनायक (अहमदनगर), पालीचा बल्लाळेश्‍वर (रायगड) आणि महडचा वरदविनायक (रायगड) अशी एकूण आठ ठिकाणची गणपतीची मंदिरे मिळून अष्टविनायकांची आठ धार्मिकस्थळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 

शिर्डी
शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध भागांतल्या बहुसंख्य लोकांचे अराध्य दैवत ठरलेले साईबांचे मंदिर येथे आहे. ते नाशिकपासून 122 किलोमीटर अंतरावर वसले आहे.
साईबाबांचे शिर्डी येथील देवस्थान प्रसिद्ध असून, येथे गुरुवारी सर्वाधिक गर्दी असते.

नांदेड
नांदेड जिल्ह्यात शीख धर्मियांचा "गुरुद्वारा' हे विशेष धार्मिक स्थळ आहे. या गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पंजाब तसेच संपूर्ण भारतातून शीख बांधव येत असतात. या गुरुद्वाराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा देण्यात आल्यामुळे ते शिखर पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे.
नांदेड हे महाराष्ट्रातील "मराठवाडा' विभागात असलेले महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ असून, गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कोल्हापूर मधील अंबाबाईचे मंदिर. हे मंदिर संपूर्णतः दगडात कोरलेले असून, यातील कोरीव नक्षीकाम भाविकांनी बघण्यासारखे आहे. कोल्हापूर येथे मंदिराची जागा निश्‍चित ठरवून 40 किलो वजनाची देवीची मूर्ती बसवून पवित्र स्थळ निरमाण केले. ही देवीची मूर्ती नैसर्गिकरीत्या ज होती, तशाच अवस्थेत ठेवण्यात आली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे भवानी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अष्टभुजाधारी आणि महिषासुराचा वध करणाऱ्या स्थितीत देवीची मूर्ती आहे. तुळजापूर हे सोलापूर शहरापासून 40 ते 50 कि.मी. अंतरावर व उस्मानाबादपासून 19 कि.मी. अंतरावर आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे रेणुका देवीचे मंदिर आहे. हे मंदिर उंच टेकडीवर आहे. देवळाच्या गाभाऱ्यात देवीचा मुखवटा असून, त्याला "तांदळा' म्हटले जाते. माहूर हे नांदेड जिल्ह्यापासून 150 कि.मी. अंतरावर असून, नांदेड ते माहूर व माहूरगावातून मंदिरापर्यंत राज्यपरिवहन महामंडळाच्या बसची नियमित सोय आहे. 

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्‍यात वणी या गावी सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आहे. सप्तश्रृंगी गडावर हे देवस्थान असून, सप्तश्रृंगी देवीस अष्टभुजा आहेत व तिचे स्वरुप उग्र आहे. डोंगराच्या कपारीवर हे मंदिर असून, कपारीवरच मोठी मूर्ती कोरलेली आहे. वणी नाशिक पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे.

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग
त्र्यंबकेश्‍वर
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगास ब्रह्मा, विष्णू, महेश असे तीन चेहरे आहेत. 
येथे सिंहस्थ कुंभमेळा, गोदावरी, निवृत्तीनाथाची यात्रा, त्र्यंबकेश्‍वराची रथयात्रा, महाशिवरात्री इ. यात्रा भरतात. त्र्यंबकेश्‍वर नाशिक शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. 

औंढानागनाथ
औंढानागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग समजले जाते. हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे. हे नागनाथाचे मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून, 60,000 चौ. फूट विस्तारलेले आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही; तर नंदिकेश्‍वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला बांधलेले आहे. औंढानागनाथाच्या मंदिरातील शिवलिंगा जवळच नागफड्याचे छत्र धरले आहे. मंदिरास मोठे मैदान, आठ खांबांचे मोठे दालन आहे. 

घृष्णेश्‍वर
घृष्णेश्‍वराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात असून, अंजिठा वेरुळ पासून केवळ अर्धा कि.मी. अंतरावर आहे. ते दगडावरील नक्षीने सुशोभित असून, अनेक भाविकांचे आकर्षण ठरले आहे. हे घृष्णेश्‍वराचे मंदिर राणी अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण दगडाचे बांधून, त्यावर नक्षीकाम करून घेतले. 

भिमाशंकर
भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील ठिकाण असून, शहरापासून 122 कि.मी. अंतरावर आहे. 18 व्या शतकात नाना फडणीसांनी ते बांधले असल्याचे सांगितले जाते; तसेच येथे अभयारण्य आहे. त्यात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. येथील मंदिर हे नागरापद्धतीचे आहे.

परळी वैजनाथ
बीड जिल्ह्यामध्ये वसलेले परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकीच एक ज्योतिर्लिंग आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर डोंगरावर वसलेले असून तेथे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत; तसेच महाद्वारही आहे. 

No comments:

Post a Comment