Thursday, 20 October 2016
मोकलाई देवी कथा
मोकळाई देवीची कथा :
औंधासुराला यमाईदेवीने घनघोर युद्धानंतर यमसदनी धाडले. या लढाईत यमाईदेवीला देखील भरपूर जखमा झाल्या. या जखमांची दाहकता कमी करण्यासाठी देवीने औंध येथील तळ्यात अंघोळ केली. स्नान करताना देवीने आपले केस मोकळे सोडले होते म्हणून देवीला ' मुक्तकेसरी ' किंवा ' मोकळाई ' म्हणून ओळखले जाते. तळ्याच्या दक्षिण या दिशेला जवळच मोकळाईचे मंदिर आहे. या तळ्यातील पाणी भाविकांसाठी तीर्थ ठरले आहे. भाविक या तळ्यात अंघोळ करतात. त्यानंतर मोकळाईचे दर्शन घेतात. त्यामुळे शरीरावरील सर्व व्याधी नाहीशा होतात आशी त्यांची श्रद्धा आहे. मोकळाईचे मंदिर फार पुरातन व संपूर्ण दगडी आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य..... मोकळाई देवी
तुकाईदेवीची कथा :
गावातील तळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या तुकाई मंदिरा संबंधी एक दंतकथा सांगितली जाते. दंडकारण्यात वनवास भोगत असताना सीतेचे रावणाने हरण केले. सीतेच्या विरहाने दु:खी कष्टी झालेले राम, सीतेचा सर्वत्र शोध घेत औंध परिसरात पोहोचले. व्याकूळ श्रीरामांना पाहून यमाईने श्रीरामांनची परीक्षा घेण्याचे ठरवले. यमाई देवीने सीतेचे रूप धारण केले व श्रीरामांन समोर गेली. श्रीरामांना स्वत:हा सीता असल्याचे सांगितले. पण अंतरज्ञानी श्रीरामांनी यमाईदेवीला म्हणजेच आपल्या गेल्या जन्मातील मातेला ओळखले. त्यांनी यमाईदेवीकडे पाहून सहजच उदगार काढले, " तू का आई अशी आलीस ?" तेव्हा यमाईने प्रसन्न होवून प्रत्यक्ष दर्शन दिले व विजयीभव असा आशिर्वाद दिला.
तेव्हापासून यमाईदेवी ' तुकाई ' या नावानेहि ओळखली जावू लागली. जेथे यमाईने श्रीरामांना दर्शन दिले तेथे हे मंदिर उभे आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य..... तुकाईदेवी
ज्योतीबाची कथा :
ज्योतीबाच मंदिर औंधच्या उत्तर दिशेला औंध पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर एका टेकडीवर उभारले आहे ज्योतीबाच्या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. यमाईदेवीचा रुसवा घालवण्यास ज्योतीबा औंधास येण्यास निघाले. संत, महंत व भक्तगण मूळपीठ औंध येथे जमले. वाद्ये वाजवित, गुलाल उधळीत सार्वजन औंधपिठावर पोहोचले ज्योतीबा समिप येताच यमाईने दार लाऊन घेतले. पण ज्योतीबांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने व प्रभावी बोलण्याने देवीची समजूत घातली. उदार मनाने ज्योतीबाने माफी मागीतली. देवीनेही त्यांना माफ करत प्रसन्न मनाने त्यांचे स्वागत केले. या प्रसंगावेळी ज्योतीबा, भक्तगण, साधुसंत यांची भगवती भक्तांनी सोय केली. भगवती भक्तांनी सर्वाना आंबिल देवून सर्वांचा श्रमपरिहार केला. या सेवेवर ज्योतीबा प्रसन्न झाले व त्यांना वरदान दिले " आपण आंबिले नावाने प्रसिद्ध व्हाल. " या आशिर्वादाबरोबर आंबिले नाव अजरामर झाले. दरवर्षी ज्योतीबा औंधपीठावर येवून चैत्रात देवीचा उत्सव साजरा करत . देवी एकदा ज्योतीबांना म्हणाली, " आपण दरवर्षी औंधला येण्याचे श्रम घेता एक वर्षी मी आपल्याकडे येते. आपले राज्य कसे आहे हे तरी पाहूया. " ज्योतीबांना दिलेल्या शब्दाप्रमाणे यमाई रत्नाचलच्या चंपक बनात प्रकट झाली. ज्योतीबांच्या रत्नाचल डोंगरावर यमाईचे मंदिर आहे. या भेटीप्रीत्यर्थ तेथे चैत्रात मोठी यात्रा साजरी केली जाते.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य..... ज्योतीबा
देवीची महापूजा (भोगी) :
चैत्र महिन्यात "वासंतिक उत्सव", अश्विन महिन्यात "शारदीय नवरात्र उत्सव" तर पौष महिन्यात "पौषी उत्सव" असे देवीचे वर्षातून तीन प्रमुख उत्सव असतात. पैकी पौषी उत्सव मोठ्या प्रमाणावर यात्रा भरवून साजरा केला जातो याच काळात दररोज देवीची भोगी घातली जाते. यमाई देवीच्या महापुजेला भोगी असे म्हणतात. विशेषत: पौष महिन्यात खूप महत्वपूर्ण आहे. पौष शुध्द द्वितीयेला राजघराण्यातील व्यक्तींच्या हस्ते देवीची भोगी करुण्यात येवून पौषी उत्सवास प्रारंभ होतो.
भोगीचे स्वरूप : पर्वणीतील महापूजेचा (भोगी) प्रारंभ पहाटे पाच वाजता काकड आरतीने होतो. त्यानंतर मुख प्रक्षालन व गणपती पूजन झाल्यानंतर चांदीच्या चार वाट्यांत कलशोदक औंधमध्ये यमाई देवीच्या पौषी उत्सवाची तयारी घेऊन त्यात विविध पूजा साहित्य घालून ते उदक देवीच्या चरणांवर, हातांवर व मुखावर घालतात. त्यानंतर अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान, पंचोपचार पूजा, आदिशक्तीची आरती, शिकरण स्नान, शिकेकाई व उष्णोदक स्नान, अभिषेक, औक्षण, त्यानंतर नैवेद्य, वाद्यांच्या गजरात महाआरती, मंत्रपुष्प व देवीचे स्तोत्र म्हणण्यात येते. शेवटी शंखातील पवित्र तीर्थ सर्वत्र शिंपडून तीर्थ व प्रसाद वाटण्यात येते. या सर्व विधीचे मंत्र स्वरबद्ध करण्यात आले असून, ते सुरेल आवाजात (स्वरात) पारंपरिक पद्धतीने म्हणण्यात येतात. महापूजेचा हा विधी सुमारे तीन तासांचा असून, तो पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य..... देवीची मुळ मूर्ती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment