Sunday, 30 October 2016

लक्ष्मी पूजन दिवाळी अमावस्या

!! लक्ष्मी पूजन (आश्विन अमावस्या ) !! दि.३०.१०.२०१६ रविवार
या दिवशी सायंकाळी (प्रदोषकाळी) लक्ष्मी चे स्वागत करण्याची प्रथा आहे. अश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मी पूजन, श्री लक्ष्मी चे स्वागत, अलक्ष्मी नि:स्सारण होते. या दिवशी बलीच्या बंदिवासातुन लक्ष्मी ची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे रहावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्ति भावाने पूजा करतात. व्यापारी लोकही यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.
!! पूजेची वेळ सायंकाळी सहा नंतर (प्रदोषकाळ) !!
पूजेचे साहित्य:
विड्याच्या पानावर खारिक, बदाम, सुपारी, नाणे, निरांजन, अगरबत्ती, पाण्याचा तांब्या, पंचामृत, फुले( फुले शक्यतो पांढरी कान्हेर, शेवंती, जास्वंद, रुई, झेंडू) सीताफल,केळी ही फले व तुळशीपत्र जवळ ठेवावे. नैवेद्यास पूरणपोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, हळदी, कुंकू, अक्षता, फाराळाचे पदार्थ इत्यादि.
पूजेची मांडणी व् पूर्व तयारी :
* लक्ष्मी-नारायणाचा फोटो
* विड्याच्या पानावर श्रीलक्ष्मी ची सुपारी( कोजागिरी पोर्णीमेत वापरलेली).
*विड्याच्या पानावर श्रीकुबेराची सुपारी ( कोजागिरी पोर्णीमेत वापरलेली).
*कुलदेवतांचे टाक, श्रीलक्ष्मी (नाणे किंवा प्रतिमा), सोने, चांदी, नाणे, नोटा.
*नारळ + खोबरे वाटी, त्यात खडी साखर, साळीच्या लाह्या, बत्ताशे.
*मांडणी झाल्यावर तेथे रांगोळी काढावी. + घरासमोर तुळशी जवळ रांगोळी काढावी.
*तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची व गाईची पावले काढावीत.
*प्रवेशद्वारा बाहेर दोन्ही बाजुस स्वस्तिक काढावे
*घरात तेलाचा दिवा लावून घ्यावा.स्वस्तिक काढून त्यावर नविन केरसुनी ठेवावी.
वरील मांडणी झाल्यावर तुलसी पूजन करावे.
!! तुलसी पूजन !!
तुळशीजवळ जाउन दिवा, अगरबत्ती लावून तिची हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करावी व् तुलसी स्तोत्र एक वेळा म्हणावे किंवा तुलसी मंत्र ११ वेळा म्हणावा.
तुलसी मंत्र :
|| ॐ -हीं क्लीं ऐं वृंदावन्ये स्वाहा ||
तुलसी स्तोत्र
तुलसी सर्व व्रतानां महापातक नाशिनी|
अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय समा ||
सत्ये सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा|
द्वापारे चावतीर्णासी वृंदात्वं तुलसी क्ली: ||
कुंकू वाहून (पंचोपचार) पूजा करावी.
प्रथम श्री लक्ष्मी पूजन ध्यान मंत्र म्हणावा.
श्रीलक्ष्मी ध्यान मंत्र
ध्यायामी ता महालक्ष्मी कर्पूक्षोदपाण्डुराम|
शुभ्र वस्त्र परिधानां मुक्तभरण भूषिताम||
पंकजासन संस्थान स्मेराननसरोरुहाग|
शारदेन्दू कला कांती स्निग्धनेत्रा चतुर्भुजाम ||
पद्मयुग्मा अक्षयवर व्यग्रचारू कराम्बूजाम|
अभितो गजयुग्मेन सिच्यामानां करानुना ||
सर्व पुजेवर प्रथम फुलाने ४ वेळा पाणी शिंपडावे. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व् सर्व पुजेवर फुलाने थोड़े थोड़े पाणी शिंपडून १६ वेळा श्री सूक्त म्हणून नंतर लक्ष्मी-नारायणाच्या फोटो समोर एक वेळा पुरुष सूक्त वाचावे, सर्वांना अष्टगंध, हळद-कुंकू, अक्षता, फुले वहावी, धुप-दीप दाखवावा व् पुढील प्रार्थना म्हणावी.
!! श्रीलक्ष्मी प्रार्थना !!
कमलाचपला लक्ष्मी: चलाभुती: हरिप्रिया |
पद्मा पद्मात्मया समदूचै: श्रीपदमधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरिप्रिये|
या गति: त्वतप्रपन्नाना सागे भूयात त्वदर्चनात||
यादेवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता|
नमस्तसयै नमस्तसयै नमस्तसयै नमोनम:||
धनदायै नमस्तुभ्य निधीपदधिपायच|
भुवन्तुत्वत्प्रसादान्मे धनधन्यादी संपदा ||
फोटो व् सुपारीच्या स्वरूपातील देवतांची - खालील प्रमाणे पूजा सामूहिकपणे घरातील सदस्यांनी करावी.
देव्हा-यातील गणपतीवर गणपती अथर्वशीर्ष अभिषेकयुक्त करून पुढे लक्ष्मीची, विष्णुंची, कुबेराची, कुलदेविची, कुलस्वामी श्रीखंडोबाची पूजा करावी. यानंतर बरोबर प्रदोष काळात लक्ष्मीच्या फोटोवर(चार हत्तीयुक्त), कुलदेविचा टाक, लक्ष्मी-नारायणाचा फोटो यावर १६ वेला श्रीसूक्त म्हणून अभिषेक, फुलाने पाणी शिंपडून करावा.( पाद्य, अर्घ्य, आचमन, जलस्नान, पंचामृत, पुन्हा जलस्नान फुलाने पाणी शिंपडून हळद-कुंकू, फुल वहावे. धुप-दीप नैवेद्य दाखवावा) नंतर गणपती, देवीची, नारायणाची आरती करावी. शेवटी क्षमा प्रार्थना म्हणून पूजेची सांगता करावी.
अलक्ष्मी नि:स्सारणम
या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, व् सर्व दिवे रात्रि १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावेत. घराच्या मागील भिंती पासून केरसूणीने एक सरळ रेषेत झाड़ू न उचलता प्रवेशद्वारा पर्यंत झाड़त आणावे. उंबरठ्यावर केरसुणी ठेवावी. केरसुणी चा एक फड तोडून बाहेर फेकावा म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो.
लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ...!!
!! शुभ दीपावली !!

No comments:

Post a Comment