Saturday, 31 December 2016

श्रीकृष्ण अर्जुन मैत्री

का गढून गेला होता की, आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही. आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्याकारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकूळ झाला होता. रथ हाकणे, फिरावयास जाणे इत्यादि वेळी भगवंतांच्या बरोबर जी मित्रता, अभिन्नहृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते, त्यांची त्याला वारंवार आठवण येत होती. मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला; हाताने डोळे पुसले आणि सद्‌गदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरांस अर्जुन म्हणाला - (१-४) अर्जुन म्हणाला - महाराज, माझे मामेभाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे. देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे. प्राण निघून गेल्यावर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते, तसेच त्यांच्या एका क्षणाच्या वियोगानेही हे जग असुंदर वाटू लागते. त्यांच्याच आश्रयामुळे द्रौपदीस्वयंवराच्या वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या कामोन्मत्त राजांचे तेज मी हिरावून घेतले होते. धनुष्याला बाण लावून मत्स्यवेध केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले. त्यांच्या केवळ सान्निध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खांडव-वन दिले आणि मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कलाकुसरयुक्त अशी मायामय सभा प्राप्त केली. तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशांतून राजे लोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आपल्याला अर्पण केल्या. दहा हजार हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेन या आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्यांच्याच सामर्थ्याने यज्ञासाठी राजांच्या मस्तकावर पाय ठेवणार्‍या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता. ज्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदीवान केले होते, त्या अनेक राजांना भीमाने मुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या. आपल्या पत्‍नीची राजसूय यज्ञात केलेल्या महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदर वेणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली, तेव्हा श्रीकृष्णांच्या चरणांवर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघळले. तिचे ते दुःख पाहून त्याच श्रीकृष्णांनी त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस सोडावयास भाग पाडले. वनवासात असताना आपला वैरी दुर्योधनाने षड्यंत्र रचून, दहा हजार शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते. त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले. कारण श्रीकृष्णांनी तसे केल्यानंतर नदीत स्नान करणार्‍या मुनींना असे वाटले की, आपणच काय, सगळे त्रैलोक्य जेवून तृत झाले आहे. त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान शंकरांना आश्चर्यचकित केले, तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्र मला दिले. त्याचबरोबर दुसर्‍या लोकपालांनीही प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे मला दिली. एवढेच काय, त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्याच्याबरोबर त्याच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला. मी स्वर्गात काही दिवस राहिलो. तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवातकवच इत्यादी दैत्यांना मारण्यासाथी माझ्या गांडीव धनुष्य धारण केलेल्या बाहुबलाचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व ज्यांच्या कृपेचे फळ होते, त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले. (५-१३) महाराज, भीष्म-द्रोण इत्यादि पराजित न होणार्‍या अशा महामत्स्यांनी पूर्ण अपार समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर होती; परंतु ज्या बंधूच्या आश्रयाने मी ती सेना पार केली; त्यांच्याच साह्याने मी शत्रूंकडून राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो. त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्‍नमय मुकुट, अंगावरील अलंकारांसह काढून आणले होते. हे बंधो ! कौरवांची सेना भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य तसेच इतर मोठमोठे राजे आणि क्षत्रियवीरांच्या रथांनी शोभत होती. त्यांच्याकडे जाताना, माझ्या पुढे राहून ते आपल्या दृष्टीनेच त्या महारथी राजांचे आयुष्य, मन, उत्साह आणि बल हिरावून घेत होते. द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, भूरिश्रवा, सुशर्मा, शल्य, जयद्रथ आणि बाल्हिक इत्यादि वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती. परंतु, ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू इत्यादी दैत्यांची शस्त्रास्त्रे भगवद्‌भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत, त्याप्रमाणेच यांची अस्त्रे मला स्पर्श करू शकली नाहीत. श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता. श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्यांच्या चरणकमलांची सेवा करतात, स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणार्‍या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनविले. ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहात होतो, त्यावेळी शत्रुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत. कारण श्रीकृष्णांच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होती. अहो महाराज, माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य, विनोदप्रचुर आणि हृदयस्पर्शी भाषण, तसेच त्यांचे मला ’पार्था, अर्जुना, सख्या, कुरुनंदना’ इत्यादि संबोधनांनी बोलावणे, हे सर्व आठवून माझे हृदय व्याकूळ होत आहे. झोपणे, बसणे, फिरायला जाणे, आपापसात गोष्टी करणे, भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो. मी चेष्टेत कधी त्यांना म्हणत असे - "मित्रा ! तू तर मोठा सत्यवचनी आहेस !" त्यावेळी तो महापुरुष, आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्र मित्राचा आणि पिता पुत्राचा अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाचे अपराध सहन करीत असे. महाराज, जो माझा सखा, प्रिय, मित्र, नव्हे तर, माझे हृदयच होता, त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे. भगवंतांच्या पत्‍न्यांना द्वारकेहून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो, परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलासारखे पराभूत केले. माझे गांडीव धनुष्य तेच आहे, बाण तेच आहेत, रथ, घोडे तेच आहेत आणि तो रथी अर्जुनही मीच आहे, ज्याच्यासमोर मोठमोठे राजे नतमस्तक होत होते. जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती, कपटाने केलेली सेवा आणि रेताड जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते, तसे श्रीकृष्णांखेरीज हे सर्व शून्यवत झाले आहे. (१४-२१) महाराज, आपण द्वारकानिवासी आपल्या सुहृदांविषयी विचारले, ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन, वारुणी नावाची मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले आणि अपरिचितासारखे आपापसात लढले. तसेच लव्हाळ्याने मारपीट करून सर्वच्या सर्व नष्ट झाले. त्यांच्यापैकी केवळ चार-पाच जणच जिवंत आहेत. वास्तविक ही त्या सर्वशक्तिमान भगवंतांचीच लीला आहे. ज्यामूळे या संसारातील प्राणी एक-दुसर्‍याचे पालन-पोषणही करतात आणि एक-दुसर्‍यांचा नाशही करतात. महाराज, ज्याप्रमाणे जलचर प्राण्यांतील मोठे प्राणी लहानांना, बलवान दुर्बलांना तसेच मोठे व बलवान एक दुसर्‍याच्या जीवावर उठतात, त्याचप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतांनी दुसर्‍या राजांचा संहार करविला. त्यानंतर यादवांचा यादवांकडूनच संहार करवून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरविला. भगवान श्रीकृष्णांनी मला जो उपदेश केला होता, तो देश, काल आणि हेतूला अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता. त्या उपदेशाचे स्मरण होताच चित्त हरखून जाते. (२२-२७) सूत म्हणाले - याप्रमाणे अत्यंत प्रेमभरल्या अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल झाली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे रात्रंदिवस चिंतन केल्याने भक्ति अधिकच वाढली. त्यामुळे त्याच्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले. अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीताज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते, त्याचे पुन्हा स्मरण झाले. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली. सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला. (२८-३१) भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिरबुद्धी युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला. यदुवंशीयांचा नाश आणि भगवंतांच्या स्वधामगमनाचे वृत्त अर्जुनाकडून ऐकून कुंतीनेही अनन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णांमध्ये स्थिर केले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. लोकांच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी ज्या यादव शरीराने पृथ्वीवरील भार हलका केला होता, त्या शरीराचा अशा रीतीने त्याग केला की, जसा काट्याने काटा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे. भगवंतांच्या दृष्तीने दोन्ही सारखेच होते. एकाद्या नटाप्रमाणे ते जसे मत्स्य इद्यादी रूपे धारण करतात आणि नंतर ती अदृश्य करतात, त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला होता, ते शरीर अदृश्य केले. ज्यांच्या मधुर लीला श्रवणीय आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले, त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात गुंतविणारे कलियुग येऊन टपकले. कलियुगाचे आगमन युधिष्ठिरांपासून लपून राहिले नाही. त्यांनी पाहिले की, देश, नगर, घरे तसेच प्राण्यांमध्ये लोभ, असत्य, कपट, हिंसा इत्यादि प्रकारांनी अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झाला आहे. तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. जो गुणांमध्ये त्यांच्याचसारखा होता असा आपला विनयशील नातू परीक्षित याला त्यांनी हस्तिनापुरात समुद्रवलयांकित पृथ्वीच्या सम्राटपदावर बसविले. त्यांनी मथुरेत अनिरुद्धपुत्र वज्र याचा शूरसेनापती म्हणून अभिषेक केला. त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्राजापत्य यज्ञ करून आहवनीय इत्यादी अग्नींना आपल्यामध्ये लीन करून घेतले, म्हणजेच संन्यास घेतला. त्यांनी आपली सर्व वस्त्रे, आभूषणे इत्यादींचा तेथेच त्याग केला. तसेच ममता आणि अहंकाररहित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले. नंतर त्यांनी वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपानात, आणि अपानाला त्याच्या क्रियेसह मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमय शरीरात विलीन केले. नंतर त्यांनी शरीराला त्रिगुणात, त्रिगुणाला मूळ प्रकृतीत, मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशी ब्रह्मात विलीन केले. त्यानंतर त्यांनी शरीरावर वल्कले धारण केली. अन्नपाण्याचा त्याग केला, मौन धारण केले, केस मोकळे सोडले आणि जड, उन्मत्त, पिशाचासारख्या रूपात ते राहू लागले. एवढे झाल्यावर कोणाचीही वाट न पाहता, बहिर्‍याप्रमाणे कोणाचेही काहीही न ऐकता, ते बाहेर पडले. ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यावे लागत नाही, त्या परब्रह्माचे हृदयात ध्यान करीत ते उत्तर दिशेकडे निघाले. यापूर्वी मोठमोठे महात्म्ये तिकडेच गेले होते. (३२-४४) भीमसेन, अर्जुन इत्यादी युधिष्ठिरांच्या धाकट्या भावांनीही असे पाहिले की, पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा सहाय्यक असलेल्या कलियुगाने प्रभावित केले आहे. म्हणून तेही दृढ निश्चय करून आपल्या थोरल्या बंधूंच्या पाठोपाठ निघून गेले. त्यांनी जीवनातील सर्व लाभ चांगल्याप्रकारे प्राप्त करून घेतले होते. म्हणुन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेणे हाच आपला परमपुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयांत धारण केले. भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या ध्यानाने पांडवांच्या हृदयांत भक्तिभाव उचंबळून आला, त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि केवळ निष्पाप पुरुषच जिथे स्थिर होतात त्या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्य भावाने स्थिर झाले. विषयासक्त पापी मनुष्यांना कधीही प्राप्त न होणारी गती, त्यांना आपल्या विशुद्ध अंतःकरणामुळेच प्राप्त झाली. संयमी आणि श्रीकृष्णांच्या प्रेमावेशात मुग्ध, भगवन्मय झालेल्या विदुरानेही आपल्या शरीराचा प्रभासक्षेत्रात त्याग केला. त्यावेळी त्यांना न्यावयास आलेल्या पितरांसह तो आपल्या यमलोकाला गेला. द्रौपदीने पाहिले की, आता पांडवांना काही अपेक्षा राहिली नाही. तेव्हा ती अनन्य प्रेमाने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करीत त्यांच्याशी एकरूप झाली. (४५-५०) भगवंतांचे प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रयाणाची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल, तो निश्चितच भगवंतांची भक्ति आणि मोक्ष प्राप्त करून घेईल. (५१) अध्याय पंधरावा समाप्त

No comments:

Post a Comment