Friday, 5 August 2016

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 वा

श्री गणेशाय नमः ॥ मागील अध्यायी कथा सुंदर । प्रख्यात जे मुंबई शहर । तेथे येऊनी स्वामीकुमर । मठ स्थापिती समर्थांचा ॥१॥ षडविकार जिंकिले । संसाराते त्यागिले । रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥ स...्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संसृति । कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥ स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन । त्याहुनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥ संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन । हे पाहूनी कित्येकजण । हांसताती तयाते ॥५॥ परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती । अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥ स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी । तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥ मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले । त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥ पुत्रवात्सल्येकरोनी पाही । शोक करीत काकूबाई । मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥ गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी । अंग टाकीयले धरणी । बहुत आक्रोश मांडीला ॥१०॥ निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण । तियेलागी सावरुन । धरिले सत्वर प्रेमाने ॥११॥ तुझ्या उदरी जन्मास आलो । सदगुरुपायी विनटलो । जन्ममरणाते चुकलो । मुक्त झालो सहजची ॥१२॥ धन्य धन्य तू गे जननी । मजलागी प्रसवोनी । मान्य झालीस त्रिभुवनी । काय धन्यता वर्णावी ॥१३॥ अशा प्रकारे स्वामीसुत । मातेचे समाधान करीत । मधुर शब्दे समजावीत । परमार्थ गोष्टी सांगोनी ॥१४॥ परी त्याच्या या गोष्टी । तियेसी गोड न लागती । म्हणे याची भ्रष्ट मती । खचित असे जाहली ॥१५॥ यासी पिशाच्चबाधा झाली । किंवा कोणी करणी केली । याची सोय पाहिजे पाहिली । पंचाक्षरी आणोनी ॥१६॥ त्या समयी प्रख्यात थोर । यशवंतराव भोसेकर । जयांसी देव मामलेदार । सर्व लोक बोलती ॥१७॥ तयांची घेवोन भेटी । विचारावी काही युक्ती । ते जरी कृपा करिती । तरी होय आरोग्य ॥१८॥ ऐसा विचार करोनी पोटी । दर्शना आल्या उठाउठी । सांगितल्या सुताच्या गोष्टी । मुळापासोन सर्वहि ॥१९॥ होवोनिया दीनवदन । करिती विनंती कर जोडोन । म्हणती सर्वज्ञ आपण । उपाय यासी सांगावा ॥२०॥ ऐकोनिया देव मामलेदार । हांसोनी देती उत्तर । त्यासी पिशाच्च लागले थोर । माझेनी दूर नोहेची ॥२१॥ ऐसे उत्तर ऐकोनि । दुःखित झाले अंतःकरणी । मग ते स्वामीसुताची जननी । अक्कलकोटी येतसे ॥२२॥ म्हणे ज्याने वेड लाविले । त्याचीच धरावी पाउले । येणे उपाये आपुले । कार्य सत्य होईल ॥२३॥ असो इकडे स्वामीसुत । मुंबईमाजी वास्तव्य करीत । हिंदू पारसी स्वामीभक्त । त्यांच्या उपदेशे जहाले ॥२४॥ मठ होता कामाठीपुर्‍यात । तेथे जागा नव्हती प्रशस्त । मग दिली कांदेवाडीत । जागा एक भक्तिणीने ॥२५॥ निस्सीम जे स्वामीभक्त । आनंदे भजनी नाचत । कुटील जन त्याते हासत । ढोंग अवघे म्हणती हे ॥२६॥ परी निंदा आणि स्तुती । दोन्ही समान जे मानिती । श्रीचरणांवीण आसक्ति । अन्य विषयावरी नसे ॥२७॥ जन निंदा करिताती । अनेक प्रकारे दूषण देती । परी शांत चित्ते त्याप्रती । उपदेशिती स्वामीसुत ॥२८॥ जे अहंकारे बुडले । सत्य पथाचरण चुकले । नित्य कार्यांते विसरले । मोहे पडले भवजाली ॥२९॥ ऐसे जे का मूढ जन । ते भक्ता देती दूषण । परी तेणे अंतःकरण । दुःखित नोहे तयांचे ॥३०॥ तारा नामे त्यांची कांता । तेही त्रास देती स्वामीसुता । परी तयांच्या चित्ता । दुःख खेद नसेची ॥३१॥ प्रथम मुंबई शहरात । शके सत्राशे त्र्याण्णवात । फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस । स्वामी जयंती केलीसे ॥३२॥ कोणे एके समयासी । नगरकर नाना जोशी । सहज आले मुंबईसी । त्यांनी ऐकिले वर्तमान ॥३३॥ या नगरांत सांप्रत । स्वामीसुत स्वामीभक्त । गोसावी होऊनी राहात । महाज्ञानी असती ते ॥३४॥ एकवार पहावे तयांसी । इच्छा झाली नानांसी । मग कोणे एके समयासी । मठामाजी पातले ॥३५॥ पाहुनी स्वामीसुताप्रती । आनंदले नाना चित्ती । प्रेमानंदे चरण वंदिती । स्तवन करिती तयांचे ॥३६॥ स्वामीसुते तयासी । लावियले स्वामीभक्तीसी । धन्य झाले नाना जोशी । रंगले भजनी समर्थांच्या ॥३७॥ ऐसे कित्येक सज्जन । स्वामीसुते शिष्य करोन । वाढविले महात्म्य पूर्ण । श्रीसमर्थ भक्तींचे ॥३८॥ पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी । ती अर्पावया श्रीचरणी । अक्कलकोटी पातले ॥३९॥ पत्रिका श्रीचरनी अर्पिली । स्वामीमूर्ती आनंदली । समर्थे त्यांसी आज्ञा केली । नगारा वाजवा म्हणोनी ॥४०॥ नगारा वाजविता जोशी । हसू आले समर्थांसी । पाहोनिया स्वभक्तासी । परमानंद जाहला ॥४१॥ अक्कलकोटी स्वामीसुत । श्रीसन्निध भजन करीत । कीर्तनी आनंदे नाचत । लोकलज्जा सोडोनी ॥४२॥ लोकापवादाचे मनी भय । तो भक्ती करील काय । प्रेमानंद चित्त नोहे । भजनी मन लागेना ॥४३॥ त्रिविध जन नानारीती । निंदा स्तुति करिताती । खेदानंद मानिता चित्ती । चित्तवृत्ति द्विधा होय ॥४४॥ असो अक्कलकोट नगरांत । शके सतराशे त्र्याण्णवात । प्रथम स्वामी जयंती करीत । स्वामीसुत आनंदे ॥४५॥ छेली खेडे ग्रामांत । प्रथम स्वामी प्रगट होत । विजयसिंग नामे भक्त । गोट्या खेळत त्यांसवे ॥४६॥ ऐसे स्वामीसुताचे मत । परी दिसे आधाररहित । सत्यासत्य जाणती समर्थ । आपण तेथे अज्ञानी ॥४७॥ स्वामीसुत दिवसेदिवस । स्वामीभक्ती करी विशेष । जन लाविले भजनास । कीर्तिध्वज उभारीला ॥४८॥ मनामाजी धरुनी कामना । कोणी येताचि दर्शना । त्यासी समर्थ करिती आज्ञा । सुताकडे जावयाची ॥४९॥ स्वामीसुतहि त्यांप्रती । मनांतील खूण सांगती । ऐकोनी जन चकित होती । वर्णिती ख्याती सुताची ॥५०॥ एकदा सहज स्वामीसुत । अक्कलकोटी दर्शना येत । तेव्हा समर्थ राजवाड्यात । राहिले होते आनंदे ॥५१॥ राणीचिये आज्ञेवाचोनि । दर्शन नोहे कोणालागोनी । ऐसे वर्तमान ऐकोनी । खिन्न मनी स्वामीसुत ॥५२॥ स्वामीदर्शन घेतल्याविण । तो न सेवी उदकान्न । ऐसे दिवस झाले तीन । निराहार राहिला ॥५३॥ मग वाड्यासमोर जावोन । आरंभिले प्रेमळ भजन । जे करुणरसे भरले पूर्ण । ऐकिले आंतून राणीने ॥५४॥ हा समर्थांचा निस्सीम भक्त । आनंदे भजनी नाचत । समर्थ दर्शनाची धरित । दृढ इच्छा अंतरी ॥५५॥ सेवकांसी म्हणे सत्वरी । तुम्ही जाऊनी या अवसरी । त्य साधूते मंदिरी । प्रार्थोनिया आणावे ॥५६॥ ऐसी राणीची आज्ञा होता । सेवक धावले तत्त्वता । प्रार्थूनिया स्वामीसुता । मंदिरामाजी आणिले ॥५७॥ पाहोनिया समर्थांसी । उल्हास सुताचे मानसी । धावोनिया वेगेसी । मिठी चरणी घातली ॥५८॥ सदगदित अंतःकरणी । चरण क्षाळिले नयनाश्रूंनी । देहभान गेले विसरोनी । स्वामीपदी सुखावला ॥५९॥ बाळ चुकले मातेसी । ते भेटले बहुत दिवसी । मग तयांच्या आनंदासी । पारावार नसेची ॥६०॥ निजसुताते पाहोनी । आनंदले समर्थ मनी । कर फिरविला मुखावरुनी । हस्ती धरुनी उठविले ॥६१॥ अक्कलकोटी त्या अवसरी । बहुत होते सेवेकरी । परी समर्थांची प्रीति खरी । स्वामीसुतावरी होती ॥६२॥ त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन । दूषित होय त्यांचे मन । द्वेष पूर्ण करिताती ॥६३॥ काही उपाय करोन । फिरवोन समर्थांचे मन । स्वामीसुतावरचे प्रेम । कमी करु पाहताती ॥६४॥ स्वामीसुत रात्रंदिन । समर्थांपुढे करिती भजन । पायी खडावा घालोन । प्रेमरंगे नाचती ॥६५॥ एके दिवशी श्रीसमर्थ । बैसले असता आनंदात । स्वामीसुत भजन करीत । पायी खडावा घालोन ॥६६॥ ऐशी वेळ साधोनी । समर्थां सांगितले दुर्जनी । स्वामीसुत हे करणी । योग्य नसे सर्वथा ॥६७॥ बैसला असता आपण । पायी खडावा घालोन । हा नाचतो काय म्हणून । आपुला अपमान करावया ॥६८॥ परकी आणि निजसुत । समान लेखिती जे सत्य । जे सर्वांसी आलिप्त । श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते ॥६९॥ आता खडावा काढोनी । मग नाचावे त्वां भजनी । ऐशी आज्ञा सुतालागोनी । केली समर्थे त्या वेळी ॥७०॥ तोच उठले कित्येकजण । खडावा घेतल्या काढोन । स्वामीसुताचा अपमान । केला ऐशा प्रकारे ॥७१॥ पाहोनिया ऐशी परी । खिन्न झाला सुत अंतरी । काळजात बोचली सुरी । अपमान दुःखे दुखावला ॥७२॥ मरणाहुनी परम कठीण । दुःख देतसे अपमान । उतरले सुताचे वदन । निस्तेज झाले सत्वर ॥७३॥ तयाते होते जे वैरी । ते आनंदले अंतरी । म्हणती मोडली खोड बरी । अभिमान उतरला ॥७४॥ असो मग स्वामीसुत । ते स्थळ सोडोनी त्वरित । नगराबाहेर येत । मार्ग धरीत मुंबईचा ॥७५॥ अपमान दुःखे दुखावला । अंतरी बहू खिन्न झाला । परतोनी नाही आला । जन्मभरी अक्कलकोटी ॥७६॥ स्वाभिमानी जो नर । त्याचे दुखविता अंतर । ते दुःख जन्मभर । त्याच्या मनी जाचतसे ॥७७॥ त्या दुःखे उत्तरोत्तर । क्षीण झाला स्वामीकुमर । दुःख करी दिवसरात्र । चैन नसे क्षणभरी ॥७८॥ तोची रोग लागला । शेवटी आजारी पडला । ऐसा समाचार समजला । अक्कलकोटी समर्थाते ॥७९॥ स्वामीसुताची जननी । राहातसे त्या स्थानी । तिने हे वर्तमान ऐकोनी । विनवीत समर्थाते ॥८०॥ म्हणे कृपा करोनिया । सुतात ए आणावे या ठाया । कृपादृष्टी पाहोनिया । आरोग्य तया करावे ॥८१॥ मग समर्थे त्या अवसरी । मुंबईस पाठविले सेवेकरी । म्हणती सुताते सत्वरी । मजसन्निध आणावे ॥८२॥ परी सुत त्या सांगाती । आला नाही अक्कलकोटी । अपमान दुःख त्याचे पोटी । रात्रंदिन सलतसे ॥८३॥ सेवेकरी परतोनी आले । समर्थांते वृत्त कथिले । आणखी दुसरे पाठविले । त्यांची गती तीच झाली ॥८४॥ मग सांगती समर्थ । त्यासी घालोनि पेटीत । घेवोनि यावे त्वरित । कोणी तरी जावोनि ॥८५॥ तथापि स्वामीसुत पाही । अक्कलकोटी आला नाही । दिवसेदिवस देही । क्षीण होत चालला ॥८६॥ शेवटी बोलले समर्थ । आता जरी न ये सत्य । तरी तोफ भरुनी यथार्थ । ठेविली ती उडवू की ॥८७॥ याचा अर्थ स्पष्ट होता । तो समजला स्वामीसुता । परी तो न आला अक्कलकोटा । जीवितपर्वा न केली ॥८८॥ आजार वाढला विशेष । श्रावण शुद्ध प्रतिपदेस । केला असे कैलासवास । सर्व लोक हळहळती ॥८९॥ त्या समयी मुंबईत । तयांचे जे शिष्य होत । त्यांसी झाले दुःख अमित । शोकसागरी बुडाले ॥९०॥ अक्कलकोटी त्या दिनी । समर्थ करिती विचित्र करणी । बैसले स्नान करोनी । परी गंध न लाविती ॥९१॥ भोजनाते न उठती । धरणीवरी अंग टाकिती । कोणासंगे न बोलती । रुदन करिती क्षणोक्षणी ॥९२॥ इतुक्यामाजी सत्वर । मुंबईहूनी आली तार । श्रुत झाला समाचार । स्वामीसुत गत झाला ॥९३॥ उदासिनता त्या दिवशी । आली सर्व नगरासी । चैन न पडे काकूबाईंसी । पुसती समर्था क्षणोक्षणी ॥९४॥ मग काकूबाईंने सत्वर । जवळी केले मुंबापूर । तेथे समजला समाचार । परत्र पावला आत्मज ॥९५॥ निजपुत्रमरणवार्ता । ऐकुनी करिती आकांता । तो दुःखद समय वर्णिता । दुःख अंतरी होतसे ॥९६॥ असो मग काकूबाई । अक्कलकोटी लवलाही । परतोनी आल्या पाही । बोलल्या काय समर्थांते ॥९७॥ सुत आपुला भक्त असोन । अकाली पावला का मरण । मग स्मरती जे हे चरण । त्यांचे तारण होय कैसे ॥९८॥ समर्थ बोलले तियेसी । उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी । संधी सापडली काळासी । ओढूनी बळेची मग नेला ॥९९॥ पुत्रशोके करोन । दुःख करी रात्रंदिन । समर्थ तियेचे समाधान । परोपरी करिताती ॥१००॥ नरजन्मा येऊनी सत्य । भक्ती केली एकनिष्ठ । केले जन्माचे सार्थक । परमपदा पावले ॥१०१॥ उच्च नीच भगवंती । नसे काही निश्चिती । ज्याची असेल जैसी भक्ती । श्रेष्ठ कनिष्ठ तेणेचि ॥१०२॥ धन्य धन्य स्वामीकुमर । उतरला भवौदधि दुस्तर । ख्याती झाली सर्वत्र । कीर्ति अमर राहिली ॥१०३॥ स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न एके अवसरी । पुसती सेवेकरी समर्थाते ॥१०४॥ ते कथा रसाळ अत्यंत । वर्णिले पुढील अध्यायात । श्रोते होऊनी सावधचित्त । अवधान द्यावे कथेसी ॥१०५॥ जयजय श्रीभक्तपालका । जयजयाजी परम मंगला । विष्णू शंकराची विमला । कीर्ति पसरो सर्वत्र ॥१०६॥ इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । भाविक भक्त परिसोत । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥१०७॥ श्री भगवच्चरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतुं ॥

No comments:

Post a Comment